
अझीम प्रेमजी : बौद्धिक संपदेचा मालक
अझीम प्रेमजी : बौद्धिक संपदेचा मालक [ प्रसाद केरकर. मुंबई ] Published on 10 Dec-2011 PRATIMA |
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक पातळीवरील बुद्धिवंतांच्या 100 जणांच्या यादीत नामवंत उद्योगपती अझीम प्रेमजी यांचा समावेश झाला. बौद्धिक संपत्तीच्या जिवावर विप्रो लि. ही देशातील तिसर्या क्रमांकाची आय. टी. कंपनी उभारणार्या अझीम प्रेमजी यांचा झालेला हा गौरव यथोचितच म्हटला पाहिजे. प्रेमजी हे काही पहिल्या पिढीतील उद्योजक नव्हेत. त्यांचे वडीलही उद्योजक होते. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या विप्रो या कंपनीचे रूपांतर त्यांनी एका वटवृक्षात करून बौद्धिक संपत्तीच्या जिवावर कशा प्रकारे साम्राज्य उभारले जाऊ शकते हे जगाला दाखवून दिले. 24 जुलै 1945 रोजी जन्मलेल्या अझीम यांच्या वडिलांचे अचानक निधन झाल्याने वयाच्या 21 व्या वर्षी त्यांच्यावर कंपनीची जबाबदारी आली. त्या वेळी विप्रो ही कंपनी काही मोठी नव्हती. अमेरिकेतील स्टॅँडफोर्ड विद्यापीठात ते शिकत असताना 1966 मध्ये त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांच्यावर शिक्षण सोडून कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. त्यानंतर झालेल्या कंपनीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत समभागधारकांनी त्यांना आपले कंपनीतील भांडवल विकून बाहेर पडावे आणि कुणातरी जाणकाराच्या हाती कंपनीची सूत्रे सोपवावी, अशी सूचना केली होती. कारण एवढय़ा लहान वयात त्यांच्याकडे सूत्रे आल्याने ते ही कंपनी कशा प्रकारे पुढे नेतील याबाबत समभागधारकांना शंका वाटत होती; परंतु समभागधारकांचा सल्ला अझीम यांनी काही मानला नाही आणि शेवटी कंपनीची सूत्रे स्वीकारलीच. मात्र कंपनीचे नेतृत्व सर्मथपणे हाताळले. त्या काळी विप्रो कंपनी साबण, तेल, विजेची उपकरणे, हायड्रोलिक सिलिंडर्स यांचे उत्पादन करीत होती. कंपनीची उलाढाल होती सुमारे सात कोटी रुपये. प्रेमजी यांनी कंपनीचा चेहरामोहराच पार बदलून टाकला आणि विप्रो ही तंत्रज्ञानावर आधारित कंपनी म्हणून पुढच्या दोन दशकात जागतिक नकाशावर झळकू लागली. आज विप्रो ही देशातील जशी तिसर्या क्रमांकाची कंपनी आहे तसेच ती जगातील टेक्नॉलॉजी कंपन्यांत पहिल्या शंभरात आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या समभागधारकांनी व्यक्त केलेली शंका अखेर खोटी ठरवली. त्यांनी कंपनीचा ‘फोकस’च पूर्णपणे बदलून साबणावरून सॉफ्टवेअर असा केला. 1980 मध्ये कंपनीने आय.टी. उद्योगात प्रवेश केला. 1975 मध्ये आय.बी.एम.भारतातून बाहेर पडल्यावर जी एक पोकळी हार्डवेअरच्या क्षेत्रात निर्माण झाली होती, त्यात आपण काहीतरी वाटा काबीज करावा असा विप्रोचा इरादा होता. त्यांचे हे धोरण यशस्वी ठरले. सुरुवातीला विप्रोने कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नंतर सॉफ्टवेअर क्षेत्रात पाऊल टाकले. आय. टी. उद्योगात त्यांनी हळूहळू यश मिळवण्यास सुरुवात केली असली तरी मूळ उद्योग काही बंद केला नाही. उलट त्यांनी जुन्या विभागाचाही विस्तार केला. यातून त्यांनी संतूर, विप्रो शिकेकाई, विप्रो बेबी सॉफ्ट, संतूर फ्रेश वॉश, संजीवनी हनी, हँडवॉश, डिओ असे अनेक नवीन ब्रँड बाजारात आणले. प्रेमजी यांनी उद्योग क्षेत्रात दाखवलेल्या कौशल्याची दखल घेऊन त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. सरकारच्या वतीने 2005 मध्ये त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. 2000 मध्ये त्यांना मणिपाल विद्यापीठाने डॉक्टरेट दिली, तर अलिगड मुस्लिम विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. अझीम प्रेमजी हे कॉर्पोरेट क्षेत्रातील दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 2001 मध्ये त्यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने प्रामुख्याने शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी हे फाउंडेशन हजारो सरकारी शाळांमध्ये कार्यरत आहे. प्रेमजी यांनी आपल्या कंपनीतील स्वत:चे काही भांडवल विकून सुमारे दोन अब्ज डॉलर (सुमारे दहा हजार कोटी रुपये) उभारले आणि यातून या फाउंडेशनचे कामकाज चालते. आता त्यांनी कर्नाटकात अझीम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरवले आहे. अशा या गुणी उद्योजकाचा जागतिक स्तरावर फार मोठा सन्मान झाला आहे. Prasadkerkar73@gmail.com |
0 Response to "अझीम प्रेमजी : बौद्धिक संपदेचा मालक"
टिप्पणी पोस्ट करा