-->
हिंदुत्वाची शेकोटी

हिंदुत्वाची शेकोटी

शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
हिंदुत्वाची शेकोटी
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेनेची भूमिका कोणती असेल याविषयी खरी उत्सुकता होती. त्याकडेच अनेकांचे कान लागून होते. परंतु कोणतीही ठोस भूमिका न घेता, सर्वच गोलमाल भाषण करीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाची शेकोटी मात्र पेटविण्याचे काम केले आहे. सध्या हिंदुत्वाचे नाणे चलनात जोरात आहे, त्यामुळे सध्या सत्ताधारी असलेल्या सर्वांनाच आपण केवळ हिंदुत्वाच्या जाज्वल्य विचारांची पाठराखण करीत पुन्हा सत्तेत येऊ असे वाटत आहे. त्यात शिवसेनाही आहेच. त्यामुळे केंद्रातील व राज्यातील अशा दोन्ही सत्तेतील मलिदा चाखत असताना एकीकडे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करावयाची व दुसरीकडे राज्यातील फडणवीस सरकारवर सौम्य टीका करावयाची अशी दुहेरी चाल उद्धव ठाकरे खेळत आहेत. त्याचबरोबर उध्दव ठाकरेंनी निवडणुकीत एकट्याने लढविणार की भाजपासोबत आघाडी करणार याबाबत मौन पाळणे पसंत केले आहे. याचा अर्थ त्यांनी आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. मात्र जानेवारी महिन्यात त्यांनी केलेल्या घोषणेनुसार, कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर निवडणूक युती केली जाणार नाही. असे असले तरीही सत्तेत वाटेकरी होण्यास ते नेहमीच तयार असतात. मध्यंतरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर भेट देऊन उध्दव यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाला शिवसेना सोबत पाहिजे आहे, मात्र त्यांचे प्रस्थ वाढता कामा नये, याचीही त्यांना दखल त्याबरोबर घ्यावयाची आहे. शिवसेनेला सत्तेसाठी भाजपाची साथ पाहिजे आहे. परंतु ही साथ देत असताना आपण भाजपापेक्षा वेगळे आहोत, हे त्यांना जगाला दाखवायचे आहे. गेल्या विधानसभेला शिवसेनेला व भाजपाला सत्ता हाती येण्यासाठी एकत्र यावे लागले. यातून त्यांचे सरकार स्थापन झाले. मात्र त्याअगोदर राष्ट्रवादीने भाजपाच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिल्याने शिवसेनेची मोठी गोची झाली होती. शेवटी सत्ता मिळवायचीच या इर्षेपोटी शिवसेनेला शेवटी नागपूर दरबारी जावे लागले होते. त्यामुळे शिवसेनेसा सत्ता ही पाहिजेच आहे. भाजपासोबत ते सत्तेचा घटस्फोट घेऊ शकत नाहीत. कारण उध्दव ठाकरे यांना कल्पना आहे की, जर सत्ता सोडली तर आपल्याबरोबरचे अनेक आमदार पक्ष सोडून जातील. कदाचित शिवसेनेत मोठे फूटही पडू शकते. त्यामुळे सत्तेत राहून त्यांना विरोधी पक्षात असल्यासारखे वागायचे नाटक वठवायचे आहे. केंद्रातील मोदी सरकारवर शिवसेना पक्षप्रमुखांनी सडकून टीका केली. अगदी नोटाबंदी कशी फेल झाली, महागाईचा वणवा कसा पेटला आहे, राम मंदिराच्या उभारणीचा प्रश्‍न अशी  अनेक उदाहरणे देता येतील. मोदी जगात फिरतात मात्र अयोध्येला काही जात नाहीत, अशी भाजपाच्या वर्मावर बोट ठेवणारी टीका त्यांनी केली. जर तुम्ही मंदीर उभारणार नसलात तर आम्ही ुभारु असे उसने आव्हानही त्यांनी दिले. त्याचबरोबर अयोध्येला जाण्यासाठी 25 नोव्हेंबरची तारीखही जाहीर केली. अर्थात तिकडे जाऊन उध्दवजी काय करणार? राम मंदिराची उभारमी करण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे का? हे सर्व प्रश्‍न सध्या विचारण्यात अर्थ नाही. फक्त त्यांनी मोदींना व भाजपाला हे प्रश्‍न विचारुन ललकारले आहे, हे मात्र नक्की. 56 इंचाची छाती तसेच काश्मिरचे 370 कलम यावरही त्यांनी जोरदार टीका केली. काश्मीरसाठी असलेले 370 कलमावरून देशातल्या हिंदूंच्या भावनांशी भाजप खेळली. आता सत्तेत आहात तर 370 कलम काढून टाकण्याची हिंमत का दाखवत नाहीत? तेवढी तरी हिंमत आहे काय? असा सवाल करत 370 कलम रद्द करण्यासाठी लोकसभेत ठराव आणा, शिवसेना खांद्याला खांदा लावून उभी राहील, असा विश्‍वास ठाकरे यांनी या वेळी दिला. संपूर्ण भाषणात ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्यावर कधी नाव घेत, कधी व्याजोक्ती, वक्रोक्ती अशा अलंकारांचा आधार घेत जोरदार टीका केली. देशाच्या पत्रिकेत सध्या वक्री झालेले शनि आणि मंगळ आहेत, पण या वक्री ग्रहांना सरळ करण्याची ताकद शिवसैनिकांत आहे. आता 2014 सालची हवा राहिलेली नाही. त्या हवेतही शिवसैनिकांनी टक्कर देत स्वबळावर 63 आमदार विजयी केले होते, याचे भान ठेवा, असा इशारा ठाकरे यांनी दिला. यातील 2014 सालची हवा राहिलेली नाही असे उध्दवरावांनी म्हणणे याला महत्व आहे. केंद्रावर अशी सडेतोड टीका करताना त्यांनी राज्यातील सरकारवर मात्र केलेली टीका सौम्यच होती. फक्त दुष्काळाच्या मुद्यावर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना राज्यातील सरकारला फारसे दुखवायचे नाही. राज्यात कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार य्ेऊ घातला आहे. खरे तर तो दसर्‍या मेळाव्यानंतर व्हावा यासाठी शिवसेना प्रयत्नशील होती. कारण सध्या शिवसेनेतील अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. सध्या विधानपरिषदेतील अनेकांना मंत्रीपद लाभले आहे. परंतु विधानसभेतील अनेक जण मंत्री होण्याच्या प्रतिक्षा करीत आहेत. सगळ्यांनाच उध्दवसाहेब मंत्री काही करु शकत नाहीत. त्यामुळे ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही ते भाजपाच्या गाळाला लागतील अशीही स्टॅटीजी भाजपाने आखली आहे. शिवसेनेने कितीही टीका केली तर सत्तेतील वाटेकरी तुम्ही आहात हे जनता विसरु शकत नाही. त्यामुळे भाजपाच्या अपयशातील वाटेकरी शिवसेनाही आहेच. त्याची उध्दवरावांना कल्पना आहे, त्यामुळेच त्यांनी हिंदुत्वाची शेकोटी पेटवून त्यावर मते मिळविता येतील अशी त्यांची रणनिती आहे.
------------------------------------------------------------ 

0 Response to "हिंदुत्वाची शेकोटी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel