-->
सामाजिक भान असलेला  मराठमोळा उद्योजक

सामाजिक भान असलेला मराठमोळा उद्योजक

संपादकीय पान शुक्रवार दि. ०९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सामाजिक भान असलेला 
मराठमोळा उद्योजक
उद्योग क्षेत्रात नाव कमविले असताना ज्या काही मोजक्या उद्योगपतींनी सामाजिक भान सोडले नव्हते त्यात गजाजन पेंढारकर हे नाव अगक्रमाने घ्यावे लागले. असे हे मराठी उद्योगक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे, विको उद्योगाचे सर्वेसर्वा गजानन पेंढारकर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे आपण एक मराठमोळा उद्योजक गमावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेंढारकर यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील परळमधल्या अशोक टॉवरमधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. पेंढारकर यांनी गुजरातमधील अहमदाबादमधून त्यांनी औषध शास्त्राची पदवी शिक्षण घेतले होते. पुढे चालून हेच शिक्षण आपल्याला करिअरची नवी दालने उघडून देणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. सुरुवातीला काही काळ नोकरी केल्यावर त्यांनी १९५७ वडिलांच्या व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रतिकुल परिस्थित परळ येथील १२० चौरस फुटांच्या जागेत विकोचे काम त्यांनी सुरू केले. घरोघरी फिरून आपल्या उत्पदनांची जाहिरात ते करत असत. सुरुवातीला घरगुती उत्पादने करुन त्याची विक्री तेच स्वत: घरोघरी जाऊन करीत असत. एक सुक्षिशित मुलगा त्याकाळी अशा प्रकारे दारोदारी भटकत आपली उत्पादने विकतो याचे अनेकांना कौतुक होते. त्यांच्या सुरुवातीच्या या कष्टाला हळूहळू चांगली फळे येऊ लागली. त्याकाळी ब्रँडेड आयुर्वेदीक औषधांना विशेष मागणी नव्हती तसेच जी आयु़र्वेदीक औषधे होती ती घरगुती स्वरुपात तयार केली जात. मात्र पेंढारकरांनी आयुर्वेदाचे महत्व जाणून त्याला ब्रँड बहाल केला. जसा त्यांच्या कारभाराचा व्याप वाढत गेला तसे त्यांनी डोंबिवलीमध्ये नवीन कारखाना सुरू केला. १९५२ मध्ये स्थापन झालेल्या विको म्हणजेच विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनीची आयुर्वेदिक उत्पादने पेंढरकर यांनी यूरोप व अमेरिकेच्या जागतिक बाजारात निर्यात केली. अर्थात त्यांनी उद्योग सुरु केल्यापासून ही उंची गाठायला त्यांना तब्बल २५ वर्षे लागली. वडिल के. व्ही पेंढरकर यांचा वारसा गजानन पेंढरकर यांनी गेली पाच दशके समर्थ चलवला आंतरराष्ट्रीय स्तरावर. आयुर्वेदला वेगळा नवी ओळख मिळवून दिली. प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांनी विकोच्या वाटचालीवर प्रभावित होऊन एक कविता लिहून दिली होती. त्यातील वाक्ये आजही विको आपल्या जाहिरातींसाठी वापरते.विकोचा कारभार वाढत गेला. पेंढारकरांनी  गोवा, नागपूर, येथे नवीन प्रकल्प स्थापन केले आणि डोंबिवलीमध्ये त्यांच्या प्रकल्पाचा विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यांनी आयुर्वेदिक विविध औषधे बाजारात आणली. हर्बल टूथपेस्ट, टूथपावडर, टर्मरिक स्कीन क्रीम, हर्बल शेव्हिंग क्रीम, आयुर्वेदिक पेन रिलीफ यासारख्या वैविध्यपूर्ण उत्पादनांची मालिका विकोने ग्राहकांसाठी आणली. खरे तर त्यांना हे करीत असताना सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली. परंतु त्यांनी या कपंन्यांशी जबरदस्त मुकाबला केला व विकोला आन्तरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. त्याकाळी आयुर्वेदिक उत्पादने बाजारात विकणे व महत्वाचे म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरणे ही काही सोपी बाब नव्हती. परंतु पेंढारकरांनी ते शक्य करुन दाखविले. गजाननरावांनी बदलत्या काळानुसार आपल्या उद्योगात झपाट्याने बदल केले आणि आपले अस्तित्व टिकवून धरले. त्यासाठी त्यांनी देशभर आपल्या उत्पादनांचे विक्री जाळे उभारलेच तसेच विदेशातही विक्री करण्यास प्रारंभ केला. सध्या विकोच्या एकूण उलाढालीत १५ टक्के वाटा हा निर्यातीचा आहे. नागपूर येथील प्रकल्प त्यांनी आन्तराराष्ट्रीय दर्ज्याचा उभारला व एक आयुर्वेदिक उत्पादन करणारी कंपनी असूनही उत्कृष्ट दर्ज्याचे उत्पादन देण्यासाठी अत्याधुनिक प्रकल्पाची गरज आहे हे दाखवून दिले. एकीकडे उत्कृष्ट दर्ज्या राखत असताना दुसरीकडे उत्पादनांची मालिका वाढवत नेली व जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी झाले. जाहीरात हा कोणत्याही उत्पादनाचा कणा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी जाहीरातींवर भर दिला. खरे तर अशा प्रकारे आयुर्वेदिक उत्पादनांची जाहीरात करण्याचा हा पहिलाच प्रयोग. त्यांचा उद्योग त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला असला तरीही विको ची खर्‍या अर्थाने उन्नती ही त्यांनीच करुन दाखविली. एकादा उद्योग शून्यातून उभारण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. एकीकडे उद्योगात स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी आपण समाजाचे देणे लागतो आणि समाजासाठी आपण केले पाहिजे याची त्यांनी पूर्ण जाणीव होती. यातूनच त्यांनी विविध समाजउपयोगी कार्यक्रम हाती घेतले. डोंबिवलीत स्थापन केलेले पेंढारकर महाविद्यालय हा त्यांचा याच उपक्रमाचा एक भाग होता. या महाविद्यालयामुळे डोंबिवलीसारख्या त्याकाळच्या लहान उपनगरात शिक्षणाची मुलांची मोठी सोय झाली. आज त्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. गजाननराव पेंढारकर यांच्या जाण्याने आपण सामाजिक भान असलेला मराठमोळा उद्योजक गमावला आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "सामाजिक भान असलेला मराठमोळा उद्योजक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel