-->
बिहारी राजकारण

बिहारी राजकारण

संपादकीय पान शनिवार दि. १० ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बिहारी राजकारण
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील दुसर्‍या मोठ्या राज्यातील म्हणजे बिहारमधील राज्य विधानसभेची निवडणूक आता तापू लागली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून विदेश दौर्‍यातून वेळ काढत बिहारच्या प्रचारात उडी घेतली आहे. खरे तर ही लढाई मोदींची नसून सर्वधर्मसमभाव मानणारे व हिंदुत्ववादी यांच्यातील राजकीय लढाई आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे बिहारमध्ये ठाण मांडून असून त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या युतीला कडवे आव्हान उभे केले आहे. एकीकडे ही राजकीय लढाई रंगलेली असताना बिहारमधील जनतेला निवडणुकांविषयी काय वाटते? बिहारमध्ये निवडणुकीत जी पैशाची उधळण चालते त्याबाबत निवडणूक आयोगानेच एक पाहणी केली होती. त्यातून बाहेर आलेले निकाल भारतीय लोकशाहीला शरमेने मान खाली घालावयास लावणारे आहेत. बिहारमधील ८० टक्के लोकांना मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे बिहारच्या निवडणूक आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानंतर बिहारच्या निवडणूक आयोगाने आमीषाला बळी न पडता मतदान करावे, यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या या अहवालाचा रोख पाहता जनतेवर फारसा परिणा होणार नाही असेच दिसते. बिहार निवडणूक आयोगाने जनतेमधील मतदानाविषयीचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी पाटण्यातील चंद्रगुप्त इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने सर्वेक्षण केले आहे. जून-जुलै २०१५ याकालावधीत सुमारे ४,५०० जणांची मतं या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. यामध्ये ८० टक्के लोकांनी मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात गैर नसल्याचे सांगितले. बिहारमध्ये मतदारांना कोणत्याही प्रकारे अशी लालचूच दाखविणे ही एक नित्याची बाबा ठरली आहे. यात कुणाला काही चुकीचे आहे असेच वाटत नाही. एवढेच कशाला मतदारांाना नेत्यांच्या आगमनापूर्वी किंवा नंतरही खिळवून ठेवण्यासाठी रांत्रंदिवस नौटंकीचे प्रयोग आयोजित केले जातात. अर्थात हे सर्वच पक्ष करीतअ सल्याने यात कुणाला काही चुकीचेच वाटत नाही. आपल्याकडील लोकशाहीचे हे एक विदारक वास्तव आहे. एकीकडे आपण जगातील एक प्रमुख शक्ती होण्यासाठी पावले टाकीत असताना तसेच मंगळावर स्वारी केली असताना आपल्याकडील जनता अजूनही आपले मत विकण्यास तयार आहे. लोकशाहीत मतदाराच्या मताला मोठी किंमत आहे.अर्थात ही किंमत पैशात मोजता येत नाही तर देशाने दिलेला तो एक हक्क आहे आणि हा हक्क खरेदी केला जाऊ शकत नाही. परंतु आपल्याकडे पाच टक्के जनता श्रीमंत, गर्भश्रीमंत आहे. यांना देशातील ३५ कोटी मध्यमवर्गीयांना या मताची किंमत पटली आहे. मात्र जे गरीब आहेत त्यांना आपल्या मताला ५०० रुपये किंवा हजार रुपये देऊन खरेदी केले जाते त्यामागची भावना आजवर समजलेली नाही. कारण हा मतदार अजूनही असुशिक्षीत आहे. गरीब आहे व त्याच्या या गरीबीचा राजकारणी फायदा उठवित आहेत. आपण निवडून दिलेले राजकारणी हे सत्तेत आले की भरपूर पैसे खातात आणि गब्बर होतात. मग त्यांना सत्तेवर आणण्यासाठी आपले मत आपण का विकू नये ? अशी मतदारांची समजूत होते. बिहार हे देशातील आघाडीचे बिमारु राज्य म्हणून ओळखले जाते. गेल्या दहा वर्षात नितिश कुमार यांच्या कारकिर्दीत त्यांनी बर्‍यापैकी आर्थिक सुधारणा करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे बिहारमधून देशात रोजगारासाठी होणारे स्थलांतर बरेच कमी झाले. असे असले तरी बिहारी जनतेची मते विकण्याबाबतची मानसिकता बदलायला अजून दोन तपे लागतील असेच दिसते. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीही करुन बिहारची सत्ता आपल्याकडे घ्यायची आहेच अशा निर्धाराने उतरल्याने कोणत्याही थराला जाऊन प्रचार करीत आहेत. यातून वारेमाप पैसा यात उधळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच एका प्रचाराच्या सभेत माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यादव यांचा उल्लेख शैतान असा केला. अशा प्रकारे पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे खालच्या पातळीवर येऊन आपल्या विरोधकांवर टीका करावी यातून आपण अजूनही किती मागासलेले आहोत याचा अंदाज येतो. बिहारची जनता बिचारी सुशिक्षीत नाही, त्यांच्याकडे गरीबी आहे, परंतु त्यापेक्षाही तेथील नेते हे कर्मदरिद्री आहेत असे खेदाने म्हणावे लागते. लालूप्रसाद  यांच्यावर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरीही त्यांच्यामागे जनता आहे. नितिशकुमारांच्या रुपाने बिहारला एक अभियंता असलेला मुख्यमंत्री लाभला. सध्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारी राजकारण आता एका टोकाला गेले आहे. यातून आपल्या लोकशाहीचे धिंडवडे निघाले आहेत, हे दुदैव.
-------------------------------------------------------------------    

0 Response to "बिहारी राजकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel