-->
मुंबई गोंधळपीठ

मुंबई गोंधळपीठ

रविवार दि. 21 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
मुंबई गोंधळपीठ
मुंबई विद्यापीठातील सध्या झालेला गोंधळ पाहता, याला आता मुंबई गोंधळपीठ असेच नाव ठेवावयास हवे. अर्थात निकालाचा गोंधळ हे समीकरण तयंच्यासाठी काही नवीन नाही. आता विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनातलाही मोठा घोळ समोर आला आहे. 2014 ते 2016 या शैक्षणिक वर्षात 97 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. त्यापैकी तब्ब्ल 35 हजार म्हणजेच 36 टक्के विद्यार्थ्यांना चुकून नापास करण्यात आल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे मुख्य निकालासोबत आता पुनर्मूल्यांकनाच्या निकालातही मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरला आहे. शैक्षणिक वर्ष 2017 च्या उत्तरार्धात, म्हणजेच शेवटच्या सत्रात पार पडलेल्या उन्हाळ्याच्या परीक्षेत 49,556 विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांवर शंका उपस्थित करत, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यामध्ये 16,739 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होत्या. ही चूक लक्षात आल्यावर त्यांना उत्तीर्ण करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या या नवीन घोळामुळे थेट मूल्यांकनाच्या गुणवत्तेवर प्रश्‍न उपस्थित होत आहे. चुकीच्या पद्धतीने उत्तरपत्रिका तपासल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. 2017 च्या वार्षिक परीक्षेत सुमारे 47,717 विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात 18,254 विद्यार्थ्यांना चुकीचे गुण दिल्याचे समोर आले. 2016च्या सहामाही परीक्षेत 44,441 पैकी नापास केलेले 16,934 विद्यार्थी पुनर्मूल्यांकनामध्ये पास झाले. मुंबई विद्यापीठाच्या या नवीन घोळामुळे थेट मूल्यांकनाच्या गुणवत्तेवर प्रश्‍न उपस्थित होत आहे तसेच चुकीच्या पद्धतीने उत्तरपत्रिका तपासल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले असून, शैक्षणिक भवितव्य पणाला लागले आहे. विद्यापीठाच्या या चुकून नापास करण्याच्या घोळामुळे विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरून विश्‍वास उडाला आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. गेल्या वर्षी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुंना विद्यापीठाच्या परिक्षांना झालेला विलंब व त्यानंतर निकालांचे झालेले गोंधळ यामुळे पदत्याग करावा लागला होता. आता कोणाचा पुन्हा बळी जाणार आहे?
जगभरातील विद्यापीठांच्या नुकत्याच झालेल्या क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटन या देशांचाच दबदबा आहे. पहिल्या दहात अमेरिकेची सात, तर ब्रिटनची आठ विद्यापीठे आली आहेत. आशियापुरता विचार करायचा झाल्यास, चीनच्या सिंघ्वा विद्यापीठाने पहिल्या 25 विद्यापीठांच्या यादीत मुसंडी मारली असून, बाविसाव्या क्रमांकानिशी हे विद्यापीठ आशिया खंडातील सर्वोत्तम विद्यापीठ ठरले आहे. अर्थात पहिल्या दहा विद्यापीठात चीनमधील विद्यापीठ नाही, तर आपल्या देशातील विद्यापीठ तर पहिल्या 250 विद्यापीठात नाही. आपली ही विद्यापीठांची दयनीय अवस्था पाहता मान शरमेने खाली जावी. पहिल्या 50 विद्यापीठांमध्ये चीनच्या चार विद्यापीठांना स्थान मिळाले आहे. भारताच्या मात्र एकाही विद्यापीठाला पहिल्या 250 विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही, आपल्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशासाठी ही शरमेची बाब आहे. आपण महासत्ता होण्याची किती पोकळ स्वप्ने पाहत असतो हे त्यावरुन जमजते. बेंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) हे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ ठरले असले तरी, जागतिक क्रमवारीत मात्र या विद्यापीठाचा क्रमांक 251 ते 300 या गटात आहे. भारतातील इतर विद्यापीठांना तर पहिल्या 300 विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही. आपल्याकडील मुंबई, कोलकाता, पुणे ही विद्यापीठे ब्रिटीशांनी स्थापन केली असून आज त्यांच्याकडे शंभराहून जास्त वर्षांचा इतिहास व परंपरा आहे. परंतु एवढी ही जुनी विद्यापीठे असून देखील जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकली नाहीत, याचा आपल्याकडे विचार झाला पाहिजे. त्यामुळे आपल्याकडील विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा किती खालच्या प्रतिचा आहे हेच यावरुन सिध्द होते. एखादे विद्यापीठ म्हणजे, केवळ भव्य दिव्य इमारती व सुंदर कॅम्पस नव्हे. त्यासाठी तेथील शैक्षणिक दर्जा किती उच्चत्तम आहे याला महत्व आहे. तक्षशीला, नालंदासारख्या विद्यापीठांच्या माध्यमातून जगाला विद्यापीठ या संकल्पनेचा परिचय घडविलेल्या भारताच्या एकाही विद्यापीठाला पहिल्या 250 विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता येऊ नये, ही बाब निश्‍चितच भुषणास्पद नाही. त्यामुळे आपल्या गतवैभव इतिहासात डोकावल्यास तो की ती वैभवशाली होता व आता आपण विद्यापीठे नावाचा कारखाना चालवितो आहोत, असेच चित्र दिसते. आपल्याकडे झालेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे देशातील एकही विद्यापीठ अथवा संशोधन संस्था जगतील पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवू शकलेले नाही. देशाच्या जडणघडणीत तसेच संशोधनात व नवीन पिढी घडविण्यात विद्यापीठांचा मोलाचा हातभार असतो. सर्वांगीण विकास घडतो तेव्हाच कोणताही देश मजबुतीने उभा राहतो आणि कोणत्याही देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. जागतिक पातळीवरील विद्यापीठांची क्रमवारी पाहता, विकसीत देशांतील विद्यापीठ अग्रभागी आहेत. खरे तर या विद्यापीठांच्या जोरावरच हे देश विकसीतांच्या यादीत झळकत आहेत असे म्हटले पाहिजे. अमेरिका असो किंवा ब्रिटन या देशात विद्यापीठांतून जे संशोधन होते त्याला त्या देशातील उद्योजकांचा सक्रिय पाठिंबा असतो. विद्यापीठे व कंपन्या या हातात हात घालून काम करताना आढळतात. आपल्याकडे उलटे आहे. विघ्यापीठातून शिक्षणाचे अभ्यासक्रम आखले जातात, त्याचा उद्योगांना काही उपयोग आहे किंवा नाही याचा विचारही केला जात नाही. नंतर या विघ्यापीठातून मुले शिकून तयार झाली की, त्यांना नोकर्या शोधणे हा एक मोठा कार्यक्रम होऊन जातो. त्यामुळे आपल्याकडे शिक्षण हे एखाद्या कारखान्यातील उत्पादनाप्रमाणे शिकविले जाते. डोळ्याला झापडे लावून अभ्यासक्रम आखले जातात, पारंपार चालत आलेल्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा कोणी विचारही करत नाही. शिक्षणाकडे सुविद्य, सुसंस्कारित, सुजाण नागरिक घडविण्याचे माध्यम म्हणून न बघता, केवळ अर्थार्जनासाठी आवश्यक पदव्यांची भेंडोळी मिळविण्याचे साधन म्हणून बघितल्या जात आहे. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचाही व्यापार झाला आहे. पदव्या विकल्या जात आहेत, विकत घेतल्या जात आहेत. पीएच. डी. ही सर्वोच्च पदवी मिळविण्यासाठी आपल्याकडे तर विद्यापीठांमध्ये मोठा सपाटाच लागलेला असतो. सध्या अनेकांना आपल्या नावाच्या मागे डॉक्टर लावण्यासाठी या पदव्या विकत घेण्याची हौसच झाली आहे. त्यासाठी मुलभूत संशोधन करण्याऐवजी प्रबंधांची चोरी, नक्कल केली जाते. त्याममुळे केवळ पदव्या मिळविण्यासाठी आपल्याकडे संशोधन केले जाते. त्यातील संशोधन हा किरकोळ घटक असतो, प्राध्यापकांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांचा स्वत:चा विकास साधता येतो. त्यामुळे त्यांचा काहीही करुन पीएचडी मिळविण्याकडे कल असतो. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्येही गुणवत्ता, दर्जा असेल, तर जागतिक कीर्तीची विद्यापीठे निर्माण होणे शक्य आहे. आपण ते करु शकतो, परंतु आपले त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे व शिक्षण हे एखाद्या उद्योगाप्रमाणे असल्याचे सर्वांचेच मत झाले आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. अन्यथा आपली भावी पिढी चांगल्या दर्जेदार शिक्षणापासून वंचित तर राहिलच शिवाय त्यांना शिक्षणाचे महत्वही समजणार नाही. शिक्षणाकडे अर्थाजनाचे साधन म्हणून न बघता नवी पिढी आणि देश घडविण्याचे पवित्र कार्य म्हणून करावे लागेल. अर्थात हे करण्यासाठी आपल्याला आपल्या शैक्षणिक पॅटर्नमध्ये आमुलाग्र बदल करावे लागणार आहेत.
-----------------------------------------------------------

0 Response to "मुंबई गोंधळपीठ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel