-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २० जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
इराकमधील अराजक
-----------------------------------
खनिज तेलाने समृध्द असलेल्या आखातातील एक देश इराकमध्ये आता अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी विकसीत देशांनाही लाजवेल असा विकास केलेल्या या देशाचे आता लचके तोडण्यास बंडखोरांनी सुरुवात केली आहे. अर्थात याचा दुहेरी फटका भारतास बसणार आहे. एक फटका म्हणजे तेथील भारतीय नागरिकांची सुरक्षितता व दुसरी महत्वाची बाब म्हणजे खनिज तेलाच्या किंमती वाढू लागल्याने त्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे.
सुन्नी बंडखोरांच्या हिंसक उठवामुळे इराकमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीचे चटके भारतालाही बसण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर इराकमधील मोसूल या शहरात एका बांधकाम कंत्राटदाराकडे काम करणार्‍या ४० भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले असून, २४ तास उलटले तरी त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या तिकरित शहरात काम करणार्‍या ४४ भारतीय परिचारिका सुरक्षित असल्याने समाधान व्यक्त केले जात असतानाच मोसूलमध्ये ४० भारतीय कामगारांचे अपहरण झाल्याचे वृत्त आले. मोसूल हे तेल विहिरींनी संपन्न असे शहर आहे. यएाशणहरावर सुन्नी जिहादींनी ताबा मिळविला होता. मात्र येथील स्थानिक असलेल्या कुर्द नागरिकांनी या अतिरेक्यांना पिटाळून लावण्यात यश आले होते. मात्र या दोन्ही अतिरेक्यांमध्ये घमासान युध्द सुरु झाल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुष्कील झाले आहे. इराकमधील भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी घेणे व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेणे हे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे काम आहे. तेथे जे भारतीय अडकलेले आहेत त्यांना पुन्हा मायदेशी सुरक्षित आणण्याची केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि ते टाळू शकणार नाहीत. या अराजकाच्या परिस्थितीने पुढील काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती बॅरलला १२५ डॉलरपर्यंत वाढतील आणि त्याचा भारताच्या अर्थसंकल्पावर किमान २० हजार कोटी रुपयांचा जादा बोजा पडेल. इराकमधील घटनांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती बॅरेलमागे तीन डॉलरने वाढून ११३ डॉलरवर गेल्या आहेत. या परिस्थितीमुळे तेलाच्या किंमती पुढील तीन-चार महिन्यांत प्रति बॅरल १२० डॉलरवर राहिल्या तर आपल्या अर्थव्यवस्थेवर मोटा बोजा पडणार आहे. यातून अर्थसंकल्पीय तूट वाढेल व आर्थिक विकास मंदावेल. कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरलमागे एक डॉलरने जरी वाढ झाली तरी आपल्याला सुमारे सात हजार कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागतो. भारत दररोज ४० लाख बॅरल्स इतके तेल दररोज आयात करीत असते. केवळ तेलाच्या आयातीवरच १६५ अब्ज डॉलर इतका खर्च येतो. त्यामुळे इराकमधील या अराजकापासून आपण अलिप्त राहूच शकणार नाही. आखातातील या देशातील हा संघर्ष प्रामुख्याने तेलावर कुणाचे वर्चस्व राहिल यासाठीचा आहे. अमेरिकेने इराकवरील तेल विहिरी आपल्या कब्जात येण्यासाठी ८०च्या दशकापासून प्रयत्न केले होते. परंतु त्यांचा काही डाळ शिजली नव्हती. कारण तेथील अध्यक्ष सद्दाम हुसेन हे कट्टर अमेरिका विरोधी होते आणि त्यांनी आपल्या देशाचे हीत जपायचे असेल तर तेलाच्या विहिरी या आपल्या देशाच्या मालकिच्याच असल्या पाहिजेत ही भूमिका घेतली होती. नंतर ९१च्या आसपास इराकने कुवेतवर हल्ला केला आणि लोकशाहीचा गळा घोटल्याचे निमित्त करुन सद्दाम हुसेनला अद्दल घडविण्यासाठी अमेरिकेने इराकवर बॉँब हल्ले सुरु केले. अमेरिकेच्या या हल्यानंतर इराकने आपला कुवेतवरील दावा सोडला असला तरीही अमेरिकेचे मुख्य उद्ष्टि काही साध्य झाले नव्हते. त्यामुळे आणखी दहा वर्षानंतर इराकच्या सद्दाम हुसेन यांना अद्दल घडविण्याचे निमित्त करुन उराकने केमिकल शस्त्रे दडविल्याचे कुभांड अमेरिकेने रचले. यातून पुन्हा एकदा इराकवर अमेरिकेने हल्ले केले. जवळजवळ तीन वर्षांच्या हल्यानंतर सद्दाम हुसेन यांना अटक केली. त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारांवर खटले भरले. आपल्याला हातातील बाहुले असेल असे सरकार इराकमध्ये आणले. मात्र इराकमध्ये ज्यासाठी युध्द केले तेथे केमिकल शस्त्रे काही अमेरिकेला सापडली नाहीत. सद्दाम हुसेनला फाशीची शिक्षा झाली व इराक अमेरिकेच्या पूर्णपणे कह्यात आला. इराक आला असे म्हणण्यापेक्षा तेथील तेलाचा उद्योग अमेरिकेच्या ताब्यात आला. ज्यासाठी त्यांनी गेले चार दशके संघर्ष केला ते उदिष्ट अखेर अमेरिकेने साध्य केले. सद्दाम हुसेन हा हुकूमशाह असला तरीही तो अमेरिकेचा कट्टर विरोधक होता व इराक भारताचा एक चांगला मित्र देश होता. सद्दाम हुसेनने इराकची प्रगती उत्तम केली होती. त्याच्या काळात इराकी जनता सुखी होती. मुस्लिम देश असूनही तेथे महिलांना मोठे स्वातंत्र्य होते. कोणतीच महिला त्यावेळी तेथे बरख्यात नव्हती. एक पुरोगामी राज्यकर्ता अशी सद्दाम हुसेनची जगाला ओळख होती. कुर्दसारख्या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी त्याने तेथे मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले हे वास्तवही विसरता येणार नाही. मात्र त्याच्या काळात इराकी जनता खाऊन पिऊन सुखी होती. त्यांच्या जीवनात स्थैर्य होते, जे आता त्यांनी गमावले आहे. त्यामुळे आज जे इराकमध्ये अराजक आहे त्याची बिजे अमेरिकेने रोवली आहेत. आज इराक हा देश बेचिराख झाल्याच्या स्थितीत आहे. तेथील जनतेला दोन वेळचे अन्नही मिळत नाही अशी स्थीती आहे. बंडखोरांच्या गटांनी त्या देशाचे तुकडे पाडून आपले राज्य स्थापन केले आहे. सरकार म्हणून तिथे काहीच अस्तित्वातच नाही. अर्थात याचे सर्व पडसाद जगाला व भारताला भोगावे लागणार आहेत.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel