-->
युतीत लाथाळ्या!

युतीत लाथाळ्या!

शुक्रवार दि. 04 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
युतीत लाथाळ्या!
राज्यात शिवसेना भाजपामध्ये युती जाहीर झाली असली तरी आतून मात्र एकमेकांविरोधात लाथाळ्याच सुरु असून रायगडमध्ये देखील हेच चित्र कायम आहे. उरण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, कर्जतमध्ये भाजपाने आपले उमेदवार रिंगणात उतरिवण्यास सुरुवात केली असून पेण, पनवेल मध्ये शिवसेनेने भाजपाविरोधात शड्डू ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यातील सातही जागांवर लढण्याची तयारी असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर मात्र शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर पाणी पडलेे. पेण आणि पनवेल हे दोनच मतदार संघ भाजपाच्या वाटयाला आल्याने उर्वरित ठिकाणी मित्रपक्षाकडून नेहमीच होणारी मुस्कटदाबीविरोधात आता असंतोष जोर धरु लागला आहे. याचे प्रत्यंतर उरण विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे महेश बालदी यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जावरुन आले. तोच धडा कर्जत, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाडमध्ये देखील गिरविण्यात येईल असे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. अशीच रणनिती भाजपाच्या वाटयाला आलेल्या पनवेल आणि पेण मतदारसंघात शिवसेनेकडून भाजपाविरोधात केली जाणार आहे. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचा सामना रंगणार आहे. याच मतदारसंघामध्ये भाजपचे कृष्णा कोबनाक हे आपला उमेदवारी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.कर्जतमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. शिवसेनेचे बंधन तोडून भाजपावासी झालेले माजी आमदार देवेंद्र साटम हे कर्जतमधून तयार होते. मात्र येथेही त्यांना संधी न मिळाल्याने ते देखील रिंगणात उरतणार आहेत. पेण मतदारसंघातून भाजपने काँग्रेसमधून आयात केलेल्या माजी मंत्री रवी पाटील यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. परंपरागत शिवसेनेचा हा मतदार संघ असल्याचा दावा करीत आपला हक्क दाखवला आहे. पनवेलमध्ये देखील शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार उबा केला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीला संपूर्ण जिल्ह्यात ग्रहण लागले आहे. अर्थात संपूर्ण जिल्ह्यातही याहून काही वेगळे चित्र नाही. सत्तेच्या आशेने युतीत काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांची एकच भाऊगर्दी झाली. त्यातच युतीच्या जागावाटपानेही अनेकांची अडचण केली. जो मतदारसंघ भाजपला सुटला तिथे शिवसैनिक तर जो मतदारसंघ शिवसेनेला सुटला तेथील भाजप कार्यकर्ते नाराज झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांना कोशरुडमधून परका उमेदवार म्हणून मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघही अमळनेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. धुळ्याची जागा शिवसेनेला सुटून हिलाल माळी यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या डॉ. माधुरी बोरसे यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर माजी आमदार शरद पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बंडाचा झेंडा हाती घेतला. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारुन त्यांच्या जागे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल ढिकले यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यामुळे सानप समर्थका राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नाशिक पश्‍चिममध्ये भाजप आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध आहे. ही जागा शिवसेनेला हवी. देवळालीत शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांच्याविरोधात भाजपा नगरसेविका सरोज अहिरे यांनी बंडाचे निशाण फडकावत राष्ट्रवादीची वाट धरली. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात यावेळी मोटी बंडखोरी आहे. नागपूर दक्षिणचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकिट कापून माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या वेळी मते यांनी बंडखोरी केली तरीही त्यांना तिकिट दिल्यामुळे कोहळे समर्थकांत नाराजी आहे. त्यांनी भाजप विरोधात निदर्शने केली. मध्य नागपूरमधून आमदार विकास कुंभारेंना पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे माजी महापौर प्रवीण दटके यांची निराशा झाली. यवतमाळ येथील भाजपचे वादग्रस्त आमदार राजू तोडसाम यांची उमेदवारी कापून पक्षाने संदीप धुर्वे यांनी तिकीट दिले आहे. त्यामुळे तोडसाम हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. बुलडाण्यात शिवसेनेने संजय गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. गेवराईची जागा भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनाच कायम राहिली. मात्र राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी मंत्री बदामराव पंडित त्यामुळे नाराज झाले आहेत. ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. माजलगावमध्ये भाजपने विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांचे तिकीट रमेश आडसकर यांना संधी दिली. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात आलेले मोहन जगताप नाराज झाले, त्यांनीही बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. हदगावात सेनेने आमदार नागेश पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली. त्यांच्याविरोधात माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. दक्षिण नांदेडमध्ये शिवसेनेने खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या मतदारसंघावर भाजपनेही दावा केला होता. बार्शी येथे राष्ट्रवादीतून आलेल्या दिलीप सोपल यांना शिवसेनेने बार्शीतून उमेदवारी दिली आहे. भाजपचे नेते तथा मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय राजा राऊत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. बार्शीत आजवर सोपल विरुध्द राऊत अशीच लढत झालेली आहे. राज्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये बंडखोरी होते आहे. त्यातल्या त्यात युतीतील बंडखोरी सर्वाधिक आहे. त्यामुळे युतीतील या लाथाळ्या त्यांना सत्ताभ्रष्ट करु शकते.
-------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "युतीत लाथाळ्या!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel