-->
संपादकीय पान--चिंतन--२५ऑक्टोबर २०१३ साठी-
-------------------------
राजकारणातली व्टिटींगची स्पर्धा
------------------------
गेल्या दोन वर्षात सोशल मिडियाने आपला एक माहोल तयार केला आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्र सोशल मिडियाने व्यापले आहे. अशा वेळी राजकीय व्यक्ती यात कशा मागे राहातील. अण्णांच्या आंदोलनाच्या काळात सोशल मिडियाने अशाच प्रकारे मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत सोशल मिडिया हेच मोठे प्रचाराचे साधन ठरणार आहे, हे नक्की. अर्थात सोशल मिडियावरुन आवाहन केल्याने कोणाच्या जागा वाढतील किंवा कोणाचा पराभव होईल हे सांगणे कठीण आहे. परंतु राजकारणातील प्रत्येक व्यक्ती वा पक्षासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मिडिया हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे हे मात्र नक्की.
भारतीय जनता पक्षाने हे नेमके हेरुन सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्याचे गेल्या दोन वर्षात मोठे प्रयत्न केले आहेेत. यात त्यांना कितपत यश येते हे निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट दिसेलच. भाजपाने सोशल मिडियात आघाडी घेतल्यावर इतरही पक्षांनी आपण कशाला धोका पत्करायचा असे म्हणून सोशल मिडियातही उडी घेतली. प्रत्येक पक्षाचे व त्यांच्या नेत्यांचे फेसबुकवरील पेज, व्टिटर अकाऊंट, वेबसाईट सुरु झाल्या. लोकांनीही त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यात सोशल मिडिया एक महत्वाची भूमिका बजावणार हे स्पष्ट झाले. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी याव्दारे प्रचार करण्यात आघाडी घेतल्याचे सर्वत्र जाणवू लागले. तशी हवा तरी भाजपाने तयार करण्यात यश मिळविले. परंतु सर्वाधिक व्टिट केलेल्या नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी बरेच पिछाडीवर आहेत. गेल्या तीन महिन्यांत राजकारणातील व्यक्तींनी किती व्टिट केले याची एक पहाणी करण्यात आली. त्यात भाजपाचे गुजरातमधील एक नेते धुरुमली पटेल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी या तीन महिन्यांच्या काळात ४४४३ वेळा व्टिट केले. तर दुसरा क्रमांक भाजपाच्या दिल्ली युनिटचा लागला. तर तिसर्‍या क्रमांकावर आश्‍चर्याची बाब म्हणजे सी.पी.आय.(एम.एल.)च्या कविता कृष्णन होत्या. सहसा अशा प्रकारच्या सोशल मिडियापासून डावे पक्ष काहीसे दूरच असल्याचे जाणवते. कारण त्यांचा प्रत्यक्ष कामावर भर असतो. अशा प्रकारे सोशल मिडियाचा वापर करुन आपला संदेश पोहोचविता येईल परंतु जनसेवा होणार नाही असे त्यांचे नेते खासगीत बोलत असतात. अर्थात या बोलण्यात तथ्यही बर्‍यापैकी आहे. मात्र कृष्णन यांचा अपवाद ठरला आहे. दिल्लीतील भाजपाने सोशल मिडियाव्दारे प्रचारावर जोर दिला आहे.   त्याखालोखाल आम आदमी पार्टी व तृणमूल कॉँग्रेस यांनीही याचा वापर करण्याचे तंत्र अवगत केले आहे. नरेंद्र मोदी यांनी तर एकूण वीस भाषांमध्ये आपले व्टिटरचे खाते उघडले आहे. शिवराजसिंग चौहान, मिलिंद देवरा, दिग्वीजयसिंग, सुशीलकुमार मोदी, स्मृती इराणी हे राजकीय नेते व्टिटरवर सक्रिय असतात. नितिन गडकरी हे मोठे गपिष्ट म्हणून राजकारणातील व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांचे २२ हजार फॉलोअर्स आहेत. मात्र त्यांनी २००९ रोजी खाते उघडल्यापासून केवळ एकदाच व्टिट केले. तर बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारे यांनी आजपर्यंत केवळ नऊ वेळाच व्टिट केले आहे. अशा प्रकारे सोशल मिडियाशी तरुण पिढी मग ती राजकारणतली असो वा कुठलीही सहजरित्या जोडली गेली आहे. अशा प्रकारे व्टिंटग करुन आपली मते दीडशे शब्दात लोकांपर्यंत पोहोचविण्याचे एक उत्तम माध्यम व्टिटरच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. त्याचा प्रभाव आगामी निवडणुकीत कितपत होईल हे काळ ठरविल.
---------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel