-->
संपादकीय पान सोमवार दि. १० फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
कोकणाचा कॅलिर्फोनिया 
खरोखरीच होणार का?
-------------------------------
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कोकणचा कॅलिर्फोनिया करण्याचे स्वप्न ऐकेकाळी कोकणवासियांना दाखविले होते. मात्र हे स्वप्न काही प्रत्यक्षात काही उतरले नाही. त्यादृष्टीने पावले टाकण्यास गेल्या दशकात सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे पवारसाहेबांचे हे आश्‍वासन म्हणजे कोकणाच्या समुद्रकिनारी लाटेवरुन वाहून गेले असेच म्हणावे लागेल. सरकारी आश्रय मिळाल्याशिवाय अनेक कामांना खर्‍या अर्थाने वेग येत नाही. कारण वैयक्तिक पातळीवर कोणतीही कामे करण्यात अनेक मर्यादा असतात. कोकणच्या विकासाचेही असेच झाले. शासकीय पातळीवर काही ठोस उपाय न झाल्याने तसेच अनेक आखलेल्या योजना हा कागदावरच राहिल्याने कोकणाला प्रामुख्याने तळ कोकणाला प्रदीर्घ मुंबईत कमाविणार्‍या आपल्या चाकरमन्यांच्या मनिऑर्डरची वाट बघण्याशिवाय अन्य काही मार्ग राहिला नाही. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. आपण खरोखरीच कोकणाचा कॅलिफोर्निया करु शकतो. मात्र त्यासाठी योग्य नियोजन हवे व सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कोकणाला निर्सगाने अमाप सौंदर्य बहाल केले आहे. त्याच आपण उपयोग करु शकतो तसेच त्याजोडीला आंबा, नारळ, काजू या पिकांचे व्यवसायिकदृष्ट्या उत्पादन घेतल्यास कोकण देशाला चांगले उत्पन्न देऊ शकतो. केवळ रुपयात नव्हे तर परकीय चलनाच्या रुपाने देशाच्या तिजोरात भर घालू शकतो. आंबा, काजू या फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आंबा-काजू बोर्डाची सरकारने स्थापना केली आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अर्थात हे बोर्ड संपूर्ण राज्यासाठी असले तरीही याचा सर्वाधिक फायदा कोकणालाच मिळणार आहे. आंबा व काजू या दोन्ही फळांची लागवड कोकणातल्या चारही जिल्ह्यात सुमारे प्रत्येकी दीड लाख हेक्टरहून जास्त भागात केली जाते. यातील सर्वात मोठी लागवड ही सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यात आहे. आंबा हे पिक आपल्याला केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर निर्यात करुन चांगले उत्पन्न देऊ शकते. आपण काही प्रमाणात आंब्याची निर्यातही सुरु केली आहे. मात्र ही बहुतांशी आखाती देशात आहे. अर्थात युरोप, अमेरिकेसारख्या डॉलरच्या देशात निर्यात करावयाची असेल तर त्यासाठी पिक हे सेंद्रीय खताच्या माध्यमातून घेतले गेले पाहिजे. अशा फळांनाचीच निर्यात होऊ शकते व यातून डॉलर कमविण्यात यश येऊ शकते. त्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याची व त्यासाठी पॅकेजिंग कसे करावयाचे, निर्यात कशी करावयाची याचे प्रबोधन करुन त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. सरकारी माध्यमातून हे काम जर प्रभावीपणे होत नसेल तर सरकारच्या मदत निधीतून ही प्रशिक्षणाची जबाबदारी सस्वयंसेवी संघटनांना द्यावी. काजू हे पोर्तुगीजांनी जमीनीची धूप थांबविण्यासाठी आणलेले पीक होते. सुरुवातीला गोव्यात व नंतर हे पीक केरळाच्या किनारपट्टीवर पोहोचले. मात्र केरळने आपल्यापेक्षा काजू उत्पादनात मोठी झेप घेतली. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांना यासाठी राजाश्रय मिळाला. अजूनही आपल्याला ४० टक्के काजू आयात करावा लागतो. आपण जर या पिकाचे उत्पादन वाढविले तर आयात तर थांबेलच शिवाय निर्यातही आपण करु शकू. आंबा व काजू व नारळ ही तीन पिके अशी आहेत की यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. या पिकांच्या उत्पादनांवर प्रक्रिया करणारे अनेक लहान-मोठे उद्योग उभे राहू शकतात. नुसता आंबएा विकण्यापेक्षा आंब्याचा पाक किंवा आंबेवडी विकण्यात जास्त फायदा आहे. त्यामुळे केवळ फलोत्पादन काढून न थांबता त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु झाले पाहिजेत. एकीकडे फलोत्पादन करीत असताना कोकणाला पर्यटनाच्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा या राज्यात जगातून पर्यटक येतात. गोवा आणि सिंधुदुर्ग यातील सौंदर्यात काडीचाही फरक नाही. असे असले तरी गोव्याने आपल्या पर्यटनाच्या संकल्पनेची विक्री केली आहे. सिंधुदुर्गाने आपल्याकडे चांगल्या पायाभूत सुविधा पुरविल्यास तसेच आपले मार्केटिंग केल्यास गोव्यातील पर्यटकांचे पाय सिंधुदुर्गाकडे वळतील. सिंधुदुर्ग जिल्यात आता विमानतळाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईहून चार पदरी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले आहे. अनेक किनारपट्टीच्या बाजूला तारांकित व लहान-मोठी हॉटेल्स उभी राहात आहेत. यामुळे कोकणाचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. कोकणाचा विकास हा अशा प्रकारे मोठे औद्योगिक प्रकल्प उभारुन नव्हे तर निर्सगाशी जवळीक साधाणार्‍या उद्योगातून होणार आहे. त्याच्या जोडीला कोकणातील बंदरांचा विकास करण्याची गरज आहे. याच बंदरातून मालाची निर्यात करता येणार आहे. त्यामुळे एकीकडे फलोत्पादन, त्यावर आधारित उद्योगांची उभारणी करुन कोकणात रोजगांची संधी निर्माण करता येणार आहे. तर दुसरीकडे पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाला जागतिक नकाशावर नेले जाऊ शकते. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर आज अनेक वीज निर्मिती प्रकल्प उभे राहात आहेत. यामुळे येथील निसर्गाचा तोल मात्र ढासळत आहे. त्यामुळे कोकणातल्या निर्सगाचा र्‍हास न होणारे उद्योग इथे विकसीत करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने पर्यटन उद्योग तेथे वरदार ठरु शकतो. यातूनच कोककणाचा कॅलिर्फोनिया होईल.
------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel