-->
लाल वादळ

लाल वादळ

बुधवार दि. 02 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
लाल वादळ
सोमवारी अलिबागेत जिकडे पहावे तिकडे लालबावटाच फडकताना दिसत होता. अलिबाग तालुका शेकापचाच बालेकिल्ला आहे हेच यामधून अधोरेखीत झाले. सकाळी नऊ पासूनच शेकापचे शेतकरी भवन कार्यकर्त्यांनी फुलून गेलेले होते. हे लाल वादळ आले होते आमदार पंडितशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. या मतदारसंघातून अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिला कार्यकर्त्यांची संख्याही नजरेत भरणारी होती. गळ्यात शेकापचा स्कार्फ परिधान करुन आणि हातात लाल बावटा अभिमानाने फडकावित हे कार्यकर्ते अलिबागेत उपस्थित होते. सध्या गेले काही महिने सर्वांना ओढा सत्तेच्या मखरात बसण्याचा ध्यास लागलेला असताना अलिबाग मतदारसंघात मात्र लाल बावट्याचेच वादळ असणार आहे, हे सिद्द झाले. सध्या सत्ताधार्‍यांच्या सुडाच्या राजकारणाबाबत जनतेच्या मनात चिड आणि संताप निर्माण होत आहे. वेगवगेळ्या खोटया प्रकरणात नेत्यांना गोवण्याची घाणेरडी राजनिती केली जात आहे. त्याचा प्रत्यय शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर इडीची खोटी कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचा प्रकार केला गेला. मात्र हे त्यांच्याच आंगलटी आले व त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची नामुष्की स्तताधार्‍यांवर आली. यामुळे इडीचे हसे आणि सरकारची नालस्ती जगभरात झाली. अशा या तप्त राजकीय वातावरणात ही निवडणूक होत आहे. अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला असल्यामुळे येथून पुन्हा एकदा पंडितशेठ पाटील निवडून .येणार यात काहीच शंका नाही. राज्यातील व केंद्रातील जातियवादी सरकारच्या विरोधात कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, दोन्ही कम्यूनिष्ट पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे राजकारण पुढे नेत ते टिकविण्याचे भूमीका घेतेली आहे. त्यासाठी प्रामुख्याने शेकापक्षाने पुढाकार घेतला. लोकसभा निवडणुकीला आम्हाला जागा नको परंतु आमच्या विचारांच्या उमेदवारांना समर्थन देण्याची भूमिका शेकापने घेतली. त्यातूनच सुनिल तटकरे यांना लोकसभेवर पाठविण्यात यश आले. आता राज्यातील राजकारणाची वेळ आली आहे. गेली अनेक वर्षे अलिबागमध्ये लाल बावटाच फडकतोय. नाना पाटलांपासून या तालुक्यामध्ये नाना कुंटे असतील, यमुताई भीडे, दत्ताजीराव खानविलकर, मधू पाटील, नारायणराव भगत हे शेकापच्या विरोधात लढले. पण त्यांची सामाजिक आणि राजकीय उंची ही वेगळी होती. लढाईमध्ये देखील चिड होती. हे सर्व उमेदवार जनतेच्या बांधीलकीचे होते. यांचे आताचे उमेदवार यांची बांधीलकी ती काय? सध्या जमीनीच्या दलालींचे व्यवहार करणारे आता नेते म्हणून जनतेत फिरत आहेत. हे खेदजनक आहे. शेकापने असले राजकारण कधीच केले नाही. जनतेच्या बाजूनेच नेहमी राहून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यातूनच अलिबाग तालुका शेकापच्या बाजूने नेहमीच उभा राहिला आहे. आता केवळ पैशाचे व स्वार्थाचे राजकारण झाले आहे. प्रत्येक निवडणूकीत विचार व पक्ष बदलणारे लोक आता नेते म्हणवून घेत आता मतांचा जोगवा मागित आहेत. त्याना अर्थात जनता धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाही. पंडितशेठनी पाच वर्षामध्ये विधीमंडळात विविध विषयावर विशेषतः ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब जनतेचे प्रश्‍न समर्थपणे आणि पोटतिडकीने मांडले आहेत. अनेक विकासांची कामे सरकारदरबारातून मार्गी लावली आहेत. त्यातून येथील जनतेला बर्‍यापैकी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पंडीत पाटील यांचा विजय निश्‍चित आहे. शेकापने आजवर नेहमीच गोरगरीब कष्टकरी, श्रमजीवींचे राजकारण केले आहे. या जिल्ह्यातला आणि तालुक्याचा जो विकास आहे, गावोगावचे रस्ते, पाणीपुरवठा योजना आहेत, त्या आमदारांनी समर्थपणे सोडविल्या आहेत. गेल्या काही वर्षात अलिबाग नगरीचा चेहरामोहरा बदण्यात शेकापचा मोठा वाटा आहे. एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून येथे लोक येतात. त्यातून येथील जनतेच्याही हातात चार पैसे खुळखुळतात. किहीमच्या समुद्रकिनार्‍याचा विकास केल्यामुळे तेथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. त्याकाळी आमदारकी म्हणून दत्ता पाटील यांनी चालविली त्यानंतर जयंत पाटील यांनी व पंडितशेठ यांनी चालविली. नाना कुंटयांनी देखील समर्थपणे कामे केली. शेकापने गेल्या काही वर्षात विकासगंगा येथे आणली आहे. या तालुक्यातील प्रमुख रस्ते केले. मांडवा-अलिबाग रस्ता खराब होता. आता हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला आहे. आता अलिबाग-रोहा या रस्त्याचे काम होणार आहे. या रस्त्याचे काम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरु होईल. शेकापने ज्याप्रकारे विकास कामे केली आहेत त्याचप्रमाणे शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणी टिकविण्याचेही काम यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याची वेळ आली आहे. सध्याचे सरकार हे सत्तेतून जाण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण या सरकारने कोणतेच काम केलेले नाही. केवळ प्रसिध्दीच्या माध्यमातून विकास कामे केल्याचा भास केला जात आहे. समाजातील सर्वात मोठा वर्ग असलेला शेतकरी आज आत्महत्या करीत आहे. तरी या सरकारला त्याचे काही देणेेघेणे नाही. त्यासाठीच यावेळी राज्यात सत्तांतर आवश्यक ठरले आहे. त्यासाटी पंडितशेठ पाटील यांचे हात बळकट करुन त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.
--------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "लाल वादळ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel