-->
कोठारांचे शहर

कोठारांचे शहर

संपादकीय पान मंगळवार दि. ३० जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोठारांचे शहर
मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीत अनेक लहान-मोठी शहरे गेल्या चार दशकात विकसीत झाली. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात म्हणजे आताच्या ठाणे व डहाणू जिल्ह्यात एकूण सहा महानगरपालिका अस्तित्वात आहेत. अशा प्रकारे एवढ्या कमी अंतरावर असलेल्या महानगरपालिका आढळणे फारच कमी. त्यातुलनेत रायगड जिल्ह्यात पनवेल वगळता तशी मोठी शहरे विकसीत झाली नाहीत. पनवेलला गेल्या दोन दशकात लोकल पोहोचली आणि याचे रुपांतर बहुभाषिक महानगरात होऊ लागले. मुंबईचे उपनगर झाल्यासारखेच पनवेल झाले. ठाणे व रायगड जिल्ह्यातील बेचक्यात वसलेले आणखी एक शहर म्हणजे भिवंडी. सध्याच्या पंतप्रधांनांच्या स्मार्टसिटीमध्ये या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या शहराकडे गेल्या काही महिन्यात अनेकांचे लक्ष लागले आहे. खरे तर मुस्लिमबहुल असलेल्या या शहराकडे दंगलींचे शहर म्हणून पूर्वी पाहिले जायचे. येथे काहीना काही तणाव निर्माण झाला की लगेच हिंदु-मुस्लिम दंगली या ठरलेल्या. पोलिसांनी येथे प्रथमच मोहल्ला कमिटीचा प्रयोग राबविला व येथील दगंलींना आळा बसला. त्यामुळेच भर मुंबईत ९१साली दंगली पेटल्या असताना हे शहर मात्र शांत होते.
त्यानंतर या शहराने काही अपवाद वगळता दंगल पाहिली. त्यामुळे दंगलींचा लागलेला कलंक या शहराने मिटविला आहे. आणखी एक या शहराचे वैशिष्ट्‌य म्हणजे भारताचे मँचेस्टर म्हणावे अशा मोठ्या संख्येने हातमाग व वीजमाग येथे आहेत. ८२ सालच्या मुंबईतील गिरणी संपानंतर येथे हातमाग जोरात धावू लागले व मुंबईच्या गिरण्यांची कसर या शहराने भरुन काढण्यास सुरुवात केली. त्याकाळी अनेक गिरण्यांच्या मालकांनी मुंबईतील गिरण्या बंद असल्याने भिवंडीतून कपडा तयार करुन
त्यावर आपला ब्रँड चिकटवून माल बाजारात आणला होता. भिवंडीच्या वस्त्रोद्योगाला कधीच ओहटी लागली नाही. आजही तेथील वीजमाग जोरात सुरु आहेत व त्यासाठी उत्तरप्रदेश, बिहारमधून मजुरांची आयात होत असते. या मजुरात मोठ्या संख्येने मुस्लिम असतात. आता गेल्या पाच-सात वर्षात या शहराने मोठ्या प्रमाणावर कात टाकली आहे. येथील वस्त्रोद्योग एकीकडे जोरात सुरु असताना अनेक कंपन्यांची वेअरहाऊस (कोठारे) आल्याने येथील अर्थकारण पूर्णपणे बदलले आहे. फ्लिपकार्डपासून अनेक इंटनेट कंपन्यांची कोठारे इकडे वसली आहेत. गेल्या काही वर्षात या कंपन्यांनी येथील गावकर्‍यांकडून स्वस्तात जमीनी घेतल्या. मात्र आता येथील शेतकरी शहाणा झाल्यावर तो जमिनी विकत नाही तर तो भाडे पट्टीने कंपन्यांना आपली जमिन देतो. यात दोघांचा फायदा होतो. कंपन्यांना कमी गुंतवणूक करावी लागते तर शेतकरी आपली जमीन आपल्या ताब्यात ठेवून भाडे कमवितो. आता या परिसरातील शेती जवळपास संपली आहे. त्याएवजी कोठारांची शेती जन्माला आली आहे. आजवर येथे किती कोठारे आहेत त्याची अधिकृत पहाणी झालेली नाही. मात्र हजारोंच्या संख्येने ती आहेत. मुंबई-ठाण्यापासून हे शहर जवळ असल्याने तसेच जे.एन.पी.टी. बंदर हाकेच्या अंतरावर असल्याने या शहरात कोठारे उभारणे कंपन्यांना फायदेशीर ठरते. तसेच येथे जकात नसल्याने आर्थिकदृष्ट्‌याही परवडते. या सर्व जमेच्या बाजू असल्याने येथे मोठ्या प्रमाणात कोठारे उभी राहिली. मात्र या नव्या उद्योगामुळे भिवंडीचा चेहरामोहरा पार बदलत चालला आहे. तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या कोठारांमध्ये अनेकदा ए.सी. असेलल्या कोठारात बसून नोकरी करुन या तरुणांना पंधरा हजारांचा रोजगार मिळतो. त्याउलट पूर्वी वीजमाग चालविताना फारच कष्ट पडायचे. त्यामुळे ठाणे जिल्हियातील स्थानिक तरुण येथील कोठारांमध्ये काम करण्यास उत्सुक असतो. त्याशिवाय येथे छपाई उद्योगापासून जवळजवळ प्रयेतक उद्योग वसला आहे. मुंबईतील जागांच्या किंमती जशा महाग होत गेल्या तसेच रोजगारांचे दर वाढू लागले तसा मुंबईतला छपाई उद्योग पहिला भिवंडीला स्तलांतरीत झाला व गेल्या काही वर्षात स्थिरावला देखील. अशा प्रकारचे मुंबईतून
स्थलांतरीत झालेले अनेक उद्योग येथे डेरेदाखल झाले आहेत. एक काळ असा होता की, भिवंडीत घर घ्यावयाचे असेल तर कुणी गृहकर्ज देत नसे. आता मात्र ही परिस्थिती राहिलेली नाही. अनेक मोठे गृहप्रकल्प येथे उभारले जात असून कर्जही अनेक बँका, वित्तसंस्था देतात. परंतु येथील कंपन्यात काम करणारा अधिकारी वर्ग मात्र मुंबई-ठाण्यात राहणे पसंत करतो. मजूर मात्र स्थानिक पातळीवर राहातात. मात्र चांगले गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिल्यावर या परिस्थितीतही सुधारणा होईल. गेल्या दशकात भिवंडी झपाट्याने बदलले असले तरीही आता हे शहर आणखी स्मार्ट होणार आहे. वस्त्रोद्योगाचा पारंपारिक व्यवसाय आता कमी होत
चालला असून त्याजागी कोठारांचा व्यवसाय चांगलाच आकार घेत आहे. भविष्यात हे शहर कोठारांचे शहर म्हणून देशात नावारुपाला येईल यात काही शंका नाही. आता हे शहर स्मार्ट होणार म्हणजे नेमके काय होणार याचा आराखडा अजून काही जाहीर झालेला नाही. परंतु त्यापूर्वीच हे शहर आता स्मार्ट होऊ लागले आहे. या शहरास जर खरोखरीच चांगल्या पायाभूत सुविधा लाभल्या तर हे शहर देशातील एक आदर्श शहर ठरु शकते.
-------------------------------------------------------------------

0 Response to "कोठारांचे शहर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel