-->
संपादकीय पान गुरुवार दि. १९ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
आता गुणवत्ता वाढवा...
-------------------------------
दहावीचा निकाल अपेक्षेपेक्षा उशीराच लागला असला तरीही निकालाची टक्केवारी पाहून समाधान वाटेल अशीच स्थिती आहे. कारण यंदा कधी नव्हे एवढी विक्रमी मुले पास झाली आहेत. कोकणाने तर यंदा पुन्हा एकदा राज्यात बाजी मारली आहे. त्यातच महत्वाचे म्हणजे कोकणातील मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे. राज्यात परीक्षा दिलेल्या एकूण १५,४९,७८४ विद्यार्थ्यांपैकी १३,६८,७९६ विद्यार्थ्यांनी यंदा उत्तीर्ण होण्यात यश मिळविले. ही ८८.३२ टक्क्यांची, बोर्डाच्या इतिहासामधील सर्वोच्च टक्केवारी आहे. यंदाही ९०.५५ टक्के विद्यार्थिनींनी यश मिळवित विद्यार्थ्यांवर चार टक्क्यांंची आघाडी घेतली आहे. दहावीची परीक्षा हा पूर्वी अनेकांच्या शैक्षणिक करिअरमध्ये मोठा अडथळा ठरत असे. गणित-इंग्रजी हे तर घातविषय म्हणून धडकी भरविणारे ठरत होते; पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मार्कांची ही खैरात आणि गुणवत्तेचे पातळीकरण कशासाठी, असा सवालही शिक्षणविश्वातून उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात एस.एस.सी. बोर्ड विरुध्द सी.बी.एस.सी. बोर्ड अशी एक छुपी तर कधी उघडपणे स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेतून सी.बी.एस.सी.ने बाजी मारण्यास सुरुवात केल्यावर एस.एस.सी. बोर्डाने मग मागे का रहावे असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातूनच बेस्ट ऑफ फाईव्हचा जन्म झाला. अर्थात यातून मुलांची गुणसंख्या वाढली हे खरे असले तरीही ही गुणात्मक वाढ काही पुऱेशी नाही. दहावीचे गुण हे सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअरची पहिली पायरी असल्याने त्या गुणांना विशेष महत्व प्राप्त होते. मात्र केवळ गुण मिळून प्रगती साधता येत नाही तर त्या विद्यार्थ्याची गुणात्मक वाढ झालेली असेल तर तो आयुष्यात चांगला तग धरु शकतो. मौखिक-प्रात्यक्षिक परीक्षापद्धतीच्या माध्यमातून गुणवाढ करण्याची शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्यात आली. दुसरीकडे, गणित-विज्ञानापासून प्रारंभ करीत देशभरातील सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमाचे समानीकरण करण्यासाठी संशोधन सुरू झाले. २०११ साली दहावीचा निकाल ७१.०४ टक्के लागला, तर आता त्याने ८८.३२ टक्क्यांवर भरारी घेतली आहे. राज्यातील विद्यार्थी-शिक्षक आणि पालकांच्या परिश्रमाचे हे यश आहेच, मात्र वाढलेल्या गुणांचे गुणवत्तेत रूपांतर झाले आहे काय, या प्रश्नाचे शिक्षणविश्वाने प्रामाणिक उत्तर शोधले पाहिजे. शिक्षणहक्कानुसार आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात बसणारा धक्का, ज्युनिअर कॉलेज आणि विद्यापीठीय उच्चशिक्षणातील विसंवाद, उद्योगविश्वाचा शिक्षणव्यवस्थेकडून होणारा अपेक्षाभंग, ७५ टक्के इंजिनीअर ज्ञान-कौशल्याच्या कसोटीला पात्र ठरत नसल्याचा मनॅसकॉममकडून देण्यात येणारा अहवाल गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो नाही तर काय? आपण अशा प्रकारे केवळ गुणाच्या दर्ज्यावर भर देत आपली शिक्षण व्यवस्था खिळखिळी करीत आहोत. त्यामुळेच आपल्याकडे उच्च शिक्षणासाठी गुणांची पध्दत बंद करुन श्रेणींचा मार्ग अवलंबिण्यात आला आहे. अशा प्रकारे जगात जी प्रचलित पध्दत आहे त्याचा अवलंब केल्यामुळे येत्या दहा वर्षात आपल्याकडे आमुलाग्र शैक्षणिक बदल होणार आहेत. कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम राबवून चीनने आपल्या शैक्षणिक ढाचाच बदलून टाकला व त्याचा सकारात्मक परिमाम दिसू लागले. आपल्याकडेही तसे दृश्य परिणाम दिसले पाहिजेत. त्यासाठी केवळ गुणांचा विचार करुन वा त्यावर झालेल्या प्रगतीचा विचार करुन समाधान मानता येणार नाही. कोकण विभागाने ९५.५७ टक्के यश मिळवित राज्यात अव्वल स्थान पटकावले. गुण आणि गुणवत्ता ही केवळ पुण्या-मुंबईसारख्या काही शहरांचीच मक्तेदारी राहिलेली नाही, हेही पुन्हा सिद्ध झाले आहे. तिची मशागत करण्यासाठी, तसेच सातत्याने यश मिळविणार्‍या मुलींसाठी उच्चशिक्षणाची संधी अधिक व्यापक करण्यासाठीही आपण अजून प्रभावी पावले उचललेली नाहीत. आजही आपल्याकडे ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा नाहीत. त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहेच. मात्र असे असून देखील आपल्याकडे ग्रामीण भागातील मुले चांगल्या तर्‍ह्नेने गुण मिळवून पुढे येत आहेत ही फार समाधानाची बाब आहे. त्यातच कोकण विभागात मुलींनी मारलेली बाजी ही अत्यंत आश्‍चर्यकारकच म्हटली पाहिजे. कारण आपल्याकडे मुलींना शिक्षणाच्या मर्यादीत संधी मिळतात आणि ज्यांनी ही संधी मिळते त्या मुली मिळालेल्या संधीचे सोने करीत आहेत. शहरी भागातील मुलांना अनेक नव्या संधींची दालने लवकर खुली होत असतात. मात्र त्या तुलनेत ग्रामीण भागात अनेक मर्यादा येतात. मात्र असे असले तरी त्या आव्हानांवर मात करीत ही मुले यशाची शिखरे गाठत आहेत. दहावी हा पुढील शिक्षणाचा पाया असल्याने या पाया पक्का होणे अत्यंत गरजेचे आहे. यंदा उत्तीर्ण झालेल्या ८८ टक्क्यांपैकी ३५ ते ९० टक्के गुण मिळवणार्‍यांचे प्रमाण यंदाही मोठे आहे आणि त्यांचे पुढे काय होणार आहे, याचा विचार करणार्‍यांस उच्च शिक्षणाचे धिंडवडेच ठळकपणे दिसतील. या वास्तवाकडे आपण दुर्लक्षून चालणार नाही. आजही आपल्याकडे अनेक शाळांमध्ये पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मुलाला दुसरी इयत्तेतील धडा वाचता येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे आपल्याकडे पास झालेले जास्त दिसत असले तरी त्यांचे गुण हे कमी आहेत. त्यामुळे सारासार विचार करता शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. कारम केवळ ढीगाने मुले पास झाली म्हणजे आपला दर्जा सुधारला असे नव्हे. तर त्यांची गुणवत्ता चांगल्या रितीने वाढणे गरजेचे आहे. पास झालेल्या मुलांचे अभिनंदन करीत असताना या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel