-->
संपादकीय पान मंगळवार दि. २२ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
--------------------------------------------
ज्वालामुखीच्या स्फोटावर मुंबई
-------------------------------------------
मुंबईतील अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्क या व्यापारी संकूलाला गेल्या आठवड्यात मुंबईला लागलेली आग पाहता मुंबई ज्वालामुखीच्या स्फोटावरच उभी आहे असे म्हणावे लागेल. मुंबईतील पश्चिम उपनगरातील पॉश एरियातील असलेल्या या व्यापारी संकूलात अभिनेता ऋतित रोशन याच्या मालकिचे पाच मजले होते. मात्र या इमारतीला महानगरपालिकेचा इमारत वापरण्याचा परवाना अद्याप मिळालेला नव्हता. या विभागात एवढ्या दाटीवाटीने इमारती बांधलेल्या आहेत की, अग्निशामक दलाच्या बंबांना येथे सहजरित्या प्रवेश करणे कठीण होते. त्याचबरोबर ही इमारत २१ मजली असूनही त्याच्या भोवती आवश्यक तेवढी रिकामी जागा कमी होती. त्यामुळे अग्निशामक दलाच्या यंत्रणेला आपल्या मोठ्या शिड्या येथे उभ्या करणे अशक्य झाले होते. या इमारतीला कॉपोर्रेट लूक देण्यासाठी ग्लेझिंग ग्लासेस लावण्यात आल्या होत्या. या काचांमुळे इमारती चकाचक दिसतात मात्र यातून आग झपाट्याने पसरते आणि अग्निशामक यंत्रणेला आग विझवताना मोठी अडचण निर्माण होते. या इमारतीची आग विझवताना अग्निशामक दलाचा जवान नितीन इवलेकर हा शहीद झाला आहे. अग्निशामक दलाकडे आग विझविण्याच्या शिड्या वगळता कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नाही, ही दुदैवाचीच बाब म्हटली पाहिजे. कारण एक कोटीहून जास्त लोकसंख्या असलेल्या या महानगरात अनेक टॉवर्स आता झाले आहेत, मात्र तेथे आग लागल्यास ती विझविण्याची कोणतीही यंत्रणा न उभारता या परवानग्या देण्यात आल्याने तेथे राहाणार्‍या लाखो लोकांचे जीव हे धोक्यात आले आहेत. लोटस बिझनेस पार्क ही इमारत बाहेरुन कितीही पॉश दिसली तरीही त्यातील आग विझविण्यासाठी असलेल्या यंत्रणेत पाणीच नव्हते. जर ही इमारत व्यापारी संकूल नसती व निवासी संकूल असती तर येथे अनेकांचे जीव गेले असते. त्यातच ही आग सकाळी लागल्याने या व्यापारी संकुलात कुणी कर्मचारी नव्हते. या आगीतून शहाणे होत राज्य अग्निसुरक्षा संचालक काचेच्या इमारतींवर बंदी घालण्याची शिफारस करण्यात येणार आहे. यापूर्वी देखील या कांचांवर बंदी घालण्याची चर्चा झाली होती. परंतु आपल्याकडे फक्त चर्चाच होते, एखादी दुर्घटना झाल्यावर पुन्हा त्याची जाग येते.लोटस पार्कच्या आगीच्या निमित्ताने मुंबईकर आपले जीव धोक्यात टाकून कसे जगत आहेत व महापालिकेचे प्रशासन कसे ढिम्मपणाने हे चालवून घेते याचे दर्शन झाले आहे. मुंबईत आता मोठे-मोठे टॉवर्स उभारले जात आहेत. मुंबईच्या आलिशानतेत यामुळे भर पडत असली तरीही हे टॉवर मंजूर करताना त्यासाठी जी सुरक्षा यंत्रणा लागते त्याचा पूर्णपणे अभाव आहे. त्यामुळे आग असो किंवा कोणतीही नैसर्गीक आपत्ती असो त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा या महानगरात उपलब्ध नाही. एखाद्या टॉवरला आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशामक दलाकडे कोणतीही यंत्रणा नाही. अग्निशमक दलालकडे पारंपारिक यंत्रणेच्या व्यतिरिक्त जर अत्याधुनिक उपकरणे असती तर कदाचित इवलेकर या जवानाचा प्राण वाचला असता. मुंबईसारखे महानगर अक्राळविक्राळरित्या वाढले आहे. परंतु त्यात कोणतेही नियोजन नाही. जी पारंपारिक यंत्रणा आहे त्यावर जास्त भर पडत आहे. पूर्वी ब्रिटीश काळात प्रत्येक रस्त्याच्या बाजूला पाईपलाईन होती व आग विझविण्यासाठी त्यातून पाणी घेतले जात असे. आता ही यंत्रणा संपूर्णपणे मोडीत निघाली आहे. अर्थात ही जुनी यंत्रणा मोडीत काढली असताना कोणतीही पर्यायी नवीन यंत्रणा उभारण्यात आलेली नाही हे दुदैव. या महानगरातील जनजीवन केवळ राम भरोसे चालत आहे. जोपर्यंत एखादी दुर्घटना होत नाही तोपर्यंत कुणालाच जाग येत नाही. दुर्घटना घडल्यावर मात्र अचानक जाग येते. काही महिन्यात ही घटना विसरुन पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती राहाते. परंतु प्रत्येक बाबींचा आपत्कालीन विचार करुन अगोदर यंत्रणा उभारली गेली पाहिजे, याचा विचार काही होत नाही.
           

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel