-->
१७ नोव्हेंबरसाठी पान १ अग्रलेख-- 
-------------------------------------------
कृतार्थ!
--------------------------
क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याने वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात २००वी कसोटी खेळून घेतलेल्या निवृत्तीच्यावेळी केलेले भाषण प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. ज्येष्ठ क्रिकेटवीर सुनिल गावस्कर याचेही डाळे सचिनच्या निवृत्तीने पाणावणे यात आपण एक चांगला खेळाडू आजपासून टीममध्ये नसणार याचे दुख: व्यक्त करीत होते. एका कृतार्थ वृत्तीने त्याने कसोटी सामन्यात खेळण्याला त्याने विराम दिला आहे. सचिन खरोखरीच कृतार्थ आहे. कारण त्याला क्रिकेटने भरभरुन दिले आहे. त्याच्या नावावर असलेले विश्‍वविक्रम, त्याला मिळालेला मान-सन्मान, क्रिकेटरसिकांचे प्रेम या सगळ्याच बाबतीत तो कृतार्थ आहे. भारत सरकारने त्याला भारतरत्न किताब देऊन त्याच्या क्रिकेटमधील कार्याची पोचपावतीच दिली. हा किताब मिळालेला सचिन सर्वात तरुण भारतीय ठरणे हा त्याच्या कर्तृत्वाचा आणखी एक शिरोपात खोवलेला तुरा ठरावा. त्याच्या शेवटच्या भाषणात त्याचे पाणावलेले डोळे आणि त्याने स्टेडियमवरुन चाहात्यांना केलेला शेवटचा सलाम हे सर्वच कृतार्थतेचे दर्शन देणारे होते. मात्र असे असले तरीही क्रिकेट हा सचिनचा श्‍वास आहे त्यामुळे तो निवृत्त झाला असला तरीही त्याच्या श्‍वासाश्‍वासात-नसानसात क्रिकेट राहाणारच आहे. सचिन स्टेडियमवर खेळावयास नसेल पण मनाने प्रत्येक सामन्यात तो क्रिसवरच असेल. क्रिकेटच्या सामन्यात आपण नाही ही कल्पनाच आता सहन होत नाही हे त्याचे उद्दगार फार बोलके आहेत. क्रिकेटच्या रसिकांना पुढील सामन्यात सचिनची निवृत्ती पावलोपावली जाणवेलही. समालोचक त्याचा तसा उल्लेखही करतील. परंतु वयाची चाळीशी लोटल्यावर त्याला कसोटीचा निरोप घेणे क्रमप्राप्त ठरले होते. अजूनही सचिनमध्ये खेळण्याची धमक होती. त्याच्यात तशी उर्मी होती. परंतु सर्वोच्च पदाला असताना निवृत्ती घेण्याचा जो आनंद आहे तो त्याला मिळवायचा होता. त्यामुळे अजूनही आपण खेळू शकतो हे माहित असतानाही त्याने निवृत्ती स्वीकारली. आपल्या रसिकांना एक प्रकारे चटका लावून, त्यांच्या जीवाला घोर लावून सचिन तंबूत परतलाय तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर कधीही न खेळण्यासाठी. क्रिकेटच्या मैदानातून सचिन माघारी परतला असला तरीही त्याला एकूणच क्रीडा विश्‍वासाठी बरेच काही करावयाचे आहे. निदान लोकांकडून तरी त्याबाबत अपेक्षा आहेत. खरे तर त्याने क्रिकेटसाठी फारसे काही करण्याची गरजही नाही. आपल्याकडे साहेबाचा हा खेळ ऐवढा लोकप्रिय झाला आहे की त्यामुळे अन्य खेळ झाकोळले आहेत. भारतरत्न प्राप्त झाल्यावर सचिन हा देशाचा ब्रँड ऍम्बेसिडर झाला आहे, हा ऍम्बेसिडर फक्त क्रिकेटचा नाही तर सर्व खेळाचा असावा अशी अपेक्षा आहे. गेल्याच वर्षी राष्ट्रपतींनी त्याची राज्यसभेचा खासदार म्हणून नियुक्ती केली. ही खासदारकी केवळ मिरविण्यासाठी नाही तर लोकांच्या ज्या क्रिडा संदर्भात अपेक्षा आहेत त्याची पूर्तता या माध्यमातून त्याला करावयाची आहे याची त्याला पूर्ण कल्पना आहे. सचिनने मैदान सोडले म्हणजे आता त्याच्याकडून अपेक्षा संपल्या आहेत असे नव्हे. तर त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. यापूर्वी त्याची बॅट ही धावांचा डोंगर रचत असे, आता त्याला एकूणच क्रीडा जगताची बॅटिग करावी लागणार आहे. सचिनने देशाची जागतिक क्रीडा क्षेत्रात उंचावली आहे. ज्या देशात क्रिकेट खेळले जात नाही अशा देशातही त्याच्या निवृत्तीची बातमी वृत्तपत्रातून पहिल्या पानावर घेतली जाते किंवा त्याच्यावर लेख लिहिले जातात यावरुन सचिनचे मोठेपणा जगाने मान्य केला आहे.
---------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel