-->
कोकणातील मोठी संधी

कोकणातील मोठी संधी

संपादकीय पान बुधवार दि. ०६ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकणातील मोठी संधी
नवरत्नांमध्ये गणल्या जाणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या एकत्र येऊन देशातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असून, त्यासाठी नेमके ठिकाण अद्याप ठरले नसले तरी कोकणात दोन-तीन ठिकाणी त्यासाठी शोध सुरू आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता कोकण हे या प्रकल्पासाठी योग्य ठरणार आहे. हा प्रकल्प पश्चिम किनारपट्टीवर उभारणे नैसर्गिक लाभाचे ठरेल. कारण आखाती देश, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतून सागरी मार्गाने खनिज तेल येथे आणणे सोईचे ठरते. हाच प्रकल्प पूर्व किनारपट्टीवर उभारला तर आयात खनिज तेलाचा वाहतूक खर्च बॅरलमागे एक डॉलरने वाढेल. तसेच मागणी असलेल्या देशांतर्गत बाजारपेठेत येथून तयार तेल उत्पादने पाठविणेही सुलभ पडेल. इंडियन ऑइलचे सध्याचे सर्व तेल शुद्धीकरण कारखाने प्रामुख्याने उत्तर भारतात असल्याने तेथून दक्षिण व पश्चिम भारतात माल पुरविणे अडचणीचे ठरते. त्यामुळे इंडियन ऑइल पश्चिम किनार्‍यावर नवा कारखाना काढण्याच्या विचारात होतीच. भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम यांचे मुंबईत तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. परंतु वाढती मागणी पूर्ण करण्यास ते कमी पडतात. आताचा नवीन प्रकल्प हा
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सर्वात मोठ्या सरकारी तेल कंपन्या व इंजिनीअर्स इंडिया लि. ही आघाडीची सरकारी अभियांत्रिकी कंपनी मिळून हा महाकाय प्रकल्प उभारणार आहेत. यासाठी १२ ते १५ हजार एकर जागा लागेल व त्यादृष्टीने कोकणात दोन ठिकाणांचा शोध घेण्यात येत आहेे.
देशातील आजवरच्या सर्वात मोठया अशा या पेट्रोकेमिकल प्रकल्पाची वार्षिक क्षमता ६० दशलक्ष टन असेल व त्याच्या उभारणीसाठी सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्याची योजना आहे. जमीन संपादन पूर्ण झाल्यापासून पाचते सहा वर्षांत पहिला टप्पा उभारून पूर्ण होईल. त्यानंतर ५० ते ६० हजार कोटी रुपये खर्चाचा दुसरा टप्पा हाती घेण्यात येईल. या पेट्रोकेमिकल प्रकल्पात पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) व विमानाच्या इंधनाखेरीज इतर पेट्रोजन्य पदार्थांचे उत्पादन होईल. येथून महाराष्ट्रातील प्लास्टिक, रसायने व कापड उद्योगांसाठी कच्चा मालही पुरविला जाऊ शकेल. हा येऊ घातलेला प्रकल्प हा कोकणाच्या विकासासाठी एक मोठी संधीच घेऊन आला आहे. मात्र जैतापूरच्या धर्तीवर याला विरोध होता कामा नये, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "कोकणातील मोठी संधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel