-->
संपादकीय पान शनिवार दि. १ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
अखेर सुब्रोतो रॉय बे सहारा
------------------------
गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी बुडवणारे आणि वारंवार न्यायालयात हजर राहातो असे सांगून अनुपस्थित राहाणारे सहारा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी अखेर शुक्रवारी  लखनऊ पोलिसांपुढे शरणागती स्वीकारली. येत्या चार मार्च पर्यंत सुब्रतो रॉय पोलिस कोठडीत असतील. या कालावधीत लखनऊ पोलिस वादग्रस्त आर्थिक व्यवहारांप्रकरणी त्यांची चौकशी करतील. तीन दिवसांपूर्वी सुब्रतो रॉय यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने कोर्टात हजर राहाण्याचे समन्स बजावले असतानाही सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना अटक करण्याचे आणि चार मार्च रोजी दुपारी दोन वाजता कोर्टात हजर करण्याचे आदेश लखनऊ पोलिसांना दिले होते. बुधवारी रॉय यांच्याविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते. हे वॉरंट निघाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी सुब्रतो रॉय यांच्या घरी छापा टाकला होता. मात्र सुब्रतो रॉय घरी नव्हते, त्यामुळे पोलिसांनी ज्या ठिकाणी ते असतील अशा अन्य ठिकाणी शोध घेण्याचे संकेत दिले. आपल्या ९२ वर्षांच्या आजारी असलेल्या मातोश्रीच्या जवळ आपण आहोत असा बनाव त्यांनी केला होता. मात्र ते तेखील खोटे असल्याचे सिध्द झाले. कारण पोलिस त्यांच्या घरी गेले असता ते सापडले नव्हते. चिट फंडाच्या माध्यमातून सहारा समुहाने गुंतवणूकदारांकडून २० हजार कोटींचा निधी उभा करून मुंबईतील उपनगरांत तेवढ्याच किमतीचे दोन भूखंड खरेदी केले. मात्र, गुंतवणूकदारांना पैसे परत न मिळाल्याने सुब्रतो रॉय यांच्या विरोधात गुंतवणूकदार कोर्टात गेले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्याचे पालन रॉय यांनी केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याचाही खटला लादला होता. सुब्रोतो रॉय हे गेल्या वीस वर्षात एकदम प्रकाशझोतात आले होते. त्यांनी चीट फंडाच्या माध्यमातून जी माया जमविली होती त्याबद्दल अनेकदा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते. सुब्रोतो यांच्याकडे अनेक राजकारण्यांनी पैसा गुंतविल्याची चर्चा सर्वत्र जोरात होती. त्यांनी ज्या झपाट्याने पैसे जमवून गुंतवणूक केली होती ती पाहता रॉय यांचे व्यवहार काही कष्टाच्या पैशाचे नाहीत हे सिध्द होते. विमानसेवा, चीट फंड, म्युच्युअल फंड, बांधकाम, माध्यम या क्षेत्रात सहारा समूहाची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक होती. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे यातील बहुतांशी व्यवहार तोट्यात असूनही त्यांचा व्यवहार बिनबोभाटपणे सुरु होता. म्हणजे विविध धंद्यात होत असलेला तोटा पचविण्याची ताकद त्यांच्याकडे होती. विमान उद्योगात त्यांनी असाच अनपेक्षितरित्या प्रवेश केला होता. मात्र यात त्यांना काही यश मिळाले नाही आणि त्यांना विमान सेवेत जबरदस्त तोटा सहन करावा लागला होता. या कंपनीला नेमका किती तोटा झाला हे कधीच कुणाला समजले नाही. मात्र त्यांनी ही विमान कंपनी एका झटक्यात जेट एअरवेजला विकूनही टाकली. हा व्यवहार किती कोटींचा झाला हे सर्व गुलदस्त्यातच राहिले. म्युच्युअल फंड सुरु करण्यास त्यांना कोणत्या आधारे रिझर्व्ह बँक व सेबीने परवानगी दिली याची खरे तर चौकशी करण्याची गरज आहे. मल्टिलेव्हर मार्केटींग देखील सुरु करुन त्यांनी अनेकांना टोप्या घातल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर नामवंत अभिनेते अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन त्यांनी देशातील प्रमुख शहरात गृहनिर्माण योजना आखल्याच्या जाहीराती प्रसिध्द झाल्या होत्या. यात लाखो लोकांनी करोडो रुपये गुंतविले होते. अशा प्रकारे सुब्रोतो यांच्या या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यास आता प्रारंभ होईल. यातून अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्याता नाकारता येत नाही. प्रदीर्घ काळ अनेक जे प्रश्‍न सुब्रोतो रॉय यांच्याबाबतीत भेडसावित होते त्याची उत्तरे सापडण्याची आता वेळ आली आहे.
--------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel