-->
संपादकीय पान शनिवार दि. १ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
निष्काळजीपणाचे बळी
-----------------------------
अलिबाग तालुक्यातील भायमळा येथे असलेल्या क्रांती फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्याला गुरुवारी लागलेल्या भीषण आगीत नऊ जण जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात सुमारे २० जण गंभीररित्या भाजले असून त्यातील १६ जण गंभीर असल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे. यात मृत्यूमुखी पडलेले व जखमी असलेले कामगार व त्यांचे कुटुंबिय हे बाहेरगावचे होते. तर अनेक स्थानिक कामगार हे महाशिवरात्री असल्याने सुट्टीवर होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे या कारखान्याला कुलूप लावण्यात आले होते. त्यामुळे येथून निसटणे अनेकांना कठीण गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पुरुष कामगारांनी कंपनीच्या गेटवरुन उड्या मारुन आपला जीव वाचविला. मात्र महिला कामगारांना उड्या मारुन गेटच्या बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही महिला भाजल्या. कंपनीच्या मागील बाजूने काही कामगारांनी उड्या मारुन जाण्याचा प्रयत्न केला. अर्थात अनेकांना तेथून जाणे शक्य झाले नाही. काही काळाने गावकरी तेथे आले व त्यांनी कुलूप तोडून कंपनीतील कामगारांना बाहेर काढले. रायगड जिल्ह्यातील ही एक सर्वात मोठी दुदैवी घटना ठरावी. यात मृत्यूमुखी पडलेले कामगार हे निष्काळजीपणाचे बळी ठरले आहेत. फटाक्यासारख्या संवेदनाशील असलेल्या या कारखान्यात कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीने वेळोवेळी याबाबत कारखान्याना सुरक्षिततेबाबत नोटीसा बजावल्या होत्या. परंतु त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या तीन महिन्यांत कामार्त्रे ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. या काळात बजाविलेल्या तीन नोटीसांना कंपनीने केराची टोपली दाखवली होती. खेर तर नियमानुसार गोदाम व फॅक्टरी यांच्यामध्ये किमान १०० मीटरचे अंतर असावयास हवे. हा नियमही पूर्णपणे धाब्यावर बसविण्यात आला होता. या संबंधी कामार्ले ग्रामपंचायतीने वेळोवेळी लक्ष वेधूनही कंपनीच्या मालकाने आपले नियमबाह्य वर्तन सुरुच ठेवले होते. अशा प्रकारे फटाक्यासारख्या अतिशय ज्वलनशील उत्पादनांची निर्मिती करणार्‍या या कंपनीने सुरक्षिततेसंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज होती. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविण्याचा सपाटा या कंपनीचे मालक सुरेश बोबडे यांनी लावला होता. त्यांच्याच या निष्काळजीपणेमुळे गरीब कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच कामगारांची वस्ती देखील याच कंपनीच्या आवारात ठेवणे चुकीचे होते. मात्र यासंबंधी ही खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे या आगीत भाजणार्‍यांची संख्या वाढली. असा प्रकारे सर्वच नियमांना धाब्यावर बसविणार्‍या बोबडे या मालकाला सर्वात प्रथम गजाआड केले पाहिजे. या आगीचे व स्फोटाचे स्वरुप इतके भयानक होते की, त्याची झळ आजूबाजूंच्या गावालही बसली. आग विझविण्यासाठी तीन बंब घटनास्थळी रवाना झाले होते. उडालेल्या ठिणगींमुळे आजूबाजूला असलेल्या डोंगर व माळरानेही पेट घेतला. त्यावरुन या आगीच्या स्वरुपाची भयानक वास्तवता दिसते. या अपघातातून आपण निदान भविष्यात तरी धडा घेण्याची गरज आहे. आग लागलेल्या या कंपनीच्या शेजारीच असलेल्या दुसर्‍या एका फटाक्याच्याच कंपनीने आपला सर्व माल तेथेच बाजूला उघड्यावर ठेवला होता. अशा प्रकारे निष्काळजीपणा तिकडे आहे. या आगीच्या निमित्ताने आपल्याला अनेक बोध घेता येतील. एक तर फटाक्यांसारख्या अत्यंत ज्वलनशील पदार्थांच्या कंपनीत ज्या सुरक्षा विषयक नियम आखलेले आहेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी दक्षता गेतली पाहिजे. तामीळनाडूतल्या शिवकाशी या फटाक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार्‍या विभागात यापूर्वी अनेकदा असे अपघात झाले होते. मात्र यातून धडा घेत तेथे गेल्या तीन वर्षात अनेक सुरक्षाविषयक खबरदार्‍या घेण्यात आल्या. यामुळे तेथे होणारे संभाव्य अपघात टाळले गेले आहेत. आपल्याकडे रायगड जिल्ह्यात फटाक्याचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होत नसले तरी ज्या काही कंपनी आहेत त्यांना कडक नियम लावून त्याांची अमंलबजावणी केली गेली पाहिजे. आपले प्रशासन किती ढिसाळ आहे याचा उत्तम नमूना म्हणजे याच फटाक्याच्या कंपनीच्या बाजूने गेल या कंपनीची पाईपलाईन जाते. त्यामुळे ही आग या पाईपलाईन पर्यंत पोहोचली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. या पाईपलाईनला परवानगी दिलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित होतो. फटाके हे नेहमीच आनंदाच्या क्षणी लावतात. मात्र या ठिकाणी काम करणारे कामगार मात्र दुसर्‍याच्या आनंदासाठी स्वतचा जीव गमावतात हे विदारक चित्र आपल्याला पहायला मिळते. आपल्याकडे आता बाल मजूर ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर संपुष्टात आली आहे. पूर्वी फटाक्याच्या कारखान्यात जास्त प्रमाणात बालमजूर काम करीत असत. आता ही प्रथा बर्‍याच अंशी बंद झाली आहे. मात्र या कारखान्यात काम करणार्‍या महिला आपल्या तान्हुल्या बाळांसह येत असत. अर्थात अशा प्रकारच्या कंपनीत लहान मुलांना प्रवेश बंदी केली पाहिजे होती. परंतु त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही असे दिसते. किंवा आपल्याकडे एखादी दुर्घटना झाल्यावरच खबरदारीचे उपाय हाती घेतले जातात. या कंपनीत यापूर्वीही छोटे अपघात झाले होते. मात्र कुणी मृत्यूमुखी न पडल्याने या अपघातांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु त्याकडे दुलर्क्ष केल्यामुळेच आता मोठी घटना घडली आहे. आता तरी यातून धडा घेऊन खबरदारीच्या उपाययोजना आखाव्यात.
----------------------------------------    

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel