-->
संपादकीय पान--अग्रलेख--१८ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------------
बाळासाहेबानंतरची शिवसेना
-------------------------
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा काल पहिला स्मृतिदीन झाला. गेल्या वर्षी बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी लोटलेला जनसागर आजही डोळ्यापुढून सरकत नाही. ऐवढा जनसागर लोटलेेली अंत्ययात्रा फारच क्वचितच या मुंबापुरीने पाहिली आहे. बाळासाहेबांनी आपली लोकप्रियता शेवटपर्यंत टिकविली होती. तसेच लोकांच्या मनातील त्यांचे स्थान कधीच ढळले नाही, हेच त्यावरुन सिध्द झाले. लोकप्रियतेच्या लाटेवर अनेक नेते काळाच्या ओघात स्वार झाले. कॉ. एस.ए. डांगेपासून ते डॉ. दत्ता सामंत अशी अनेक उदाहरणे देता येतील परंतु शेवटच्या श्‍वासापर्यंत सर्वसामान्य जनतेचा एवढा विश्‍वास टिकविणारे फारच कमी नेते झालेे. बाळासाहेब हे त्यातील एक होते. त्यांची विचारसरणी कोणतीही असो, एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून आणि एक राजकारणी म्हणूनही बाळासाहेब हे एक वेगळे व्यक्तीमत्व होते. आपल्या कुंचल्याच्या जोरावर त्यांनी अनेकांची व्यंगे उत्कृष्ट रेखाटली. एखाद्याच्या नेमक्या व्यंगावर बोट ठेवून त्याला फटकारे मारण्याचे धाडस बाळासाहेबांकडे होते. यातून बाळासाहेब मोठे हात गेले. खरे तर राजकारण हा त्यांचा काही पिंड नव्हता. परंतु त्याकाळी मराठी माणसाची होत असलेली परवड त्यांना बघवेना झाली आणि त्यातून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. अर्थातच कोणत्याही संघटनेला बळ येण्यासाठी आर्थिक वा राजसत्तेचा पाठबळ असावे लागते. हे बळ तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिवसेनेला दिले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ही वसंतसेना म्हणून ओळखली जात असे. कॉँग्रेसला कम्युनिस्टांचे खच्चीकरण करुन लाल बावट्याचे वर्चस्व संपवायचे होते. या कामी त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेची मदत झाली. कम्युनिस्टांना ठोकून काढण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली. कम्युनिस्टांनी देखील आपला साचेबध्दपणा कधी सोडला नाही. बदलत्याकाळानुसार आपल्यात, संघटनेत जे बदल अपेक्षित होते ते झाले नाहीत. त्यामुळे वडिल लाल बावट्याचे काम करीत असताना त्यांची मुले मात्र बाळासाहेबांचा भगवा खांद्यावर घेऊ लागली. एकदा का शिवसेनाचा वापर करुन घेतल्यावर मग त्यांना संपवायचे असा कॉँग्रेसचा बेत होता. परंतु बाळासाहेबांनी कॉँग्रेसचा हा डाव ओळखून आपले अस्तित्व नेहमीच वेगळे ठेवले आणि शिवसेना वाढवतच नेली. शेवटी कॉँग्रेसच्या बळावर मोठ्या झालेल्या या मराठी माणसांच्या अस्मितेच्या संघटनेने कॉँग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्यात यश मिळविले. शिवसेनेने मराठी माणसांच्या मुद्याबरोबर हिंदुत्वाचे घोंघडे पांघरले. अर्थात त्यांचे हिंदुत्व हे व्यवहारी होते. याच मुद्यावरुन त्यांची भाजपाशी दोस्ती झाली आणि उभयतांनी सत्तेपर्यंत मजल गाठली. शिवसेनेला सत्ता मिळाली त्यावेळी खरे तर बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र त्यांनी रिमोट कंट्रोल होणे पसंत केले. आयुष्यात त्यांनी कधी निवडणूक लढविली नाही मात्र ते लोकांच्या हृदयावर नेहमीच स्वार झाले. मराठी माणसांच्या अस्तिमतेचा एक हुंकार म्हणून शिवसेना एक संघटना म्हणून उभी केली. कोणाचीही अडलेली कामे असोत सर्वसामान्य शिवसैनिक धावून जाणार हे एक समिकरणच मुंबई-ठाण्यात तयार झाले. कम्युनिस्टांचे वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले संघटनकौशल्य किंवा त्याहून काकणभर सरस असे संघटन शिवसेनेच्या रुपाने उभे राहिले. त्या सर्वांची प्रेरणा बाळासाहेब होते. खरे तर शिवसेनेसारखी संघटना सत्ता आल्यावर किंवा सत्ता नसतानाही अनेक संस्थांत्मक कार्ये करु शकली असती परंतु ती झाली नाहीत. शिवसेनेकडे सत्ता आली खरी त्याचा मराठी माणसांना किंवा या महाराष्ट्राला त्याच किती उपयोग झाला हा एक संशोधनाचा विषय ठरावा. त्यामुळेच ही सत्ता त्यांना टिकविता आली नाही. कॉँग्रेसपेक्षा काही तरी वेगळे करुन दाखवेल अशी लोकांची असलेली अपेक्षा शिवसेना व भाजपा युती काही पूर्ण करु शकली नाही. याचा परिणाम म्हणून पुन्हा कॉँग्रेस सत्तेवर आली. सत्ता गेली तरीही बाळासाहेबांची लोकप्रियता कायम टिकली. कारण बाळासाहेबांनी सत्ता स्वत: कधी उपभोगली नाही आणि ते रिमोट कंट्रोल म्हणून कार्यरत राहिले, ही बाब शिवसैनिकांच्या मनात घर करुन राहिली आणि त्यामुळे बाळासाहेबांची लोकप्रियता काही घसरली नाही. बाळासाहेबांच्या पश्‍च्यात त्यांनीच आपला राजकीय वारस म्हणून निवडलेल्या उध्दव यांच्याकडे शिवसेनेची सर्व सूत्रे आली. त्यापूर्वी नारायण राणे व राज ठाकरे बाहेर पडल्याने शिवसेनेची ताकद बर्‍यापैकी क्षीण झाली होती. परंतु उध्दव यांच्याकडे वारसा व शिल्लक राहिलेली संघटना हे वगळता काहीच हातात नव्हते. बाळासाहेबांचा वारस म्हणून उध्दव योग्य आहेत किंवा नाहीत हे आगामी काळ ठरवेल. निवडणुकीच्या राजकारणात त्या जिंकणे हेच यशाचे मोठे परिमाण समजले जाते. उद्धत त्यात पास होणार किंवा नाहीत हे पुढील वर्षी येऊ घातलेल्या निवडणुकीतच ठरेल. बाळासाहेबांनंतर झालेल्या पहिल्या दसरा मेळाव्यात झालेली ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची झालेली अवहेलना ही काही चांगली बाब निश्‍चतच नव्हती. उद्धव ठाकरे हे रोखू शकले असते परंतु त्यांनी तसे केले नाही, ही दुख:त घटना आहे. मनोहर जोशी हे काही मास लिडर नाहीत. त्यामुळे त्यांना नाराज करणे उद्धव यांना सहज शक्य होत्. परंतु एवढ्या ज्येष्ठ नेत्याची जी मानहानी झाली त्यातून शिवसैनिकांत व जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. मनोहर जोशी यांना वयाचा विचार करता खासदारकी नाकारणे आपण समजू शकतो परंतु त्यांची मानहानी होणे हे पक्षाला घातक ठरु शकते. त्यामुळे उद्धव यांचे सल्लागार काही दूरदृष्टी ठेवणारे नाहीत हे देखील यावरुन सिद्द झाले. बाळासाहेबांनंतर त्यांच्या काळात आक्रमक असलेली शिवसेनेची आक्रमकता आता काळाच्या ओघात टिकणे कठीण आहे. तसेच उद्धव यांचेे नेतृत्वही सिध्द व्हायचे आहे.
--------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel