-->
सोने लकाकले / लष्करात समान संधी

सोने लकाकले / लष्करात समान संधी

बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
सोने लकाकले
सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या करोनाग्रस्त चीन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेल, डॉलरच्या उसळीचा लक्षणीय विपरित परिणाम भारतावर होण्यास सुरुवात झाली आहे. सोन्याच्या किमती तोळ्यांमागे 42 हजार रुपयांवर गेल्याने त्याची पहिली झलक दिसली. गेल्या आठवड्याभरात मौल्यवान धातूच्या दरांतील ही लकलक अनुभवली जात आहे. देशात एकीकडे आर्थिक मंदीसदृश परिस्थिती आणि दुसरीकडे लग्न समारंभांची मर्यादीत रेलचेल सुरु असतानाही सोन्याच्या वाढत्या किमतीबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. खुद्द सराफा बाजारातही कमी कालावधीत होत असलेल्या मोठया उसळीने चिंता व्यक्त केली जात आहे. सोन्याचय किंमतीने आता विक्रमी किंमत पार केली आहे. अशा स्थितीत या किंमती कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. डॉलर हे अमेरिकी परकीय चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत 72 पर्यंत पोहोचले आहे. खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल 60 डॉलपर्यंत पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 2020 च्या पहिल्या दोन महिन्यांतच सोन्याचे दर सुमारे सहा टक्क्यांनी वाढले आहेत. स्थानिकपेक्षा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा धसका सराफा बाजाराने घेतला असून मौल्यवान धातूच्या दरातील दिवसागणिकची मूल्यउसळी हा सट्टेबाजीचा प्रकार असल्याचे सराफा व्यावसायिक नमूद करतात. मात्र जागतिक पातळीवरील वातावरण सध्या बर्‍यापैकी अस्थिर आहे. प्रामुख्याने करोनाच्या प्रादुर्भावामुळे  जगाचे व्यवहार ठप्प होत आहेत. अर्थव्यवस्तेला खीळ बसू लागली आहे. अशा स्थितीत एक स्थैर्याचे प्रतिक म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. सोन्याबरोबरच चांदीचे भावही वधारले आहेत. मंदीची मिठी सैल होईपर्यंत सोन्याची चमक आणखी काही काळ तशीच राहण्याची शक्यता आहे. जगभरात मंदीने आपले बस्तान बसविल्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत असून, प्रॉपर्टी बाजारही थंड पडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षक आणि सुरक्षित वाटू लागली आहे. चालू वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने 20 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. 2018 मध्ये या धातूने जवळपास सहा टक्के परतावा दिला होता. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 32,270 रुपये होता. तो आज प्रति ग्रॅमसाठी 42,000 रुपयांवर गेला आहे. सध्या केवळ रुपयाच नव्हे, तर अन्य देशांची चलनेही डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्यानंतर शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मागे घेण्यास सुरुवात केल्याने रुपयावरील दबाव वाढला आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया 72 च्या पातळीवर गेला आहे. ज्यावेळी आर्थिक अस्थिरता निर्माण होते त्यावेळी सोने-चांदीकडे खरेदीचा ओघ वाढतो. त्यामुळे आता मंदीची मगरमिठी सैल होईपर्यंत तरी हा पिवळा धातू तेजीत राहिल याबाबत काहीच शंका नाही.
लष्करात समान संधी
लष्करात महिलांना समान संधी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिलेला आदेश हा एक क्रांतीकारीच ठरावा. सैन्य दलातील व्यापक संधीसाठी शॉर्ट कमिशन संघटनेच्यावतीने न्यायालयीन पातळीवर गेली दहा वर्षे लढा सुरू होता. याला अखेर यश मिळाले असून केंद्र सरकारलाही स्त्रियांच्या बाबतीतली मानसिकता बदलण्याची गरज असल्याची चपराक न्यायालयाने लगावली आहे. युक्तिवाद करताना सरकारकडून सांगण्यात आले होते की, तिन्ही दलांमध्ये ग्रामीण पार्श्‍वभूमी असणा़र्‍या पुरुष अधिकार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांची सामाजिक पार्श्‍वभूमी बघता आणि काम करण्याची पुरुषप्रधान मानसिकता बघता महिला अधिकार्‍यांनी दिलेले आदेश पाळण्याची त्यांची मानसिकता नाही आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. महिलांच्या शारीरिक आणि मानसिक पातळीवरील मर्यादा बघता, त्यांना संरक्षण क्षेत्रातल्या वरिष्ठ पदावर नेमले जात नाही. खरे तर हे मत पूर्णपणे चुकीचे असून ते वास्तवतेला धरून असले तरी समतेच्या विरोधात जाणारेच आहे. मात्र त्यावर न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, सामाजिक धारणांनुसार महिलांना समान संधीचे अधिकार न मिळणे दुर्दैवी असून ते स्वीकारता येणार नाही. लष्करात महिला अधिका़र्‍यांना परमनंट कमिशन न देणे यातून सरकारचा पूर्वग्रह दिसत असून सैन्यदलात वरिष्ठ अधिकारी पदे महिलांनाही मिळावीत यासाठी सरकारने महिलांच्याबाबतीत मानसिकता बदलायला हवी. अनेक महिला अधिकार्‍यांनी सेनापदके, शौर्यपदके मिळविली असून विदेशांमध्येही देदीप्यमान कामगिरी केली आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती असेल आणि सरकारने आपली मानसिकता बदलली तर सैन्यात वरिष्ठ पदांवर महिलांची नियुक्ती होऊ शकते असेही मत खंडपीठाने नोंदवले आहे. भारतीय संरक्षण दलात साधारण 1992 पासून महिला अधिकाऱयांच्या नेमणुका सुरू झाल्या. सुरुवातीला हवाई दलात त्यांना लढाऊ भूमिका देण्यात आल्या. उच्च प्रतीची शारीरिक व मानसिक क्षमता लागणा़र्‍या लढाऊ वैमानिक युद्धक्षेत्रात त्या कामगिरीही बजावत आहेत. गेल्यावषी 24 वषीय तरुणी नौदलाची पहिली महिला पायलट बनली. नौदल आणि हवाई दलात महिला अधिकारी लढाऊ सेवा बजावत असल्या तरी पायदळ अजूनही याला अपवाद आहे. सध्या पायदळात महिला डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, सिग्नलिंग, कायदा व प्रशासकीय पदावर काम करत आहेत. आज जगभरात विविध देशातील महिला जवान प्रत्यक्ष युद्धभूमीवर सेवा बजावत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे भविष्यात एखादी महिला आता वायुदल, नौदल, कदाचित लष्कराच्या प्रमुख पदापर्यंतही पोचू शकेल.
------------------------------------------------------------------------

0 Response to "सोने लकाकले / लष्करात समान संधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel