-->
इन ऑँखो की मस्ती के...

इन ऑँखो की मस्ती के...

बुधवार दि. 21 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
इन ऑँखो की मस्ती के...
वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगिताने मंत्रमुग्ध करणार्‍या आणि रसिकांना आपल्या संगिताचे वेड लावणार्‍या, सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगितकार खय्याम ऊर्फ मोहंमद जहूर खय्याम हाश्मी हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आणि काही काळ संगितही स्तब्ध झाले. वयाच्या 90व्या वर्षीही त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला चित्रपटासाठी संगित देण्याची ऑफर कुणी दिल्यास आपण स्विकारु व मरेपर्यंत संगिताची सेवा करु अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. अर्थात त्यांना तशी कोणतीच ऑफर आली नाही परंतु या वयातही त्यांनी दाखविलेली जिंदादिली वाखाणण्याजोगी होती. 18 फेब्रुवारी 1927 साली पंजाबातील जालंधर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. महत्वाचे म्हणजे, खटकडकला या शहिद भगतसिंग यांच्या जन्मगावी त्यांचा जन्म झाला होता. देशप्रेम, इमानदारी व मेहनत या तीन बाबींचे त्यांच्यावर बालपणीच संस्कार झाले होते व त्यांनी याचे मरेपर्यंत पालन केले. दुसर्‍या महायुध्दात त्यांनी शिपाई म्हणून ब्रिटीश राजवटीत काही काळ कामही केले होते. परंतु आपल्याला अभिनेता व्हायचे आहे हे त्यांच्या मनाने ठाम घेतले होते. सहगल यांचा त्यांच्यापुढे आदर्श होता. चित्रपटाचे त्यांना फार वेड होते. दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लींत राहणार्‍या काकांकडे आले. तेथेच राहून त्यांनी आपल्या करिअर घडवण्या ची स्वप्ने बघितली. परंतु दिल्लीपेक्षा मुंबईतच आपल्याला करिअर करता येईल हे त्यांच्या ध्यानात आले व त्यांनी आपला मोर्चा मुंबईत वळविला. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या करिअरला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. यह है जिंदगी या चित्रपटात त्यांना भूमिकाही मिळाली. 1947 मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पहील्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी शर्माजी या टोपणनावाने चार चित्रपटांना संगितही दिले. हळूहळू अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नासच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले होते. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवत असे. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यात मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. या बहुतांश गीतकारांसमवेत खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. खय्याम हे गेली 70 हून अधीक वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत राहिलेे. त्यांंनी 70 आणि 80च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. एक नावाजलेले संगीतकार म्हणून खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला. हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या श्रवणीया संगिताच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कभी कभी, बाजार, त्रिशूल, नुरी ,आखरी खत अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गाण्याने तर त्यांचा संगितकार म्हणून सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2007 साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति  पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन खय्याम यांचा सन्मान केला होता. खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाले होते. उमराव जान या चित्रपटातील रेखावर चित्रित केलेले गाणे इन आंखो की मस्ती के... या गाण्याची चाल त्यांनी संगितकार म्हणून लावली होती. याला गाण्याला आवाज आशा भोसले यांचा होता. या अवघड गाण्यासाठी केवळ आशा भोसलेच योग्य गायिका आहेत असे खय्याम यांना वाटे. या गाण्याचे रेकॉँर्डिग होताना बर्‍याच तालमी झाल्या परंतु खय्याम यांना काही तरी चुकते आहे असे वाटत राहिले. त्यांनी शेवटी आशाजींना सांगितले तुम्ही आशा भोसले म्हणून गाऊ नकात, उमराव जान म्हणून गा... उमराव जानच्या आवाजातली गहराई त्यात उतरली पाहिजे. शेवटी झाले तसेच त्यानंतर एका क्षणात हे गाणे त्यांच्या पसंतीनुसार आशाताई गायल्या आणि हे गाणे अजरामर झाले. या गाण्याचे रेकॉर्डींग झाल्यावर आशाताई स्टुडिओ बाहेर येऊनाघळाघळा रडल्या होत्या. खय्याम यांचे पंजाबी, उर्दु व हिंदीवर प्रभुत्व होते. त्या भाषेतली लकब त्यांनी आपल्या अनेक गाण्यात उतरवली आहे. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या देखील गायिका होत्या. खय्याम यांनी आपल्या वयाची 90 पार केल्यावर एक ट्रस्ट स्थापन केला व त्यात आपल्या आयुष्याची कमाई सुमारे 12 कोटी रुपये जमा केली. यातून विविध कलाकार घडविण्यासाठी पैसा खर्च केला जात आहे. खय्याम यांच्यातील माणूस त्यातून डोकावला. असा हा महान संगितकार आता आपला ठेवा रसिकांसाठी ठेऊन या जगातून निघून गेला आहे...
-------------------------------------------------------------------

0 Response to "इन ऑँखो की मस्ती के..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel