-->
चौकशीनंतर...

चौकशीनंतर...

शनिवार दि. 24 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
चौकशीनंतर...
अंमलबजावणी संचालनालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी झालेली चौकशी आणि आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडसह विविध कंपन्यांच्या व्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना झालेली अटक या भोवती सध्या देशातील चर्चा सुरु आहेत. सध्या देशाने खरे तर एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पूर अशा असलेल्या गंभीर समस्या, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील आलेली मंदी या महत्वांच्या बाबींबात बोलायला पाहिजे. परंतु त्या बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत सध्या राज ठाकरे व चिदंबरम यांच्या भोवती चर्चा केंद्रीत झाल्या आहेत. सध्याच्या सरकारच्या म्हणजे मोदी व शहा यांच्या ताब्यात 32 लाख व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप आहेत. त्यात ते कोणतीही माहिती पसरवून मग ती खोटी असो किंवा खरी लोकांची दिशाभूल करण्याचे काम उत्तमरित्या करु शकतात. अर्थात याची कबूल अमित शहा यांनीच भाजपाच्या सोशल मिडया सेलपुढे केलेल्या भाषणात दिली आहे. त्यामुळे देशातील जनमत काय असेल हे भाजपाप्रणित 32 लाख व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप ठरवित आहेत. त्यातून कोणाला डोक्यावर चढवायचे किंवा कोणाला हिणवायचे याची आखणे करुन हे सर्व पध्दतशिररित्या केले जात आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे व चिदंमबर यांच्यावरील चौकशी पुढे करुन जनतेच्या अनेक प्रश्‍नांना बगल देण्यात भाजपा यशस्वी झाले आहे, असे म्हणता येईल. 2005 साली मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी सव्वा चारशे कोटींना लिलावात घेतलेली कोहिनूर मिलची जागा आणि तेथे 52 आणि 25 मजल्यांचे दोन अवाढव्य प्रकल्प उभे करण्यात आलेले अपयश, यामध्ये झालेल्या व्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी, राजन  शिरोडकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इडीने चौकशीसाठी नोटीस बजावलेली होती. गेल्या दोन-तीन दिवसात आठ-आठ तास जोशी आणि शिरोडकर यांची चौकशी पार पडलेली आहे. त्यानंतर गुरुवारी राज ठाकरे यांची सुमारे नऊ तास चौकशी झाली. सरकारच्या आयएल अँड एफएस कंपनीची 860 कोटींची गुंतवणूक, त्यातून कंपनीला झालेला तोटा, 2008 साली कंपनीने आणि राज ठाकरे यांनी स्वतःची गुंतवणूक काढून घेतल्याचे प्रकरण या प्रकरणी चौकशीच्या मध्यभागी आहे. 2008 सालातील व्यवहारांबाबत इतक्या वर्षात ईडीला शंका आली नाही. मात्र लोकसभा निवडणूक उमेदवार उभे न करता मोदींच्या विरोधात केलेल्या प्रचारामुळे मोदी-शहा हे चवताळल्यासारखे झाले होते. त्यामुळे राज यांच्यावरती हा चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. मात्र राज यांनी आपल्यावर याचा काही परिणाम होणार नाही, आपण सरकारविरोधी बोलणारच असा ठाम विश्‍वास व्यक्त केला आहे. राज्यातील काँगेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यंनी यामागे सरकारचा हात असल्याची टीका केली आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही राज ठाकरे यांच्या चौकशीच्या कागदावर सही झाली आहे असे पंधरा दिवस अगोदरच सांगितले होते. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणातून काहीही होणार नाही असे मत मांडले आहे. बिचार्‍या मुख्यमंत्र्यांना तर अशी चौकशी होणार हे उशीराच कळले. कर नसेल तर डर कशाला अशी भूमिका त्यांची आहे. या मुंबईत हालचाली सुरु असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे दक्षिणेतील नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा गेले दोन दिवस सीबीआयकडून शोध सुरू आहे. आयएनएक्स मीडिया कंपनीसह विविध कंपन्यांच्या शेअर्स खरेदी विक्रीचा सल्ला देऊन त्या सल्ल्यापोटी प्रचंड मोठी माया कमावल्याची आणि त्यातून परदेशात हजारो कोटींची मालमत्ता बनवल्याचा चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर आरोप आहे. यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या माजी अर्थमंत्री या नात्याने चिदंबरम यांचा सहभाग आहे, असा आरोप आहे. या प्रकरणी आपला आणि आपल्या मुलाचा काहीही संबंध नसल्याचा बचाव चिदंबरम यांनी वेळोवेळी केला असला तरीही ज्यांनी कार्ती चिदंबरम यांचे शेअर्स खरेदी केले आहेत त्यांनी आपले मृत्यूपत्र एकाच तारखेला लिहून ती सर्व इस्टेट कार्ती यांच्या अल्पवयीन कन्येच्या नावावर केली असल्याचाही आरोप आहे. अर्थात सत्ता बदलली की सत्तेतील जुन्या सत्तेचे प्रमुख मोहरे, प्रमुख विरोधक यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा लावणे काही नवे नाही. काँग्रेस काळात सीबीआय जे काही करत होती तेच मोदी यांच्या काळातही सुरू आहे. मात्र मोदींच्या स्वभावानुसार त्यांचे हे काम आक्रमकरित्या चालत आहे. त्यामुळे ते ठळकपणाने नजरेत भरते आहे. चिदंमबर केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी गुजरात दंगलीप्रकरणी अमित शह यांच्यावर चौकशीचा ससेमिरा लावला होता, त्यामुळे शहांनी आता चिदंमबरम यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून आपल्यावरील हे कर्ज फेडले आहे अशी चर्चा आहे. काँग्रेस सत्तेच्या काळात अशा प्रकारे ज्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला त्यातील एक देशाचे पंतप्रधान आहेत. एक देशाचे गृहमंत्री बनलेले आहेत तर एक आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. सीबीआय चौकशी आणि ईडी राजचे राजकीय महात्म्य हे असे आहे. या चौकशातून काय निष्पन्न होईल ते आत्ता सांगणे कठीण आहे, मात्र सध्याच्या ज्वलंत प्रश्‍नावरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले आहेत हे मात्र नक्की.
----------------------------------------------------------------------

0 Response to "चौकशीनंतर..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel