
मॉडेल धारावी
29 June 2020 अग्रलेख
मॉडेल धारावी
कोरोनाचा सर्वात जास्त धोका होता तो मुंबई अन्य महानगरातील मोठ्या झोपडपट्यांना. कारण तेथे असलेली दाट वस्ती व सार्वजनिक संडास, या दोन बाबींमुळे येथे कोरोना फैलावण्याचा धोका सर्वाधिक होता. धारावीत तेच नेमके झाले. तसे पाहता मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यावर धारावी मात्र निर्धास्त होती. कारण सुरुवातीच्या महिन्याभरात इकडे कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र त्यानंतर येथे साथ सुरु झाली व तिला आटोक्यात आणणे कठीण होऊन बसले होते. मात्र आता हीच धारावी कोरोना नियंत्रणाचे एक मॉडेल झाले आहे, ही एक समाधानाची बाब ठरावी. धारावीतील कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आणण्यास महापालिका प्रशासनाला मोठे यश आले आहे. शनिवारसह गेल्या चार दिवसात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही व नवीन रुग्णांची संख्या देखील आटोक्यात आली आहे. या अवघड कामात यश आल्याबद्दल केंद्र सरकारने देखील याची दखल घेऊन धारावी मॉडेलचे कौतुक केले आहे. धारावीतील हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी पालिका, पोलिस, डॉक्टरांची टीम व धारावीत राहाणारी जनता यांचे अभिनंदन करावयास हवे. धारावीतील जनतेच्या सहभागाशिवाय हे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे सर्वात मोठे कौतुक केले पाहिजे. धारावीत कोरोना नियंत्रणात आणणे हे काही सोपे नव्हते. कारण कोरोना वाढण्याचा तिकडे पावलोपावली धोका होता. त्या सर्वांवर मात करण्यासाठी नियोजनबध्द काम केले गेले. धारावीत सर्वात प्रथम जे खासगी दवाखाने बंद होते त्यांना ते सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे सर्दी, खोकल्याच्या साध्या रोगांसाठी उपचार सुरु झाले. मात्र ज्यांना कोरोनाची सकृतदर्शनी लक्षणे दिसत आहे त्यांचा ताबा पालिका घेई. खासगी डॉक्टरांचे दवाखाने सुरु झाल्याने लोक आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी जाऊ लागले. त्यामुळे साधे रुग्ण व कोरोनाचे रुग्ण यात फरक निर्माण झाला. तसेच नेहमीच्या डॉक्टरांकडे जाता येऊ लागल्याने स्थानिक लोकही निर्धास्त झाले. कारण नेहमीच्या डॉक्टरांकडे जाण्यास अनेक रुग्ण कम्फर्टटेबल असतात. खासगी दवाखान्यांच्या डॉक्टरांपासून सफाई करणाऱया, सॅनिटायझेशन करणाऱया कर्मचाऱयांपर्यंत प्रत्येकाने जीव धोक्यात घालून धारावीला वाचवले आहे. भारतात जितक्या जात, धर्म आणि वंशाचे लोक राहतात तेवढय़ा सगळय़ांचे प्रतिनिधी धारावी करते. त्यामुळे धारावीत काय घडते याकडे संपूर्ण भारताचे लक्ष असते. धारावीतील सार्वजनिक शौचालये दर दहा मिनिटाला सॅनिटाईज करणे ही काही सोपी बाब नव्हती. त्याचबरोबर प्रत्येकाने घरातच राहावे यासाठी कधी जबरदस्ती तर कधी प्रेमाने सांगत पोलिसांनीही मोठ्या धीराने काम केले. त्यासाठी ज्यांच्या घरात अगदीच जेवण खाण्याची सोय नाही त्यांना घरपोच खाणे पोहोचविले गेले. याकामी जसे शासकीय पातळीवर काम केले गेले तसेच अनेक एन.जी.ओ.नी महत्वाची भूमिका बजावली. धारावीतील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याचा उपक्रम सुरु केला. प्राथमिक ताप आहे का हे तपासले गेले. त्याचबरोबर शरीरातील ऑक्सीजनचा पुरवठा मापन करण्याचे काम सुरु केले गेले. यात जरा जरी शंका आली तरी त्याची पुढील तपासणी करण्याचे सत्र अवलंबिले गेले. यातून रुग्ण पहिल्याच टप्प्यात ओळखता येऊ लागला. सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण धारावी सील करुन तेथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली गेली. धारावीची एकूण लोकसंख्या सुमारे पंधरा लाख आहे. त्याशिवाय कामा निमित्ताने जाणाऱ्यांची मोजदात तर करताच येणार नाही. सध्या धारावीत पन्नास टक्के लोकसंख्या कमी झाली आहे. कारण यातील बरेचसे स्थलांतरीत आपल्या गावी गेले आहेत. मूळचे धारावीकर मात्र येथेच तळ ठोकून आहेत. परंतु सात-आठ लाख लोकांची तपासणी प्रथामिक पातळीवर करणे हे काही सोपे नव्हते. पालिकेच्या या धोरणाला यश आले व कोरोना नियंत्रणात आला. अर्थात अद्याप धारावीत कोरोना पूर्णतः नष्ट झाला असे झालेले नाही. जगात ज्या देशांना आपण त्यातून मुक्त झालो असे वाटत होते तिथे पुन्हा लाट निर्माण झाली असेही घडले आहे. त्यामुळे धारावीतील यंत्रणा या यशाने हुरळून न जाता आपले मार्गक्रमण करतच राहील अशी आशा बाळगू या. परंतु झोपडपट्टीतील कोरोना घालवायचा असेल तर धारावी मॉडेल आता अनेकांना फायदेशीर ठरणार आहे. त्यादृष्टीने पालिकेने आखलेल्या धोरणाला यश आले व त्याचे कोरोना मुक्तीचे एक आदर्श मॉडेल सर्वापुढे आले. धारावीपेक्षाही कमी लोकसंख्या असलेले आज अनेक कोरोनाचे हॉट स्पॉट झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, रोहा, पेण व अलिबाग ही तालुक्याची ठिकाणे सध्या या यादीत येतात. येथील लोकसंख्या धारावीपेक्षा कमी असली तरीही क्षेत्रफळ जास्त आहे. त्यामुळे धारावी मॉडेलचे शंभर टक्के प्रतिबिंब येथे पडणार नाही. परंतु धारावीत कोरोना संपविण्यासाठी जे तंत्र अवलंबिले त्याचा इकडे वापर करता येऊ शकतो. या भागात कडकडीत बंद पाळणे, लोकांची आरोग्य तपासणी झपाट्याने करणे व दोन व्यक्तींमधील योग्य अंतर ठेवणे हे केल्यास कोरोनाची या भागातील साखळी तोडता येईल. रायगड जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या वाढत धोकादायक स्थीती होत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेत आता झपाट्याने कामाला लागणे गरजेचे आहे. अन्यथा ही साथ आटोक्याबाहेर जाण्याचा धोका आहे. निव्वळ कामाचा डंका वाजवत बसण्यापेक्षा धारावीच्या धर्तीवर काम करुन त्याचे निकाल जनतेपुढे ठेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आपली वाटचाल केली पाहिजे.
0 Response to "मॉडेल धारावी"
टिप्पणी पोस्ट करा