
तेलदर वाढीचा विषाणू
27 June 2020 अग्रलेख
तेलदर वाढीचा विषाणू
कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना जीवनावश्यक वस्तू वगळता जवळजवळ प्रत्येक वस्तू मागणी अभावी पडून आहे. जगात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत कधी नव्हे एवढी विक्रमी घसरण झाली आहे. याचे कारणही मागणीचा अभाव असेच आहे. असे असतानाही जगात घसरण होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती मात्र आपल्या देशात गेल्या वीस दिवस सतत चढत्या आहेत. हे नेमके गणित काय आहे, हे काही सर्वसामान्यांना समजलेले नाही. मागणी वाढल्यास किंमती वाढतात हे सर्वसाधारणपणे अर्थशास्त्राचे असलेले नियम पेट्रोल-डिझेलला मात्र लागू होत नाहीत. सरकार मात्र या किंमती बाजारभिमूख झाल्या आहेत असा दावा करुन किंमत वाढीची जबाबदारी झटकते. म्हणजे जगातील किंमती वाढल्यास त्याच्या किंमती वाढतात व घसरल्यास येथेही घसरतात, मात्र असे काही होताना दिसत नाही. जगात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती घसरत नव्हे तर निचांक थराला पोहोचल्या असताना आपल्याकडे मात्र दररोज नवनवीन उच्चांक गाठला जात आहे. मोदी सरकारचे हे अर्थकारण म्हणजे सर्वसामान्यांना लुबाडणारे आहे. जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. दरवाढ नसल्याने मे महिन्याच्या अखेरीस शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. परंतु आता गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचे सत्र मात्र कायम आहे. गेले 19 दिवस ही वाढ सातत्याने होत आहे. शुक्रवारी पुन्हा पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.९२ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.०२ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. पहिल्यांदाच डिझेलच्या दराने ८० रूपयांचा टप्पा पार केला आहे. डिझेल हे नेहमीच पेट्रोलपेक्षा स्वस्त राहिले आहे. आता मात्र उलटे होत चालले आहे. यामागचे नेमके कारणही काही समजत नाही. त्यामुळे सरकारच्या मर्जीनुसारच हे सर्व चालले आहे. गुरूवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग एकोणीसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८६.७० रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.३४ रूपये प्रति लिटरवर पोहोचले. जगात युध्दाच्या काळातही एवढ्या झपाट्याने तेलाच्या किंमती वाढल्या नव्हत्या. आपल्यापेक्षा जगात मात्र उलटी स्थिती आहे. तेल उत्पादक देशांपुढे उत्पादन करुन तेल कोणाला विकायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे. कारण जगातील मागणीच जवळपास शून्यावर आली आहे. खनिज तेलाचा जगातील एक आघाडीचा खरेदीदार आपला देश आहे. परंतु आपल्याकडे साठवणूक क्षमता जास्त नसल्याने जगातील स्वस्तातील तेल विकत घेऊन त्याची साठवणूक करुन ठेवायची आपल्याकडे व्यवस्था नसल्याने या घसरणीचा फायदा भारत पूर्णपणे उचलू शकला नाही. ज्या आखाती देशांनी साठीनंतरच्या दशकात याच खनिज तेलाच्या जोरावर भव्यतेचे इमले बांधले, आता त्यांना खनिज तेलाचे कोसळलेले दर रसातळाला नेतील असा अंदाज आहे. अमेरिकेने आखाती देशांची तेल उत्खनातील मक्तेदारी संपविण्यासाठी जंगजंग पछाडले. त्यासाठी त्यांनी इराकशी युध्द करुन तो देश बेचिराख केला. तेथील अमेरिका विरोधक सत्ताधिश सद्दाम हुसेन याला त्यांनी संपविला. मात्र सद्दाम गेला तरी तेथील तेलाचे साठे काही अमेरिकेच्या ताब्यात आले नाहीत. गेल्या काही वर्षात अमेरिका हा जगातील सर्वात मोठी खनिज तेल उत्पादक देश झाला खरा, परंतु तेलाच्या किंमती कोसळू लागल्याने त्यांना हा मुकूट आता काटेरी वाटू लागला आहे. कोरोनाच्या काळात तर खनिज तेल उपसण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढाही वसूल होत नाही अशा विक्रमी पातळीवर किंमती घसरल्या. चालू वर्षाच्या प्रारंभी खनिज तेलाच्या किंमती 65 डॉलर प्रति बॅरल होत्या. त्या70 डॉलरवर पोहोचल्या, त्यावेळी अमेरिकेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. परंतु कोरोनाच्या वाढीनंतर खनिज तेलाच्या किंमतीला आळा बसला आणि त्याची जी घसरण सुरु झाली ती बघवेना अशा स्थितीत आली. याला आवर घालणे कुणालाही शक्य नव्हते. रशिया व सौदी अरेबिया या दोन तेल उत्पादक देशांनी 2016 साली अघोषित करार करुन किंमती 70 डॉलरच्या खाली जाऊ द्यायच्या नाहीत असे ठरविले होते. परंतु हा करार उभयतांनी मोडला व अमेरिकेला धडा शिकविण्यासाठी किंमती घसरु दिल्या. यातून सौदी अरेबियाचे अमेरिकेशी संबंध ताणले गेले होते. या सर्व पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाले आणि जगाचे चित्रच पालटले. कधी नव्हे ती खनिज तेलाची मागणी शून्यावर येईल, ही अपेक्षा कोणालाच नव्हती. परिणामी अनेक तेल उत्पादक देशांपुढे आर्थिक संकट आले. खनिज तेलाची मागणी एवढी घटेल असा कुणालाच कधी अंदाज आला नव्हता. परंतु कोरोनाने सर्वांनाच डाल आटे का भाव समजाविले. आपल्याकडे खनिज तेलाची मागणी अजून काही मोठ्या झपाट्याने वाढलेली नाही. जसे जसे लॉकडाऊन खुले होईल तसे खनिज तेलाची मागणी वाढत जाईल. मात्र त्याअगोदरच सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवायला सुरुवात करुन लोकांच्या खिशात हात घातला आहे. एक तर कोरोनामुळे अनेक जण हैराण झाले आहेत त्यात अशा प्रकारे महागाईला चालना देणारे निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण होणार आहे.
0 Response to "तेलदर वाढीचा विषाणू"
टिप्पणी पोस्ट करा