-->
बँकांची लूट सुरुच / सोन्याची चमक

बँकांची लूट सुरुच / सोन्याची चमक

गुरुवार दि. 12 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
बँकांची लूट सुरुच
देशातील सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गैरव्यवहार होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीत. यापूर्वी मोदी सरकार हे कॉँग्रेस सरकारचे पाप असल्याचे सांगून आपल्यावरील जबाबदारी झटकत असे. परंतु आता त्यांना तसेही करता येणार नाही. कारण बँकांमधील गैरव्यवहार होण्याचे प्रकार आता त्यांच्या कार्यकाळातही वाढतच चालले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 18 सार्वजनिक बँकांमध्ये फसवणुकीच्या 2,480 घटना घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनांमध्ये तब्बल 32,000 कोटींचा चूना बँकाना लागला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान स्टेट बँक ऑफ इंडियाचे झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रिझर्व्ह बँकेकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल करुन चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या बँक फसवणुकीच्या घटनांची आकडेवारी मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना जी आकडेवारी पुढे आली आहे ती धक्कादायक आहे. एप्रिल महिन्यापासून सुरु झालेल्या या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच ऑगस्टपर्यंतच्या चार महिन्यांच्या कालावधीत 18 सार्वजनिक बँकांमध्ये तब्बल 2480 फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये बँकांचे एकूण 31,898.63 कोटी रुपये बुडाले आहेत. गौड यांनी रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या नुकसानीचे प्रमाणही जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, नुकसानीच्या प्रमाणातील डेटा आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. या फसवणुकीच्या घटनांमध्ये सर्वाधिक फसवणूक स्टेट बँकेची झाली असून या बँकेच्या एकूण कर्जांपैकी 38 टक्के पैसे बुडाले आहेत. याशिवाय कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांसह जवळपास सर्वच सरकारी बँकांना चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. स्टेट बँकेत 1,197 फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. यामध्ये या बँकेला 12,012.77 कोटींचे नुकसान झाले आहे. यानंतर अलाहाबद बँकेमध्ये 381 फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली असून या बँकेने 2,855.66 कोटी रुपये गमावले आहेत. पंजाब नॅशनल बँकेला 2,526.55 कोटी रुपयांना चुना लावण्यात आहे. बँक ऑफ बडोदाला 75 प्रकरणांध्ये 2,297.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये फसवणुकीच्या 45 घटना समोर आल्या असून यामध्ये बँकेला 2,133 कोटी रुपये गमवावे लागले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 ते 2019 ह्या पाच वर्षात देशातील सार्वजनिक बँकामधील 71 हजार 543 कोटी रूपयांचे आर्थिक घोटाळे झाले असून त्याचा सूत्रधार कोण? असा सवाल केला आहे. या प्रश्‍नाचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल. विविध बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या 15 टक्क्यांनी वाढली असून गेल्या वित्त वर्षांत ही रक्कम 71 हजार 543 कोटी रुपयांवर गेली आहे. सन 2014 मध्ये बँकांमधील घोटाळ्याची रक्कम 10 हजार कोटी होती त्यामध्ये सात पटीने वाढ झाली आहे. भ्रष्टाचारापासून आपले सरकार मुक्त असल्याचा दावा करणारे हे सरकार यासंबंधी मौन का बाळगत आहे, असा सवाल आहे.   
सोन्याची चमक
आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांची पावले सोन्याकडे वळू लागली असून, सोन्याबरोबरच चांदीचे भावही वधारले आहेत. मंदीची मिठी सैल होईपर्यंत सोन्याची चमक आणखी काही काळ तशीच राहण्याची शक्यता आहे. जगभरात मंदीने आपले बस्तान बसविल्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत असून, प्रॉपर्टी बाजारही थंड पडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षक आणि सुरक्षित वाटू लागली आहे. सोन्यात गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांकडून चांदीच्या विक्रीवर भर देण्यात येत आहे. सोन्याच्या भावात आणखी वाढ होऊन दिवाळीपर्यंत हा धातू विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने 20 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. 2018 मध्ये या धातूने जवळपास सहा टक्के परतावा दिला होता. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 32,270 रुपये होता. तो आज प्रति ग्रॅमसाठी 39,000 रुपयांवर गेला आहे. सोन्याप्रमाणेच यंदा चांदीलाही अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत चांदीचा भाव प्रति किलो 39,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा अधिक परतावा देण्यात चांदी यशस्वी ठरली आहे. गेल्या महिन्याभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन सोन्याच्या पथ्यावर पडत आहे. सध्या केवळ रुपयाच नव्हे, तर अन्य देशांची चलनेही डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्यानंतर शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मागे घेण्यास सुरुवात केल्याने रुपयावरील दबाव वाढला आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया 72 च्या पातळीवर गेला आहे. ज्यावेळी आर्थिक अस्थिरता निर्माण होते त्यावेळी सोने-चांदीकडे खरेदीचा ओघ वाढतो. त्यामुळे आता मंदीची मगरमिठी सैल होईपर्यंत तरी हा पिवळा धातू तेजीत राहिल याबाबत काहीच शंका नाही.
--------------------------------------------------

0 Response to "बँकांची लूट सुरुच / सोन्याची चमक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel