-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १३ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
वेध पावसाळ्याचे
-------------------------------------------
सध्या प्रत्येक जण पावसाळ्याची आतुरतेने वाट पहात आहे. मध्येच एखादा पावसाचा शिडकावा सुखकारक वाटतो परंतु त्याने उकाड्यात अधिकच भर पडते. त्यामुळे चिंब भिजवून टाकणारा पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हवेत गारवा येणार नाही. उन्हाळा आता सर्वांनाच नकोसा झाला आहे. अशा स्थितीत कधी एकदा पाऊस पडतो याची शेतकर्‍यांपासून सर्वच जण वाट पहात आहेत. पावसाची ही प्रतिक्षा फारच कमी दिवस करावी लागणार आहे. नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांनी बुधवारी आणखी प्रगती करीत कोकणचा काही भाग व्यापला. मॉन्सूनने गोव्याचा पूर्ण भाग व्यापून कोकणातील रत्नागिरीपर्यंत मजल मारली आहे. शुक्रवारी १२ तारखेपर्यंत मॉन्सून कोकणाच्या आणखी भागात धडक मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा आता हाकेच्या अंतरावर आला आहे. उन्हाने लाही लाही झाली असताना सुरुवातीच्या पडणार्‍या पावसाच्या सरी सर्वांनाच दिलासा देणार्‍या ठरतील. मॉन्सूनने सोमवारी कर्नाटकची किनारपट्टी व गोव्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या कारवारपर्यंत धडक मारली. केरळचा पूर्ण तर तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला होता. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्राच्या बाजूने प्रगतीस अनुकूल स्थिती नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. मंगळवारी आसाम, अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील सर्वच राज्यांमध्ये मॉन्सून दाखल झाला. आता बुधवारी ११ तारखेला मॉन्सूनच्या वार्‍यांमध्ये आणखी प्रगती झाली व मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा किनारा, संपूर्ण गोवा आणि कोकणातील रत्नागिरीपर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागातील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. भारताच्या दक्षिणेकडे कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये १३ अंश उत्तर अक्षांशादरम्यान समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किमी उंचीवर असलेले पूर्व-पश्‍चिम जोड क्षेत्र (ईस्ट-वेस्ट शेअर झोन) आणि लक्षद्वीपमध्ये असलेली हवेची द्रोणीय स्थिती आता ओसरली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर किनार्‍याकडून समुद्राकडे जाणारी हवेची द्रोणीय स्थिती असून, ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. उद्यापर्यंत कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार पाऊस पडेल व कोकणातील पावसाची वाटचाल सुरु होईल. आसाम व मेघालयात असलेली चक्राकार वार्‍यांची स्थिती आता पश्‍चिम बंगालचा हिमालयीन भाग आणि सिक्कीमकडे समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर आहे. मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये विजेच्या कडकडाटासह अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश आणि विदर्भात छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेची, तर मध्य प्रदेशात धुळीची वादळे होण्याची शक्यता आहे. अशा पार्श्‍वभूमीवर अरबी समुद्राच्या पुर्वमध्य भागामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. नानौक नावाने ओळखल्या जाणारे हे चक्रीवादळ हळूहळू वायव्येकडे सरकत आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजता हे चक्रीवादळ १६.७ अंश उत्तर अक्षांश ते ६७ अंश पूर्व रेखांशादरम्यान होते. त्यामुळे मुंबई किनारपट्टीपासून रायगड व कोकणातील किनारपट्टीवर समुद्राच्या जोरदार लाटा धडकत होत्या. मुंबईपासून पश्‍चिम - नैऋत्येकडे ६७० किमी, तर वेरावळपासून दक्षिण - नैऋत्येकडे ५९० किमी अंतरावर चक्रीवादळाचे स्थान होते. त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता असून वायव्येकडे सरकत असलेले नानौक चक्रीवादळ साधारणतः सोमवारपर्यंत म्हणजे १६ जून पर्यंत ओमानच्या किनार्‍यावर धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आठवडाभरापूर्वी केरळच्या किनारपट्टीवर थडकलेला मान्सून बुधवारी रडतरखडत कोकणात दाखल झाला. मात्र, असे असले तरी मुंबईकरांना पावसाच्या धारांसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. शुक्रवारी मान्सून मुंबई शहर व परिसरात दाखल होईल असा अंदाज आहे. दरम्यान, अरबी समुद्रात नानौक नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचण्यास मान्सूनला किमान चार दिवस लागणार आहेत. या वादळाची हालचाल किती वेगाने होते, यावर मान्सूनचे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील आगमन अवलंबून असेल. कोकणात आगमन झाल्यावर पाऊस साधारणत: १-२ दिवसांत मुंबईत पोहोचतो, असा अनुभव आहे. मात्र, २००९ मध्ये पावसाला हे अंतर पार करण्यासाठी तब्बल १४ दिवस लागले होते. त्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. यावर्षी मात्र तो दोन दिवसांत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी व्यक्त केला. फक्त किनारपट्टीवरून सरकत असलेला मान्सून कर्नाटकच्या अंतर्गत भागात आणि आंध्र प्रदेशातही अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे मुंबईत पाऊस पोहोचला तरी राज्याच्या अंतर्गत भागात तो किती पोहोचेल याबद्दल हवामानतज्ज्ञ साशंक आहेत. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे मुंबईत वेगाने वारे वाहत होते. मात्र हा पट्टा किनारपट्टीकडून दूर सरकल्याने बुधवारी संध्याकाळी वार्‍यांचा जोर ओसरला. एकूणच पावसाळा आता हाकेच्या अंतरावर आला आहे. पावसाळ्याची सर्व तयारी शेतकर्‍यांनी आता पूर्ण केली आहे. पेरणीच्या अगोदर शेतात जााळ करुन जमीनीची नैसर्गिक मशागत करण्यास शेतकर्‍यांनी यापूर्वीच सुरुवात केली आहे. जिल्ह्यात भात हे मुख्य पिक असल्याने शेतकरी भात पेरणीच्या कामात व्यस्त आहे. काही ठिकाणी शेतकर्‍यांनी धूळ वाफेकरुन पेरणीला सुरवात केली आहे. शेतकर्‍यांच्या बरोबर कोळी बांधवांनीही आपल्या नौका किनार्‍यावर यापूर्वीच आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे आता फक्त पावसाच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पहात आहेत. लवकरच हा सुखकारक क्षण येईल अशी अपेक्षा करुया.
-----------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel