-->
तिकीटासाठी धुमशान

तिकीटासाठी धुमशान

संपादकीय पान शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
तिकीटासाठी धुमशान
सध्या सर्वच राजकीय पक्षांना बंडाळी, पक्षांतर, घराणेशाही या रोगांनी ग्रासले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी नेते मंडळी इच्छुक आहेत. आज शिवसेनेत असलेला नेता तिकीटासाठी भाजपात रातोरात उडी मारत आहे. तर राष्ट्रवादी-कॉग्रेसचे नेते कधी शिवसेना तर कधी भाजपात उड्या मारत आहेत. जर एखाद्या पक्षाने तिकीट नाकारलेच तर कित्येक वर्षाच्या असलेल्या पक्ष निष्ठा खुंटीला टांगून हे नेते रातोरात दुसर्‍या पक्षात प्रवेश करीत आहेत. तर काही जणांची पक्षातच राहून तिकिट मिळविण्यासाठी हाणामारी सुरु आहे. अर्थात यातून कोणताही पक्ष काही सुटलेला नाही. कारण स्थानिक नेत्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत व प्रत्येकाच्या मनात निवडणूक लढविण्याची खुमुखुमी आहे, तसेच त्यासाठी लागणारा पैसा आता अनेक नेत्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे लोकशाहीतील हा पाच वर्षाचा जुगार आपल्यालाच लागावा असी अनेकांची इच्छा आहे. अर्थातच प्रत्येकाची ही इच्छा पक्षाव्दारे काही पूर्ण केली जाऊ शकत नाही. अशावेळी पक्षात धुमशान सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणुक ही एखाद्या राज्याच्या निवडणुकीपेक्षा मोठी असते. तेथील नगरसेवकाचा थाट हा एखाद्या आमदारापेक्षा जास्त असतो. त्यामुळे मुंबईत नगरसेवकाचे तिकिट मिळण्यासाटी अनेक नेते जीवाचे रान करीत आहेत. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी शमण्याची चिन्हे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये गुरूदास कामत आणि संजय निरूमप गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या वादात मध्यस्थी करण्यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यावेळीही दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणमारीही झाली. त्यामध्ये एकजण जखमी झाला. कॉग्रेस पक्षात शोभेल असेच कृत्य ते होते. मुंबई काँग्रेसमधील यादीत काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनाच संधी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यादीत आजी-माजी नगरसेवकांच्या पत्नी, वहिनी, मुलगी आणि मुलगा यांचा भरणा आहे. पक्षातील अंतर्गत वाद आणि बंडखोरी थोपविण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबातच तिकीटे देण्यात आल्याची चर्चा आहे. कॉग्रेसपाठोपाठ शिस्तीचा पक्ष असलेल्या शिवसेनेतही यावेळी काही वेगळी स्थिती नाही. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेमध्ये आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणा-या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीवरुन वरळी शिवसेनेमध्ये असंतोष उफाळून आला. वॉर्ड क्रमांक 114 मध्ये किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णया विरोधात शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केले. वरळीप्रमाणे वडाळयामध्येही शिवसैनिकांची नाराजी दिसून आली. वॉर्ड क्रमांक 187 मधून अमेय घोले यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने अमेय घोले यांना संधी मिळाली असे शिवसैनिकांचे मत असून, त्यांचे योगदान काय? असा सवाल त्यांनी केला. मुंबईतल्या अनेक भागांत गुजराती भाषकांची संख्या लक्षणीय आहे. या भागांमध्ये यापूर्वी भाजपचे उमेदवार एक गठ्ठा मतदानाने निवडून येत होते. अशा भागांमध्येच शिवसेना भाजपला आव्हान देणार आहे. त्याकरिता शिवसेनेने मोठ्या प्रमाणात गुजराती भाषिक कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने बोरिवलीत हंसा देसाई या गुजराती महिलेला उमेदवारी दिली होती. तर राजूल पटेल यांचा वॉर्ड बदलल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळी मुलुंड, घाटकोपर, बोरिवली, ठाकूरद्वार, चंदनवाडी आणि मलबार हिल या गुजरातीबहुल भागांत गुजराती भाषक उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहेे. तसे झाल्यास तेथील शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी पसरणार हे ओघाने आलेच. परंतु भाजपाला नेहमी मतदान करणार्‍या गुजराती समाजाची मते मिळवायची असली तर शिवसेनेला गुजरातींना तिकिटे देणे हे गरजेचे ठरणार आहे. मुंबईमध्ये जवळपास 30 लाख गुजराती मतदार आहेत. भाजप सरकारने नोटाबंदी केल्याने मुंबईतल्या गुजराती समाजातील व्यापार्‍यांचे गेल्या दोन महिन्यांत मोठे नुकसाने झाले असून नोटाबंदीचा सर्वाधिक फटका सोने, चांदी व्यापार्‍यांना बसला. या व्यवसायाशी संबंधित असलेल्या गुजराती सोनी समाजाच्या संघटनेने भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा फतवा काढला आहे. मुंबईतील किमान 40 वॉर्डांमध्ये गुजराती मतांची भुमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये तर तिकिट इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र अनेक विभागात घराणेशाही हा निकष लावून तिकिटे दिली गेली आहेत. उदाहरणार्थ किरीट सोमय्या यांच्या मुलाला तिकिट देण्यात आले आहे. शिवसेनेतून केवळ तिकिटांसाठी आलेल्या काही उमेदवारांना भाजपाने तिकिटे देण्याचे नक्की केल्याने तेथील स्थानिक भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला महापौरपद देण्याची घोषणा भाजपला करावी लागेल, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी येथील स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचे भूमिपूजन करून स्मारकाच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकल्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, मात्र त्यासाठी भाजपला पाठिंबा देऊन केंद्रात मंत्रीपद मिळवणार्‍या रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेतही मानाचे पद रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मिळावे, अशी मागणी केली आहे. 2012 च्या महापालिका निवडणुकीत युतीने आरपीआयला 29 जागा सोडल्या होत्या, त्यापैकी केवळ धारावीतील एक जागाच निवडून आली होती. अशा परिस्थितीत कशाच्या आधारे 35 जागा मागितल्या जात आहेत असा प्रश्‍नही भाजपकडून उपस्थित होत आहे. घाटकोपर, चेंबूर, धारावी या विभागांमधून आरपीआयच्या काही जागा निवडून येण्याची शक्यता असल्याने भाजपने या जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे.
-----------------------------------------------------

0 Response to "तिकीटासाठी धुमशान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel