-->
संपादकीय पान--अग्रलेख--१८ ऑक्टोबर २०१३साठी--
-----------------------------
मार्क्सवादी विचारवंत, नाटककार
------------------------
गोविंद पुरुषोत्तम उर्फ गो.पु.देशपांडे यांच्या जाण्याने एक मार्क्सवादी विचारवंत, ज्येष्ठ नाटककार, समीक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे. गोपुंची वैचारिक पठडी ही मार्क्स-लेलिन यांच्या मार्गाने जाणारी होती. त्यांच्या नाट्यकलाकृतीतून पावलोपावली ती जाणवे. कष्टकर्‍यांच्या प्रश्‍नाला त्यांनी याव्दारे नेहमी वाचा फोडली. त्यांची नाटके ही पूर्णपणे राजकीय होती आणि त्याला डाव्या विचारसारणीचा बाज होता. उद्ध्वस्त धर्मशाळा या त्यांच्या पहिल्या नाटकाने केवळ मराठीतच नव्हे तर भारतीय रंगभूमीला एक नवे दालन उघडून दिले. राजकीय पार्श्‍वभूमी असलेली नाटके अनेकांनी लिहिली परंतु त्यांच्या नाटकातून राजकीय परिस्थितीचे भाष्य, विविध विचारसारणीतला संघर्ष प्रभाविपणे दाखविण्यात आला. धर्मशाळेनंतर आलेल्या अंधारयात्रा, रस्ते, चाणाक्य विष्णुपंत, शेवटचा दीस ही नाटके देखील राजकीयच होती. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील सत्यशोधक हे नाटक तसे वेगळे होते. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी मुक्ता मनोहर यांच्या समवेत पुणे महानगरपालिका युनियनतर्फे पुण्यातील सफाई कामगारांना सोबत घेऊन सत्यशोधकचे प्रयोग ठिकठिकाणी केले. महाराष्ट्रभर या नाटकाची चर्चाही जाली. हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील थोडे वेगळे नाटक ठरले. त्यावर काहींनी टीकाही केली. परंतु गोपुंना टीकेची कधीच पर्वा नव्हती. त्यांनी आपला विचार व ध्येयधोरणे कधीच सोडली नाहीत. खरे तर गोपुंची नाटके सत्यदेव दुबे आणि विजय केंकरे यांनी लोकांपर्यंत पोहोचविली. हे या दोघांना जसे श्रेय जाते त्याहून काकणभर जास्त श्रेय गोपुंच्या लेखणीला जाते हे कुणीही मान्य करील. अशा या गोपुंना समाजवादाचे बाळकडू मिळाले ते वडिलोपार्जित. कारण त्यांच्या घरात समाजवादाची ठाम बैठक होती. त्यांचे आजोबा हे टिळकांचे कट्टर समर्थक आणि आई-वडिल हे स्वातंत्र्य चळवळीतील. संपूर्ण घरच विचाराने लोकशाही समाजवादी. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण याचे बाळक़डू त्यांना बालपणापासूनच मिळाले. त्यांचा जन्म नाशिकचा. मात्र सर्व शिक्षण रहिमतपूर येथे म्हणजे सातारा जिल्ह्यात झाले. पुढे त्यांनी बडोद्यातून बी.ए. व पुणे विद्यापीठातून एम.ए. केले. प्राचिन भारताचा इतिहास या विषयात त्यांनी जवाहरलाल विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. अशा प्रकारे त्यांचे प्रत्येक टप्प्यात शिक्षण वेगवेगळ्या शहरात झाले. परंतु शेवटी ते दिल्लीत स्थिरावले. त्यांचा मूळ पिंड प्राध्यापकी पेशाचा असल्याने ते दिल्लीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिजमध्ये अभ्यासक म्हणून दाखल झाले. त्यानंतर ही संस्था दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विलिन झाली. २००३ साली सेवानिवृत्त होईपर्यंत गोपु नेहरु विद्यापीठात होते. अर्थसास्त्राचे अभ्यासक म्हणून ते जसे परिचित होते तसे ते चीनचे अभ्यासक म्हणून त्यांचे देशात नाव होते. आन्तरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा एक आवडीचा विषय. त्यातच चीन हा त्यांचा खास अभ्याषाचा विषय. भारत सरकारने त्यांची चीनविषयीची मते नेहमीच आजमावून त्याव्दारे आपले चीनशी संबंध कसे असावेत याचे धोरण आखणे यात गोपुंचा मोठेपणा होता. माक्सर्र्वादावर त्यांची अढळ श्रध्दा होती. याविषयावर त्यांच्यांशी कुणी चर्चा करावयास गेल्यास त्यांना आवडे. मात्र मार्क्सवाद कालबाह्य झाला आहे असे त्यांना कधीच वाटले नाही. असे असतानाही त्यांनी कोणत्याही मार्क्सवादाशी नाते जोडणार्‍या पक्षाशी स्वत:ला बांधून घेणे पसंत केले नाही. डाव्या विचारसारणीचा गंभीरपणे लेखन असलेल्या इकॉनॉमिक अँड पोलिटीकल विकली या नियतकालीकात त्यांचा स्तंभ होता. यात त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले. त्यावर देशात बुध्दीवंतांमध्ये चर्चा झाल्या. अनेक वर्षे या नियतकालीकात त्यांचा स्तंभ असणे ही एक मोठी प्रतिष्ठेची बाब होती. गोपुंनी मराठी नाटके लिहिली असली तरीही त्यांचा कॅनव्हास हा देशव्यापी इंग्रजी भाषेतला होता. मराठी लिखाणात ते फारसे कधीच गुरफुटून गेले नाहीत. त्यांनी चर्चानाट्य हा प्रकार पहिल्यांदा मराठीत आणला. गोपुं मार्क्सवादी असूनही ते कधी कुठल्या लढ्यात सक्रिय नव्हते किंवा कुठल्या संघर्षात नव्हते. तो त्यांचा तसा पिंडही नव्हता. मात्र ते मार्क्सवादी अभ्यासक होते. आपल्या मिस्किल टिपण्यांमधून मैफिली रंगवत असत. आपल्या मित्रांमध्ये सहजतेने मिळणारे गोपुं हे सर्वसामान्य लोकांमध्ये कधीच रमले नाहीत. एक कवितासंग्रह व नऊ नाटके आणि दोन खंडी निबंधमाला हे त्यांच्या गाठीशी असलेले साहित्य. मात्र त्यापेक्षाही त्यांनी वैचारिक लिखाण मोठ्या प्रामणात केले. २००९ साली त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय त्यांना फारसे पुरस्कार लाभले नाहीत हे एक दुदैव. गोपुंच्या विद्वतेची महाराष्ट्राने हवी तेवढी दखल घेतली नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते. कदाचित त्यांचा कार्यकाळ जास्त दिल्लीत गेल्यानेही असेल. निवृत्तीनंतर ते पुण्यात आले आणि तेथेच रमले. शेवटपर्यंत त्यांनी आपला विचार, ध्येय, धोरणे यांच्याशी कधीच तडजोड केली नाही. आपल्या मार्क्सवादी विचाराशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. गोपुंना पौर्वात्य व पाश्‍चिमात्य तत्वज्ञान, विचार परंपरेची पुरेपुर ओळख होती. त्यावर सखोल अभ्यासही होता. जागतिक प्रवाहांचे भरपूर भान होते. त्यात त्यांच्या वैचारिकतेला मार्क्सच्या विचारांचे अस्तर असल्याने त्यांच्याकडे एक वेगळा दृष्टीकोन होता. जागतिक दृष्टीकोन होता. चीनशी आपण कसे संबंध ठेवायचे याचे धोरण त्याच्या डोक्यात होते. असा मार्क्सवादी विचारवंत पुढील काळात शोधून सापडणार नाही.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel