-->
पावसाचे पुनरागमन / खते महागली

पावसाचे पुनरागमन / खते महागली

बुधवार दि. 04 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पावसाचे पुनरागमन 
राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोमवार सायंकाळपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांची रेलचेल सुरु झाली व पावसाचे पुनरागमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरु झाल्या. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन शुक्रवारपर्य्ंत राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला होता. पश्‍चिम किनार्‍यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि पूर्व किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वार्‍यांमुळे सोमवारी कोकणात काही ठिकाणी आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतकर्‍यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारल्याने अजून पुढील चार दिवस पाऊस पडला नसता तर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले असते. परंतु पावसाने चंगलाच दिलासा दिला. नैर्ऋत्य मोसमी पावसाने सध्या कोकणवगळता राज्यातील इतर भागामध्ये चिंताजनक उघडीप दिली होती. बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचा पट्टा गायब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. 5 जुलैनंतर समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर वाढू शकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता, तो आता खरा ठरत आहे. जूनच्या दुसर्‍या आठवडयामध्ये मोसमी वारे राज्यात दाखल झाले. त्यानंतर सुमारे पंधरा दिवस जोरदार पावसाला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे कोकणवगळता राज्यात फारशी पावसाची दमदार हजेरी नव्हती. जूनच्या तिसर्‍या आठवडयात मात्र तीन ते चार दिवस कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर आतापर्यंत मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकला नाही. आकाशात ढग निर्माण होतात. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतात. मात्र, दमदार पाऊस गायब होता. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागांमध्ये सध्या कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाली होती. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र असले, तरी त्याची तीव्रता कमी होती. त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस पडत असला, तरी तो सर्वदूर पोहचू शकत नाही. राज्याच्या घाटमाथ्यावर तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा 3 हजार 246 प्रकल्पांंची एकूण क्षमता 1442.79 टीएमसी असून, मिळून जून अखेरपर्यंत धरणांमध्ये 300.16 टीएमसी (21 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा गतवर्षीपेक्षा दोन टक्के अधिक पाणीसाठा असून, गेल्यावर्षी याच तारखेला धरणांमध्ये अवघा 19 टक्के होता. मे आणि जून महिन्यात राज्यात पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी समाधानकारक पाणीसाठ्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात 28 टक्के, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोयना धरणात 44 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीत आहे. अमरावती विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून 25.34 टीएमसी (17 टक्के), नागपूर विभागात 18.68 टीएमसी (11 टक्के), कोकण विभागात 51.08 टीएमसी (41 टक्के), नाशिक विभागात 40.74 टीएमसी (19 टक्के), पुणे विभागात 115.90 टीएमसी (22 टक्के), तर मराठवाडा विभागात 48.36 टीएमसी (19 टक्के) पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्याचा हा पाऊस सर्वांसाठीच दिलासादायक ठरणार आहे.
खते महागली
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे यंदाच्या खरिपात खतांच्या किमतीत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. सरकारी नियंत्रणामुळे युरिया खताच्या किमती स्थिर असल्या तरी सरकारतर्फे खत उत्पादकांना दिल्या जाणार्‍या अनुदानात वाढ करावी लागणार आहे. जागतिक पातळीवर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून खतांच्या किमती वधारल्या आहेत. डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किमतीत रब्बी हंगामाच्या तुलनेत यंदा 20 टक्के वाढ झाली. डीएपी खताची 50 किलोची पिशवी आता 1290 रुपयांवर गेली आहे. तर म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) खताच्या किमतीत 13 टक्के वाढ होऊन प्रतिपिशवी 700 रुपये झाली. युरिया खताच्या किमतीतील वाढीचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. खतांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे खत उद्योगातील जाणकारांचे मत आहे. खतांच्या किमतीत मोठी वाढ होऊनही समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज आणि खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा यामुळे खतांच्या मागणीत फार घट होण्याची शक्यता नाही, असे मानले जात आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण 158 लाख टन युरिया, 49.2 लाख टन डीएपी, 20.25 लाख टन एमओपी, 49.73 लाख टन एनपीके आणि 26.25 लाख टन सिंगल सुपर फॉस्फेट इतकी गरज असतेे. खतांची उपलब्धता पाहता ही गरज पूर्ण होण्यात काही अडचण येणार नाही, परंतु खतांच्या किंमती वाढल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.
----------------------------------------------

Related Posts

0 Response to "पावसाचे पुनरागमन / खते महागली "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel