-->
संपादकीय पान--चिंतन--१९ ऑक्टोबर २०१३ साठी-
------------------------
भारत-चीन संबंध संवेदनाक्षम असले तरीही...
-----------------------
गेल्या आठवड्यात संबंधी दोन महत्वाच्या बातम्या होत्या. त्यातील पहिली बातमी म्हणजे पाकिस्तानला दोन अणुउर्जा प्रकल्प उभारण्यासाठी चीन सहकार्य करणार आहे. चीनी सरकारने अशा प्रकारे पाकिस्तानला अणु प्रकल्पाबाबत मदत करण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वीही अशी मदत केलेली आहे. अर्थातच आपल्यासाठी ही बाब चिंतेची जरुर आहे. तर दुसरी बातमी म्हणजे चीनी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसामध्ये सवलती देण्याचा सरकार विचार करणार आहे. मात्र यासंबधी घेतला जाणार निर्णय केंद्र सरकारने सध्या तरी पुढे ढकलला आहे. भारत व चीन  संबंध हे १९६४ साली आपल्याशी युध्द झाल्यापासून अतिशय संवेदनाक्षम असे राहिले आहेत. मात्र गेल्या एका दशकात आपले व्यापारी संबंध टप्प्याटप्प्याने सुधारु लागले आणि उभयतांमध्ये काही प्रमाणात विश्‍वास संपादन झाला.
आपल्याला चीनशी काय कुणाशीच युध्द करणे परवडणारे नाही. त्यामुळे आपल्याला चीनशी संबंध हे चांगलेच ठेवावे लागणार आहेत. अनेकदा चीन आपल्या वादग्रस्त प्रांतात घुसखोरी करतो हे वास्तव लक्षात घेतले तरीही आपल्याला कधी दोन पावले मागे जाणे शहाणपणाचे ठरते. आता देखील गेल्या सहा महिन्यात चीनने आपल्या सीमेवर घुसखोरी केल्याचे प्रकार घडले आहेत. आपल्या सीमांचे रक्षण करणे हा आपला हक्कच आहे. परंतु चीनशी आपल्याला फार काळ संबंध ताणून धरुन चालणार नाही. त्यासाठी ठोस धोरणे आखून चीनशी संबंध सुधारावे लागणार आहेत. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण त्या देशाशी व्यापार वाढविणे. गेल्या दशकात आपले चीनशी व्यापारी संबंध चांगलेच सुधारले आहेत. आता उभय देशांचा व्यापार ६८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारताची निर्यात चीनला कमी आहे व आयात जास्त आहे. त्यामुळे व्यापार हा चीनच्या फायद्यात आहे. परंतु आपला एक शेजारचा देश व एक महासत्ता म्हणून चीनशी आपल्याला व्यापारी दोस्ती वाढवायची आहे. चालू वर्षी चीनचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार आहेत. त्यावेळी आपल्याला आपल्या वस्तूंची निर्यात कशी वाढविता येईल यासाठी पंतप्रधांनकडे आग्रह धरता येईल. चीनने गेल्या दशकात जी प्रगती केली आहे त्याचे मॉडेल आपण आपल्याकडे यशस्वीरित्या राबवू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे चीनने पायाभूत सुविधा ज्या प्रकारे आपल्या देशात उभारल्या आहेत त्याचे आपल्याला अनुकरण करता येईल.
चीनशी आपला असलेला सीमा तंटा एवढ्या लवकर काही मिटू शकत नाही. त्यामुळे सीमा तंट्याचे जर आपण पालूपद धरुन बसलो तर आपण चीनशी कधीच संबंध सुधारु शकत नाही. त्यामुळे सीमा तंटा हा कायमच राहाणार हे गृहीत धरुन आपल्याला चीनशी संबंध कसे सुधारता येतील हे पहावे लागणार आहे. भारताने आता सॉफ्टवेअर उद्योगात जागतिक बाजारपेठेत नाव कमाविले आहे. तर चीनने हार्डवेअरमध्ये मोठी बाजी मारली आहे. अशा वेळी भारत आणि चीन आय.टी. उद्योगात एकत्र येऊन जग काबीज करु शकतात. तसेच चीन ही लाल सत्ता अमेरिकेला आव्हान देण्याच्या स्थितीत आहे. अशा वेळी आपल्याला अमेरिकन डावपेचाला शह देण्यासाठी चीनशी मैत्री करणे केव्हाही फायदेशीर ठरु शकते.  त्यामुळे चीनशी आपले संबंध कितीही नाजूक असले तरीही तो नाजुकपणा गृहीत धरुन आपल्याला एक शेजारी, व्यापरवृध्दी करण्याची चांगली संधी असलेला देश म्हणून संबंध प्रस्थापित करावे लागतील.
-------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel