-->
मराठी शाळांची अधोगती / उन्हाचे चटके

मराठी शाळांची अधोगती / उन्हाचे चटके

मंगळवार दि. 02 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मराठी शाळांची अधोगती
मराठी शाळांपासून पालक वर्ग दुरावत चालला असून मराठी माध्यमाच्या या अधोगतीला राजकारण्यांची उदासीनताच कारणीभूत आहे, असा सूर मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या परिषदेत उमटला. महानगरीय समस्या आणि उपाययोजना या विषयावर मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सांताक्रूझ, कलिना येथे मुंबई विद्यापीठात परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध विषयांतील मराठीप्रेमी तज्ज्ञ, पालक, शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी आपली मते मनमोकळेपणाने मांडली. मराठी शाळांचा दर्जाही घसरत असून केवळ त्याचमुळे नव्हे तर मराठीच्या संदर्भात अनास्था असल्यामुळे मराठी शाळांची ही दुर्दशा झाली आहे. याला पालक, राजकारणी तसेच शालांचे प्रशासनही जबाबदार आहे. मराठी शाळांना शिक्षकांच्या पगाराच्या चार टक्के अनुदान मिळते. त्यातून ते फक्त पाण्याची आणि विजेची देयके भरू शकतात. मुंबईतील जास्तीत जास्त शिक्षक मुंबईबाहेरून येतात. त्यांना शाळेत जास्त वेळ थांबून उपक्रम राबवता येत नाहीत. त्यामुळे मराठी शाळांच्या शिक्षकांना सरकारने शाळेच्या आवारात घर द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु ती अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळत नाही. तसेच आठवीपर्यंत सरसकट सगळ्यांना उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे गरीब कुटुंबांतील पालकांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. यामुळे एका पिढीचे नुकसान झाले आहेे. मराठी शाळांना मान्यता मिळवण्यासाठी एक कि.मी.च्या परिघात असणार्‍या मराठी शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र आणावे लागते. हा नियम इंग्रजी शाळांसाठी नाही. अशा प्रकारे मराठी शाळांवर असे नियम लादून सरकारही अन्याय करीत आहे. तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे गरजेचे असताना सरकार मराठी शाळेत महिन्याला 15-20 रुपये शुल्क घ्यायला लावते. ते घेतले नाही तर शिक्षकांचे पगार मिळणार नाहीत. म्हणजेच सरकारच शाळा चालकांना कायदा मोडायला लावते, ही दुर्दैवी बाब ठरावी. तर स्थानिक भाषेची सक्ती ही कायदेशीर आहे, मात्र मराठी अनिवार्य करणे ही राजकारण्यांना हुकूमशाही वाटते. बृहत् आराखडयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मराठी अभ्यास केंद्र न्यायालयीन लढाई लढत आहे. तर खासगी शाळांतील 25 टक्के प्रवेश गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवताना सरकारने मातृभाषेतून शिक्षणाचा मुद्दा लक्षातच घेतलेला नाही. त्यामुळे हा कायदा इंग्रजी शाळांसाठी फायद्याचा ठरत आहे. मराठी शाळांना भेडसाविणार्‍या या प्रश्‍नांबाबत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊनही त्यांना प्रतिसाद मिळत नाही. याचा अर्थ स्पष्टच आहे, राजकारणी, सरकार व पालक या कुणालाच मराठी शाळांविषयी आस्ता नाही. सत्ताधार्‍यांना तर मराठी भाषेतील शाळा या केवळ मराठीचे राजकारण करण्यासाठी पाहिजे आहेत. ही अनास्था पाहता मराठी अजून काही वर्षांनी केवळ बोली भाषाच म्हणून शिल्लक राहिले असे दिसते.
उन्हाचे चटके
देशातील मध्यावधी निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना आता राज्यात उन्हाने जोर धरला असून उन्हाचे चटके आता भासू लागले आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने उन्हाचा चटका आणखी वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्याने तेथे अंगाची लाहीलाही होत आहे. मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा चटका अधिक आहे. कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणी मात्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे. हवामानाच्या कोरड्या स्थितीमुळे तापमान कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात झपाट्याने वाढ सुरू झाली होती. सद्यस्थितीत जवळपास अठराहून अधिक शहरांमध्ये तापमानाच्या पार्‍याने चाळिशी ओलांडली आहे. मार्च महिन्यामध्ये यापूर्वी अगदी एखाद-दुसर्‍या वर्षीच तापमानाने चाळिशी पार केली होती. आता यंदा तर उकाडा सुरु झाल्यावर लगेचच काही ठिकाणी सलग चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर नोंदविला जात आहे. दुपारी उन्हाच्या चटक्यांनी अंग भाजून निघत आहे. गेल्या आठवड्यात कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत तब्बल 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. किमान तापमानाचा पाराही वर गेला असल्याने रात्री चांगलाच उकाडा जाणवत आहे. राज्यात अकोला येथे 43.6 अंश उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या भागासह मराठवाडयातील परभणी येथे कमाल तापमानाचा पारा 43 अंशांवर आहे. याशिवाय पुणे, जळगाव, मालेगाव, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीड, ब्रद्मपुरी, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर पोहोचला आहे. गेल्या काही वर्षात ऊन, पाऊस व थंडी हे तीनही मोसम अतिशय टोकाचे झाले आहेत. निर्सगाचा समतोल ढळत चालला आहे हे मात्र नक्कीच. सर्वच मानवजातीसाठी ही धोक्याची घंटा ठरावी.
----------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "मराठी शाळांची अधोगती / उन्हाचे चटके"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel