-->
अगोदर शत्रू ओळखा

अगोदर शत्रू ओळखा

बुधवार दि. 03 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अगोदर शत्रू ओळखा
कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या पारंपारिक उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघाबरोबरच केरळातील वाययनाड या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. भाजपाने यावर प्रतिक्रिया देताना अमेठी असुरक्षित असल्यामुळे केरळातील हा मतदारसंघ निवडल्याचे म्हटले आहे. मात्र आजवर कॉँग्रेस अध्यक्षांनी दोन ठिकाणी प्रामुख्याने उत्तर भारत व दक्षिणेतून निवडणूक लढविण्याची परंपरा आहे. राहूल गांधींविषयी अमेठीमध्ये नाराजी असलेही परंतु ते पडणार निश्‍चितच नाहीत. परंतु भाजपाचा हा प्रचारकी थाट झाला. राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी या 1978 मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. 1980 मध्ये त्या आंध्र प्रदेशातील मेडक मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आई सोनिया गांधी या 1999 मध्ये अमेठीसह कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राहूल गांधी यांनी दोन मतदारसंघ निवडले आहेत. हा मतदारसंघ काँग्रेससाठी अत्यंत सुरक्षित समजला जातो. जवळपास निम्मे अल्पसंख्याक मतदार, केरळात असला तरी तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेला लागून असल्यानेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी केरळातील मलबार प्रदेशातील वायनाड मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. केरळातील मलबार प्रदेशात वायनाड, कोझीकोड आणि मल्लापुरम या तीन जिल्ह्यांतील तालुक्यांचा मिळून वायनाड हा मतदारसंघ आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकातील म्हैसूना विभागाला लागून हा मतदारसंघ आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांशी जोडणारा दुवा म्हणूनच वायनाड मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. हा मतदारसंघ दक्षिणेतील अत्यंत मोक्याचा समजला जातो. तीन राज्यांसाठी हा एक महत्वाचा समजला जातो. राहुल गांधी यांनी दक्षिण भारतातून निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होती. शेवटी राहूल गांधी यांनी हा मतदारसंघ निवडला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार एम.आय. शहनवास हे निवडून आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. 2009 मध्ये काँग्रेसचा उमेदवार दीड लाखांनी विजयी झाला होता. 2014 मध्ये शहनवास यांचे मताधिक्य 20 हजारांपर्यंत घटले होते. 2009 मध्ये भाजप उमेदवाराला 3.85 टक्के मते मिळाली होती, तर 2014 च्या निवडणुकीत ती दुपटीने वाढली होती. वायनाड जिल्ह्यात हिंदू लोकसंख्या ही 49 टक्क्यांच्या आसपास आहे. हिंदू मतदारांमध्ये दलित मतदारांचे प्रमाण मोठे आहे. मुस्लिम 29 टक्के तर ख्रिश्‍चन 21 टक्क्यांच्या आसपास मतदार येते आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्‍चन एकत्रित लोकसंख्याही 50 टक्क्यांच्या आसपास आहे. तीन जिल्ह्यांच्या एकत्रित वायनाड मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या 55 टक्क्यांच्या जवळपास आहे. या मतदारसंघात मुस्लिम लीगचा प्रभाव आहे. मुस्लिम लीग हा काँग्रेसप्रणीत आघाडीचा घटक पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन आणि मुस्लिम लीगची ताकद यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी तेवढे आव्हान नसेल. वायनाड मतदारसंघात फक्त चार टक्क्यांच्या आसपास नागरीकरण झाले आहे. उर्वरित भाग ग्रामीण भागात मोडतो. शेतकरी वर्गातील नाराजी उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी केरळाला झालेल्या पुराच्या फटक्यानंतर शेतकरी आणि दुर्बल घटकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या विरोधात नाराजी आहे. याचाही लाभ उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. येथे भाजपाचे फारसे अस्तित्व नाही. डाव्या आघाडीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे हा मतदार संघ आहे. त्यामुळे भाकपच्या उमेदवार राहूल गांधींच्या विरोधात लढत देईल. राहूल गांधींना या मतदारसंघातून विजयश्री मिळविण्यासाठी डाव्या पक्षांशी येथे दोन हात करावे लागणार आहेत. देशपातळीवर राहूल गांधी यांनी सर्व विरोधी पक्षीयांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यात दोन्ही कम्युनिस्टांसह सर्व डाव्या पक्षांचा त्यात समावेश होता. परंतु भाकप व माकप या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी अजूनही आपला नेमका शत्रू कोण भाजपा की कॉँग्रेस हे ठोसपणे ठरविलेले नाही. या दोन्ही पक्षांना ते एकाच पारड्यात मोजतात, ही ते सर्वात मोठी चूक करीत आहेत. आज देशापुढील भाजपाचा धोका संपवायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कॉँग्रेसने पुढाकार घेतला होता. परंतु या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी कॉँग्रेसलाही भाजपाच्या पारड्यात तोलल्याने ही आघाडी काही होऊ शकलेली नाही. माकपचे येचुरी यांना हे मान्य होत नाही, ते कॉँग्रेससोबत जाण्यास तयार आहेत परंतु त्याना पक्षात जोरदार विरोेध आहे. अशा स्थितीत कम्युनिस्ट नजिकच्या काळात आपले सध्या असलेले अस्तित्वही गमावून बसण्याचा धोका आहे. सोलापूरलाही असेच झाले आहे. या मतदारसंघात माकपची चांगली मते आहेत. परंतु त्यांनी आता काँग्रेसच्या सुशीलकुमार यांना पाठिंबा देण्याऐवजी वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तेथे भाजपाचा विजय होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही कम्युनिस्टांनी आपला नेमका शत्रू कोण हे ठरविले पाहिजे. राहूल गांंधींनाही वायनाडमध्ये निरर्थक विरोध करणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारुन घेण्याचे ठरणार आहे.
---------------------------------------------- 

Related Posts

0 Response to "अगोदर शत्रू ओळखा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel