आव्हाने भाजपा व विरोधकांपुढची...
20 मार्च 2022च्या मोहोरसाठी चिंतन
आव्हाने भाजपा व विरोधकांपुढची...
उत्तरप्रदेशसह पाच राज्यातील झालेल्या निवडणुकात भाजपाची मोठ्या प्रमाणात सरशी झाल्याने भाजपा खऱ्या अर्थाने सुखावला आहे. त्यात आपने पंजाबमध्ये दिमाखदार यश संपादन केल्याने त्यांनाही आपले देशात उज्वल भवितव्य असल्याचे दिसू लागले आहे. नेतृत्वहिन असलेल्या कॉँग्रेसचा पराभवाचा पाढा काही थांबेल असे काही दिसत नाही. यावेळच्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसची कामगिरी निराशाजनकच होती. अर्थात राहूल व प्रियांका गांधी यांनी गेल्या दोन महिन्यात अनेक प्रचार सभा घेऊन पक्षात जान आणण्याचा जरुर प्रयत्न केला, परंतु शेवटच्या टप्प्यातील हा प्रयत्न असल्याने त्याला फारसे काही यश मिळाले नाही. गेल्या चार-साडे चार वर्षात कॉँग्रेसने उत्तरप्रदेशासारख्या एका मोठ्या राज्याकडे फारसे लक्ष पुरविले नव्हते. त्याचेच फलित या पराभवाच्या रुपाने मिळाले आहे असे म्हणता येईल. भाजपाला उत्तरप्रदेशासह व पंजाब वगळता अन्य राज्यात चांगले यश मिळाल्याने भाजपाच्या गोटात आनंद आहे. मात्र उत्तरप्रदेशातील भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी पाहता त्यातील शंभरहून विजेते हे २०० ते १००० मतांनी विजयी झालेले आहेत. म्हणजे त्यांचा विजय हा काठावरचाच म्हटला पाहिजे. भाजपाचा विजय झाला असला तरीही त्यात फार हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही, हे वास्तव लक्षात घेण्याएवजी भाजपाने आपल्या विजयाला सर्वाच्च स्थान दिले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हे योग्य असले तरीही हे वास्तव लक्षात घेऊन भाजपाने पुढील वाटचाल केली पाहिजे. सध्या नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान जसे आहेत तसेच ते भाजपाचे सर्वेसर्वा आहेत. निवडणुकीत मते खेचणारे ते एक यंत्र ठरले आहेत. एकेकाळी स्व. इंदिरा गांधींकडेही कॉँग्रेस कार्यकर्ते याच नजरेततून पहात असत. मोदींच्या या विजयानंतर आपण लोकशाही साच्यातून एकाधिकारशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, हे भाजपाने देखील मान्य केले पाहिजे. आज मोदींना पक्षात आव्हान देणारे कुणीच नाही. मात्र दुसऱ्या नंबरसाठी धडपडणारे अनेक नेते त्यांच्याकडे आहेत. त्यात आघाडीवर अमित शहा हे आहेत. त्याखालोखाल नितीन गडकरी, राजनाथसिंग हे देखील आहेत. त्याचबरोबर राज्यातील नेत्यांमध्ये दिग्वीजयसिंग, देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत. या नेत्यांच्या मनातील इर्षा व मनिषा पक्षाच्या विजयाबरोबर वाढत जाणार आहेत. या नेत्यांना भविष्यात सरकारमध्ये आणखी मोठे स्थान देणे हे एक भाजपपुढील एक मोठे आव्हान असेल. ज्यावेळी पक्षाचा सलग विजय होत जातो त्यावेळी सर्वसामान्य कर्याकर्त्यापासून ते स्थानिक व राष्ट्रीय नेत्यांच्याही अपेक्षा वाढत जातात. या अपेक्षाना प्रत्येक वेळी मुरड घालणे शक्य होत नाही. भविष्यात भाजापापुढे या नेत्यांना व कार्यकर्त्यांना कसे सामावून घेणे हे एक मोठे आव्हान ठरेल. प्रत्येकवेळी विजय झाल्याने सर्वांच्याच अपेक्षा वाढत जातात आणि त्यात जर एखादा पराभव झाला तर त्याचा जबरदस्त धक्का सर्वांना बसतो. कॉँग्रेसपूर्वी या सर्व टप्प्यातून गेलेली आहे. सत्तेभोवती सर्व राजकारण केंद्रीत झालेल्या पक्षाला याचा सामना करावा लागतो व त्यातून नवनवीन आव्हाने निर्माण होतात. आता भाजपा या टप्प्यावर आला आहे. भाजपाप्रमाणे विरोधकांवर मोठी आव्हाने आली आहेत. एक सर्वात महत्वाचे आव्हान म्हणजे सत्ताधारी भाजपा ज्या प्रकारे आक्रमकरित्या वाटचाल करीत आहे व विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी जे उपाय योजत आहे ते आव्हान कसे पेलणार?. महाराष्ट्रातील राज्य सरकार पाडण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहता भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो हेच दिसते. भाजपचा मुकाबला करण्यासाठी शरद पवारांनी आव्हान स्वीकारले आहे, त्यामुळे आगामी काळात दोघांच्याही चाली अधिक आक्रमतेने चालविल्या जातील. विरोधकांना जर भाजपाशी यशस्वी मुकाबला करावयाचा असेल तर आपल्यातील मतभेद दूर सारुन आगामी निवडणुकात एकास एक लढत देण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रामुख्याने आगामी काळात मुंबई महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष टोकाला जाणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकदिलाने लढल्यासच भाजपाचा विजयी रथ मुंबईत रोखता येईल. मात्र तसे करण्याची खरीच मानसिकता या तिन्ही पक्षांची आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्यांनी देखील एकत्र येताना पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा दूर ठेऊन काम करावे लागणार आहे. ममता पासून अनेकांना आपली कुवत नसतानाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. याचा फायदा अखेरीस भाजपाला होतो हे आजवर अनेकदा सिध्द झाले आहे. पंजाबमध्ये आपने चांगलेच यश मिळविले. तेथे लोकांना कॉंग्रसेही नको होती व त्याजोडीने अकाली दल व भाजपाही नको होती. त्यातून आपने ही पोकळी भरुन काढली व विजयश्री खेचून आणली. खरे तर अशी कमी जास्त स्थिती देशपातळीवर आहे. परंतु विरोधकांची पोकळी भरुन काढणार आज नेता नाही. आप हा प्रयोग देशपातळीवर करुन यशस्वी होईल का हे आत्ताच सांगता येत नाही. अर्थात आप हा काही समर्थ पर्याय नाही, कारण आप ही भाजपाची टीम बी म्हणूनच ओळखली जाते. नाही तरी केजरीवाल यांनी आपण व आपले कुटुंब संघाशी संबंधित आहोत हे मान्य केलेलेच आहे. नुकत्याच पार पडलेल्या निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार टिकणार का असा एक प्रश्न अनेकांना पडतो. खरे तर हे सरकार आल्यापासून पाडण्याचे सतत प्रयत्न भाजपाचे सुरु आहेत. परंतु त्यात ते यशस्वी झालेले नाहीत. भाजपा जे प्रयत्न करीत आहेत, ते पाहता त्यांचे जनतेपुढे हसे होत आहे. त्यामुळे त्यातून जनतेची सहानभुती महाविकास आघाडीला लाभते. हे सरकार आपल्या कर्माने पडेल असे समजून उतावीळ भाजपाचे नेते काही काळ गप्प बसले तर त्याचा त्यांनाच फायदा होऊ शकेल. उलट अशा प्रकारे भाजपाचे नेते वागून महाविकास आघाडीला भरभक्कम करण्यास हातभार लावत आहेत. आपली अपरिपक्व राजकीय भूमिका व सत्तेचा हव्यास यातून दिसतो. आपल्याकडील राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे याचेच दर्शन यातून होते. भाजपाने विजयी घोडदौड केल्याने त्यांच्यापुढे जशी आव्हाने आहेत तसेच विरोधकांपुढेही पराभवामुळे विविध आव्हाने आहेत. एकूणच आपण यातून व्यक्तीकेंद्रीत लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, हे ही लक्षात घ्यावे लागेलच.
0 Response to "आव्हाने भाजपा व विरोधकांपुढची..."
टिप्पणी पोस्ट करा