निकालानंतर...
13 मार्च 2022च्या मोहोरसाठी चिंतन
निकालानंतर...
उत्तरप्रदेशाचा निकाल अनपेक्षीत लागला असला तरी सर्व विरोधी पक्षांसाठी तो एक जबरदस्त दणका म्हणावयास हवा. २०१४ साली झालेल्या पराभवातून कॉँग्रेस काही विजयी उसळी घ्यायला तयार नाही असेच दिसते. दिल्लीतील यशानंतर सात वर्षानंतर आपने सीमोलंघन केले असून आपने पंजाबमध्ये सत्तेपर्यंत मजल गाठली आहे. पंजाबमध्ये जनतेने भाजपा व कॉँग्रेस या दोघांनाही अव्हेरले आहे. लोकांना एक सशक्त पर्याय पाहिजे होता, तो आपने दिला व त्यासाठी त्यांचे दिल्लीतील काम आपला मदतीला आले असेही म्हणता येईल. अर्थात याचा अर्थ आप हा भाजपाला समर्थ पर्याय देशपातळीवर देऊ शकेल असे दिलत नाही. काही अर्थी आप ही एक भाजपाची टीम बी असल्याचे मत प्रदर्शित केले जाते त्यात काहीसे तथ्य देखील आहे. सध्या तरी आप भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊन वाटचाल करीत आहे. पंजाबमधील आपची कामगिरी उल्लेखनियच आहे. आता जनतेचा विश्वास टिकवून त्यांना सत्तेतील पुढील वाटचाल करावयाची आहे. उत्तरप्रदेश हे देशातील सर्वाधिक मोठे राज्य. त्यामुळे सर्वात जास्त संख्येने लोकप्रतिनिधी असलेले राज्य. येथे जो सत्तेत असतो त्या पक्षाचा केंद्रात सत्ता स्थपनेचा मार्ग सोपा जातो असा आजवरचा इतिहास आहे. यावेळी उत्तरप्रदेशात भाजपाचे भारी नुकसान होईल किंवा सत्ताही गमावेल असे अंदाज होते. परंतु हे सर्व अंदाज खोटे ठरले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगेतून वाहत आलेली प्रेते, महिलांवरील अत्याचार, बेकारी व शेतकरी आंदोलन हे सर्व मुद्दे लक्षात घेता भाजपाचे नुकसान होईल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र तसे काही झालेले नाही. हे सर्व मुद्दे गौण ठरले. तेथे हिदुंत्वाचा विजय झाला आहे. जनतेला त्यांच्या जीवनातील मुलभूत प्रश्नांपेक्षा राममंदीर उभारणीचा प्रश्न महत्वाचा वाटतो, हेच हा निकाल सांगतो. अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेपासूनच उत्तरप्रदेश भगवा व्हायला सुरुवात झाली होती, आता हिंदुत्वाचा उच्चांक गाठला गेला आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, वाढती बेकारी, कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेचे निघालेले दिवाळे या सर्व बाबी फिक्या पडाव्यात एवढी जबरदस्त ताकद हिंदुत्वात आहे. आपल्याकडील जनता कोणत्या बाबींना सध्या प्राधान्य देत आहे हेच यावरुन समजते. भाजपची ताकद म्हणजे त्यांचे संघटन,, कार्यकर्त्यांची भारलेली फळी, अगदी सुक्ष्म पातळीवर केले जाणारे नियोजन, पक्ष कार्यकर्ते सोडूनही इतर लहान, मध्यम संस्थांमार्फत मिळणारा पाठिंबा, सध्या जनतेचे मत बनविण्यास आधारभूत ठरलेल्या सोशल मिडियाची जबरदस्त टीम, मध्यमवर्गीयांचा असलेला पाठिंबा हे सर्व काही एका दिवसात होत नसते. भाजपाने गेल्या काही वर्षात सत्तेवर येण्याअगोदर व सत्तेवर आल्यावरही त्याची आखणी केली. यावेळची उत्तरप्रदेशातील ही निवडणूक हिंदूत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेलेली नाही, मात्र हिंदु मते कशी केंद्रीत होतील हे भाजपाने नियोजनबध्द पाहिले. गेली तीस वर्षे राज्यात सत्तेपासून दूर असलेला कॉँग्रेस पक्ष यावेळी फारसे काही करु शकलेला नाही. यावेळी पक्षाने प्रियांका गांधींना प्रजोक्ट करुन महिला व तरुणांची मोट बांधण्याचे ठरविले होते. परंतु तो त्यांचा प्रयोग काही यशस्वी होऊ शकलेला नाही. गोव्यात कॉँग्रेस सत्तेवर येईल असे वाटत होते. परंतु तेथेही त्यांची सत्ता हुकली आहे. कॉँग्रेसने आता आपली ताकद ओळखून उड्या मारल्या पाहिजेत. विरोधी पक्षांची एकजूट करुन एकत्र तरी लढले पाहिजे किंवा एकला चलो चा नारा देऊन आपली वाटचाल ठेवली पाहिजे. भाजपचे गेल्या सात वर्षात यश यात आहे की ते निवडणूका जिंकत आहेत, पण सत्ता जाऊनही त्यांचे आमदार फुटत नाहीत. इतर कोणाकडे आहे असे केडर किंवा धाकदपटशहा? ही भाजपची पहीली पिढी आहे की ज्यांनी विजय बघितला. अन्यथा तब्बल साठ पासष्ट वर्षे ते फक्त लढत होते. त्यांनी विरोधात असताना अवहेलना सहन केली. लोकसभेत फक्त दोन सिटस असूनही त्यांचा आवाज बुलंद होता. आज कॉँग्रेसकडे संसदेत पन्नास असूनही त्यांचा आवाज क्षीण आहे. सत्तेत नसूनही भाजप पक्ष साठ वर्ष ते माणसं जोडत राहीला. त्याउलट दोन टर्म सत्ता गेली तर कॉँग्रेसमध्ये फूट पडते, याचा अर्थ काय समजायचा. अर्थात ७० व ८०च्या दशकात ज्याप्रमाणे कॉँग्रेस होती आज त्याच स्थितीत भाजपा आहे. भाजपाचेही कॉँग्रेसीकरण सुरु झाले आहे व त्यातून त्यांची अधोगती सुरु होण्यास काही फार वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात तर भाजप म्हणजे चहापेक्षा किटली गरम असे झाले आहे व त्यांचा हा उन्माद या निकालानंतर वाढतच जाणार आहे. या निवडणुकीनंतर भाजपामध्ये योगींचा उदय नव्याने झाला आहे. जरी या यशाचे शिल्पकार मोदी असल्याचे भासविले जात असले तरीही योगींचे पारडे जड झाले आहे. या निवडणुकीचे दीर्घकालीन राजकीय परीणाम दिसणार आहेत. त्यातील भाजपाची सत्ताकांक्षा सतत वाढत जाणार असून त्यातून विरोधकांची सरकारे पाडण्याचे कार्य केले जाईल. त्यातून महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणले जाऊ शकते, खरे तर पाडण्याचे प्रयत्न आता जोरात सुरु होतील. त्याबद्दल शरद पवारांनी भाजपाला जे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर भविष्यात हिंदु-मुस्लिम संबंध आणखीन बिघडत जाणार आहेत. हे संबंध वाईट ठेऊनच भाजपा आपली सत्ता राखू शकते. २०२४ सालची लोकसभा निवडणूक मोदी किंवा भाजपा जिंकणार हे आत्ताच ठामपणे सांगू शकत नसलो तरीही भाजपाचे पारडे मात्र जड झाले आहे हे नक्की.
0 Response to "निकालानंतर..."
टिप्पणी पोस्ट करा