
अस्वस्थ जग...
21 June 2020 मोहोरसाठी चिंतन
अस्वस्थ जग...
सध्या संपूर्ण जगात अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता विविध कारणांसाठी आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढे संपूर्ण जग आता अस्वस्थतेच्या हिंदोळ्यावर आहे. अशी स्थीती शतकातून एकदा येते. दुसऱ्या जागतिक महायुध्दानंतर अशी अस्वस्थता जगात पहिल्यांदाच पहायला मिळते आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे सर्व जग वेढले गेले आहे. जगातील ज्या देशातून कोरोना संपल्याचे आढळले होते तेथे पुन्हा साथ सुरु होत आहे, त्यामुळे या देशातील व एकूणच जगातील अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकेसारख्या आर्थिकदृष्ट्या समृध्द भांडवली देशात वर्णव्देशी कारवायीमुळे तेथेच नव्हे तर अख्या युरोपात निदर्शने होत आहेत. या वर्णव्देशामुळे जगात संतापाची लाट आली आहे, परिणामी कोरोनाच्या चिंतेच्या काळात अस्वस्थता वाढली आहे. तर भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यामुळे व प्रत्यक्ष रक्त सांडल्यामुळे केवळ आशिया खंडच नाही तर संपूर्ण जग अस्वस्थ झाले आहे. कारण चीन हा जगाशी व्यापाराने जोडला गेलेला आहे. जर उभय देशातील संघर्ष वाढून जर त्याचे युध्दात रुपांतर झाले तर आशिया खंडातील चित्र पालटू शकते त्यामुळेही जगात अस्वस्थता आहे. या तीन कारणांपैकी आपण सर्वात प्रथम कोरोनाचा विचार करु. ज्या विषाणूने जगाला ठप्प करुन टाकले आहे त्यावर काही देश नियंत्रण मिळवतात असे दिसत असतानाच पुन्हा एकदा तेथे ही साथ बळावत चालली आहे. न्यूझीलंडने आपण कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले आणि काही दिवसातच तेथे पुन्हा रुग्ण आढळले. चीन व दक्षिण कोरीयात रुग्ण कमी होत असल्याचे चिन्ह दिसत असताना या साथीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. 1920 साली आलेल्या स्पॅनिश फ्लू च्या वेळी असेच झाले होते. ही साथ आटोक्यात येते आहे असे दिसत असताना दुसरी मोठी लाट आली व त्यात सर्वाधिक बळी गेले होते. आता देखील अशीच दुसरी लाट येणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. आपल्याकडे देखील कोरोनाचे देशात रुग्ण वाढत चालले आहेत. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत आपण चौथ्या क्रामांकावर आहोत. पुढील पंधरा दिवसात वाढीचा हा आलेख चढता असले व त्यानंतर घसरण सुरु होईल, असे एका पाहाणीत आढळले आहे. जगातील घसरण ज्या पध्दतीने झाली त्याचा आलेख पाहून हा सर्व्हे करण्यात आला आहे. आपल्याकडे आता लॉकडाऊन हळूहळू शिथील केले जात आहे त्याचा परिणाम म्हणूनही रुग्ण वाढत जातील. अर्थात यानुसार घडले तर ठीकच, मात्र एका आणखी अहवालानुसार, नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत जाणार असून त्यानंतर घसरणीला लागतील. अर्थात हे सर्व अंदाज आहेत. मे महिन्यात आपल्याकडे 15 लाख रुग्ण असतील असा अंदाज होता. परंतु तो खोटा ठरला. असेही म्हटले जाते की, आपल्या देशातील सुमारे 70 टक्के जनतेला कोरोना झालेला असेल. काहींना कोरोना झालेला कळणारही नाही, कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल. मात्र ज्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती कमी असेल त्यांना कोरोनाची लक्षणे दिसतील. त्यातही साठीच्या वर असलेल्या व ज्यांना डायबिटीस व बी.पी.चा त्रास आहे त्यांना जास्त धोका आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प झाल्या आहेत. विकसीत देशांना याचा जास्त फटका बसणार नाही, मात्र भारतासारख्या विकसनशील देशांना मात्र शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. त्यातच आपली अर्थव्यवस्था कोरोनाची साथ सुरु होण्यापूर्वीच डबघाईला आली होती. कोरोनामुळे तर त्यात आणखीनच भर पडली. कोरोनामुळे सारे जग अस्वस्थ असताना अमेरिकेत एका कृष्णवर्णीय नागरिकावर श्वतवर्णिय पोलिसाने हल्ला केल्याने त्याचे पडसाद साऱ्या जगात उमटले आहेत. विकसीत म्हणून मिरवित असलेली ही अमेरिका आतून कशी वर्णव्देशी आहे हे जगाने पुन्हा एकदा पाहिले. याचा निषेध जसा अमेरिकेत विविध शहरातून होतो आहे तसाच जगाच्या कानाकोपऱ्यातूनही होत आहे. संपूर्ण युरोपात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे निघत आहेत. सध्या कोरोनाची साथ अमेरिकेत नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असतानाही मोठ्या संख्येने जी निदर्शने होत आहेत हे पाहता अमेरिकेतील वर्णव्देशाविरोधात मोठे जनमत संघटीत झाले आहे. यातून ट्रम्प यांना आगामी निवडणूक कठीण जाईल असेही बोलले जाते. कोरोना व वर्णव्देशी विरोधी लढा या जागतिक पार्श्वभूमीवर चीनने भारतावरील सीमेवर आक्रमण केल्याने आशिया खंडातील अस्वस्थता वाढली आहे. भारत सरकारच्या विदेशी धोरणाचे हे पूर्णपणे अपयशच म्हटले पाहिजे. आजवर पाकिस्तानशी संबंध बिघडलेले होतेच. आता नेपाळसारखा आपला शेजारचा छोटा देशही भारताकडे पाहून डोळे वटारु लागला आहे, तर चीनने गेल्या 50 वर्षात प्रथमच हल्ला करुन रक्तपात घडविला आहे. त्यामुळे भारताचे शेजारी त्याच्यावर नाराज आहेत हे स्पष्टच आहे. मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात आपल्या शेजाऱ्यांशी संबंध सुधारले की बिघडवले असा प्रश्न उपस्थित होतो. आन्तरराष्ट्रीय राजकारण व देशांशी मैत्री करण्याचे धोरण हे मोठ्या खुबीने हाताळावे लागते. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही सध्याच्या काळात जगात दादागिरी करता येत नाही. अशा वेळी भारताने हा प्रश्न न वाढविता राजकीय मार्गाने सोडविला पाहिजे. चिनी मालावरील बहिष्कार हे त्यावरील काही उत्तर होऊ शकत नाही. यात चीनपेक्षा आपलेच नुकसान होण्याचा धोका आहे. कारण बराचशा चीनवरील आयात मालापासून आपले उद्योगंधंदे चालत आहेत. जगातील या तीन प्रश्नावर अस्वस्थता वाढत जाणार आहे. सध्या तरी यावर काही तोडगा दिसत नाही.
0 Response to "अस्वस्थ जग..."
टिप्पणी पोस्ट करा