
शेअर बाजार का हसला?
शेअर बाजार का हसला?
अर्थसंकल्पपूर्व व अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी येण्याची देशातील ही एकमेव स्थिती आहे. आजवर शेअर बाजारात अर्थसंकल्पानंतर लगेचच तेजी येण्याचे प्रकार फारच कमी काळ झाले आहेत. मात्र अर्थसंकल्पाचे विश्लेषण पार पडल्यावर म्हणजे एक महिन्याभरात बाजारात तेजी येण्याचे प्रकार बऱ्याच वेळा घडतात. डॉ. मनमोहनसिंग प्रथम अर्थमंत्री झाल्यावर त्यंनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून बाजाराने सर्वात मोठी तेजी त्यावेळी पाहिली होती. आता त्याची मोठी आवृत्ती पहावयास मिळत आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदरच ५० हजारांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर त्याची घसरण झाली होती. अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळी निर्देशांक ५० हजारांच्या खाली तीन हजार अंश होता. मात्र त्यानंतर अर्थसंकल्प सादर होताच पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने पुन्हा एकदा वाटचाल करु लागला. आता निर्देशाक ५० हजारांच्यावर स्थिरावला आहे. तसेच बाजारातील तेजी अद्याप संपलेली नाही असे ठामपणे शेअर दलाल, विश्लेषक सांगू लागले आहेत. एकूणच पाहता तेजी आता विक्रमाचे नवनवीन उच्चांक गाठू लागली आहे व तिला कधी ब्रेक लागेल हे आत्ता सांगता येत नाही. सेन्सेक्सचे एवढी उंच भरारी त्याच्या स्थापनेपासून म्हणजे १९७९ पासून पाहिलेली नाही. शेअर बाजार अशा प्रकारे अभूतपूर्व तेजी येण्याचे नेमके कारण आहे तरी काय, असा सवाल प्रत्येकाला पडेल. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता ती सध्या मोठी आव्हाने पेलत आहे. अर्थात कोरोनामुळे हे आव्हान अधिकच गडद झाले आहे हे खरे असले तरीही कोरोनाच्या अगोदर सुमारे दीड वर्षे आपली अर्थव्यवस्था घसरणीला लागली होती. कोरोना हे निमित्तमात्र आहे. कोरोनामुळे आपल्याला नाही तर सर्वा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांना जबरदस्त फटके बसले आहेत. त्यामुळे त्यापासून आपण काही अलिप्त राहू शकणार नाही हे वास्तवही आपल्याला स्वीकारले पाहिजे. कोरना उदभवला नसता तरीही आपली अर्थव्यवस्था रसातळाला जाणार होती हे लक्षात ठेवले पाहिजे. विकास दर घसरणीला लागलेला, बेकारीचा तीन दशाकातील नवा उच्चांक व त्याच्या जोडीला नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे चाक जाम झालेले होते. अशी आर्थिक स्थिती असताना व कोरोनामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली असताना आपल्याकडे तेजी कशी येते असा सवाल आहे. अर्थात याचे उत्तर सोपे आहे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणात ही तेजी दडलेली आहे. मोदी सरकारने खासगीकरणाचा लावलेला सपाटा, कामगार कायद्यात सुधारणेच्या नावाखाली मालकांना अपेक्षीत असलेले केलेले बदल, कृषी कायद्यांना विरोध असूनही त्यावर ठाम राहणे, कारण यातून खरा फायदा होणार आहे तो भांडवलदारांनाच, या धोरणात तेजी दडलेली आहे. त्यात अर्थसंकल्पात विमा क्षेत्रातील विदेशी भांडवलास परवानगी दिल्याने मोदी सरकार आता विदेशी भांडवलाचे उत्सुर्फुर्तपणे स्वागत करीत आहे हेच सुचित झाले आहे. याच मोदींनी व त्यांच्या पक्षातील नेत्यांनी डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी विमा क्षेत्रातील विदेशी भांडवलास कडवा विरोध केला होता. त्याचबरोबर सरकारने निर्गुतवणुकीव्दारे यंदा सुमारे पावणे दोन लाख कोटी रुपयांचे उदिष्ट नक्की केले आहे. यात सरकारी क्षेत्रातील विविध कंपन्या पूर्णपणे विकणे किंवा त्यांची अशंत भांडवल विक्री करण्याचे ठरविल्याने सरकारने आपले खासगीकरणाचे धोरण विरोधकांचा कितीही विरोध असला तरीही पुढे रेटण्याचे ठरविलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार श्रीमंतांवर जादा कर लादेल अशी शंका काही जणांनी व्यक्त केली होती. खरे तर अशा कराचे अनेक अर्थतज्ज्ञांनी स्वागतही केले होते. मात्र सरकारने अशा करास नकार दिला आहे. त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील लोकांनी श्वास सोडला आहे. ही सर्व धोरणे शेअर बाजाराच्या वाढीस पोषक आहेत. या धोरणामुळेच शेअर बाजार सध्या हसत आहे. एकूणच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे हे धोरण नसले तरीही मोदी सरकारच्या खासगीकरण, भांडवलदारांना प्रोत्साहन देण्याचे धोरणाचे स्वागत शेअर बाजाराने केले आहे. ९१ साली डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरणाचे नवे युग सुरु झाले. त्यावेळी अर्थव्यवस्थेवरील डळमटे झाडण्यासाठी आर्थिक उदारीकरण सुरु करण्यात आले. गेल्या तीन दशकात सरकारे बदलली तरी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना फारसा हात लावण्यात आला नव्हता. परंतु आता स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या आर्थिक धोरणात १८० डिग्री बदल मोदी सरकारने केला आहे. त्यामुळेच शेअर बाजाराला अत्यानंद झाला आहे व तो हसत आहे. मोदी सरकारच्या धोरणात जसे या तेजीचे सहस्य दडले आहे तसेच ऑक्टोबर महिन्यापासून आपल्या देशात विदेशी फंडानी व वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या काळात विदेशी वित्तसंस्थांनी 2.4 लाख कोटी रुपयाची शेअर बाजारात गुंतवणूक केली त्याशिवाय विदेशी फंडांनी केलेली गुंतवणूक वेगळी. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे, आपल्याकडील लहान व मोठ्या गुंतवणूकदारांनी कोरोना काळातही आपल्या म्युच्युअल फंडातील दरमहा करावयाच्या गुंतवणूक थांबविल्या नाहीत. त्यामुळे म्युच्युअल फंडांची गुंतवणूक सातत्याने वाढत गेली. त्यामुळे समभागांचे खरेदीदार जास्त झाले. एवढेच नव्हे तर देशातील डीमॅट खाती लॉकडाऊनच्या काळात म्हणजे वर्षभरात विक्रमी पातळीवर वाढली आहेत. याच काळात नव्याने दोन लाख कोटीहून जास्त डीमॅट खाती उघडली गेली. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करु लागला असे दिसते. अर्थात त्यांची गुंतवणूकीतील तेजीतील वाटा अल्प असला तरीही सध्याच्या तेजीला त्यांचाही हातभार लागला आहे. देशात आघाडीच्या 30 समभागांच्या सरासरीवर काढल्या जाणाऱ्या या सेन्सेक्सची ही उसळी लक्षणीयच ठरली आहे. 1 एप्रिल 1979 रोजी मुंबई शेअर बाजाराने सेन्सेक्स या निर्देशांकाला जन्म दिला. तेव्हापासून गेल्या 41 वर्षातील या सेन्सेक्सची उसळी आज 50 हजारांवर पोहोचली आहे. या कालावधीतील सेन्सेक्सच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास आजवर या सेन्सेक्सने पहिल्या दहा हजाराचा टप्पा पार करण्यास फार वेळ घेतला, मात्र शेवटच्या दहा हजाराचा टप्पा गाठण्यास सर्वात कमी कालावधी घेतला. 79 साली सुरु झालेल्या हा सेन्सेक्सला प्रथम हजारात येण्यासाठी 90 साल पहावे लागले. त्यावेळी हर्षद मेहताच्या तेजीने त्याला सर्वात प्रथम तीन आकड्यावर पोहोचविले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2006 साली म्हणजे तब्बल 16 वर्षांनी सेन्सेक्स दहा हजारांवर गेला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर 2007 साली सेन्सेक्स 20 हजारांवर पोहोचला. तर 30 हजारांचा टप्पा गाठायला त्याला 2015 साल पहावे लागले. मार्च 2019 साली म्हणजे कोरोना सुरु होण्याअगोदर बरोबर एक वर्ष अगोदर सेन्सेक्स 40 हजारांवर गेला होता. मात्र त्यानंतर पुढील दहा हजारांचा टप्पा गाठावयास जेमतेम दोन वर्षेच लागली. मात्र या काळात निर्देशांक 40 टक्क्यांनी घसरुन पुन्हा वर आला तो 50 हजारांना स्पर्श करुनच त्याने विश्रांती घेतली. कोरोनाच्या काळात अशी स्थिती होती की शेअर बाजारातील गुंतवणूक अनेकांना नकोशी वाटत होती. काही अपरिपक्व गुंतवणूकदारांनी त्या काळात घाबरुन शेअर्स विकले. परंतु जो परिपक्व गुंतवणूकदार होता त्याने काही निवडक समभाग मोठ्या प्रमाणात खरेदी केले. कारण त्याचा बाजारावर विश्वास होता की, आपल्याला यातून पुढील काळात पैसा मिळणार आहे. त्याचा हा अंदाज खराच ठरला. सध्याच्या तेजीत त्याने पैसे कमावले आहेत. जागतिक गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट यांनी देखील दुसऱ्या जागतिक युध्दाच्या काळात अशाच प्रकारे नाममात्र किंमतीत अनेक कंपन्यांचे समभाग खरेदी केले होते. त्यातूनच त्यांनी भविष्यात गडगंज पैसा केला. त्यामुळे शेअर बाजारात समभाग खरेदी व विक्री याची योग्य वेळ साधली तरच तुही यशस्वी ठरु शकता हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. शेअर बाजारातील तेजी ही भविष्यातील देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवून निश्चित केली जाते. परंतु शेर बाजार सर्व अंदाज हवेतच बांधत तेजीचे हास्य करीत आहे. अर्थात हे हास्य विकट हास्य ठरु नये, ही इच्छा.
0 Response to "शेअर बाजार का हसला?"
टिप्पणी पोस्ट करा