-->
संपादकीय पान गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
विवाहसंस्था नव्या वळणावर
------------------------------
गेल्या काही वर्षात आपल्या देशात सामाजिक व आर्थिक बदल मोठ्या प्रमाणात झाले. यातील एक महत्वपूर्ण बदल झाले ते विवाहसंस्थेत. आपल्याकडे पारंपारिक पध्दतीने विवाह ठरविण्याची पध्दत निदान शहरात तसेच उच्चआर्थिक उत्पन्न गटात सुरु झाली. अनेकदा शहरातील लोकांचा जनमानसातील संपर्क कमी झाल्याने का म्हणा इंटनेटवरील वेबसाईटवरुन विवाह जुळण्याचे प्रमाण वाढले. मात्र अशा विवाहात मोठ्या प्रमाणात घटस्फोटाचे प्रमाणही वाढल्याचे दिसू लागले होते. वर्तमानपत्रांतील वधूवर सूचक जाहिराती पाहिल्या तरी त्यातून स्त्री-पुरुषांची जोडीदाराबद्दलची सौंदर्यविषयक कल्पना तसेच समाजातील जातीव्यवस्था अजूनही चिरेबंद असल्याचे दिसून येते. लग्नसोहळ्यावर होणारा खर्च, त्यात अजूनही छुपेपणाने (व काही ठिकाणी उघडपणे) टिकून असलेली हुंड्याची पद्धत यातून त्यातील वधू-वर पक्षांची सामाजिक प्रतिष्ठा अधोरेखित होत असते. थोडक्यात, लग्न ही गोष्ट भारतीय परिप्रेक्ष्यात सामाजिक आलेखाची निदर्शक ठरते. या पार्श्वभूमीवर शादी डॉट कॉम या विवाहविषयक वेब पोर्टलने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेले काही निष्कर्ष हे विवाहेच्छु तरुण-तरुणींच्या लग्न आणि जोडीदार यांच्याबद्दलच्या कल्पना बदलत असल्याचे दर्शवितात. अर्थात हे सर्वेक्षण स्थळसंशोधनासाठी इंटरनेट व वेबसाइटचा वापर करणार्‍या लग्नाळूंचे असल्यामुळे त्यात सुशिक्षित, सुस्थापित, महानगरी युवा पिढीची मानसिकता दिसून येणार व ती काही संपूर्ण भारताची प्रातिनिधिक ठरणार नाही, हे उघड आहे. तरीदेखील जागतिकीकरणोत्तर उदयाला आलेल्या नव मध्यमवर्गातील ही नवीन पिढी लग्नाविषयी काय विचार करते हे पाहणेही अगत्याचे ठरते. या पाहणीतून अनेक निरीक्षणे समोर आलेली असली तरी काही निरीक्षणे वेगळी व दखलपात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व स्वच्छंद झालेल्या या पिढीला जोडीदाराच्या निवडीचे व संसाराचे स्वातंत्र्य हवे असते, या गेल्या काही काळात रूढ झालेल्या समजाला फाटा देत ५० टक्के तरुण-तरुणींनी पालकांच्या पसंतीनेच जोडीदार निवडण्याला व त्यातही ५४ टक्के मुलींनी एकत्र कुटुंबात राहण्याला पसंती दिली आहे. प्रेमविवाहातून झटपट लग्न करून त्यानंतर तितक्याच त्वरेने घटस्फोट घेणार्‍या जोडप्यांचे वाढलेले प्रमाण ही एक सामाजिक समस्या बनली होती. यातूनच पुढील पिढीला व्यावहारिक शहाणपण आले असावे, असा निष्कर्ष यातून काढता येतो. दुसरे म्हणजे, आज पती-पत्नी दोघेही अर्थार्जनात गुंतल्यामुळे मुलांच्या संगोपनासाठी वा अन्य समस्या उद्भवल्यास सपोर्ट सिस्टिम म्हणून त्यांना कुटुंबातील इतर नात्यांचीही गरज भासते आहे. या पाहणीतील महत्त्वाचे निरीक्षण असे आहे की, लग्न जमविताना ५४ टक्के तरुणांना व ४६ टक्के तरुणींना जात महत्त्वाची वाटत नाही. दहा वर्षांपूर्वीच्या पाहणीत हीच आकडेवारी ३९ टक्के व ३७ टक्के होती. जातिअंतासाठी शहराकडे चला, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्याचीच तार्किक परिणती म्हणजे महानगरी आधुनिक जगण्यात अन्य समस्या तीव्र होत असताना जात हा घटक नव्या पिढीला महत्त्वाचा वाटेनासा झाला आहे, आणि हे एक सुचिन्हच आहे. एकीकडे अशा प्रकारे काही तरी सकारात्मक चित्र दिसत असताना विद्यमान विवाह संस्थेलाच आव्हान देणारी लिव्ह इन रिलेशिनशिपचे नवे नाते जोडणारी पर्यायी पध्दत प्रस्थापीत होत आहे. ही नवी पध्दत कुणी फॅशन म्हणून तर कुणी लग्न संस्थेला आव्हान देण्याचा प्रकार म्हणून स्वीकारली. काहींनी काळाची गरज असे म्हणून लिव्ह इन आपल्या अंगवळणी पाडून घेतले. आपल्याकडे घटस्फोटाची असलेली क्लिष्ट पध्दती किंवा सामाजिक बंधने यातूनही तरुण पिढी यात अडकण्यापेक्षा लिव्ह इनकडे वळली. अशा जोडप्यांची हेटाळणी न करता आपल्याकडील लग्न संस्थेतील एक टप्पा असे याकडे पाहिले पाहिजे. गेल्या दशकात आपल्याकडे जे घटस्फोटाचे प्रमाण वाढले होते ते आता कमी होऊ लागले आहे त्याचधर्तीवर काळाच्या ओघात लिव्ह इनचे फॅडही कमी होऊ शकते. एकूणच पाहता आपल्याकडील विवाहसंस्था आता एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे.
------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel