-->
संपादकीय पान गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
राष्ट्रवादीचे दबावतंत्र
----------------------------------
शिवसेनेचे विधान परिषद सदस्य विनायक राऊत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीत सत्ताधारी आघाडीकडून आपल्या पदरात जागा पाडण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस यशस्वी होईल असे दिसते आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या जागेवर बिनविरोध निवडून येणार असल्याचे सध्या वातावरण राष्ट्रवादीतर्फे तयार केले जात आहे. विधानसभेच्या जागावाटपाच्या तडजोडीत राष्ट्रवादीने ही जागा आपल्या पदरात पाडण्यात यश मिळविले असून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तटकरे यांना मोकळे केले आहे. सोमवारी त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामाही विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला आहे. राष्ट्रवादीत या घडामोडी शिजत असताना कॉंग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य मोहन जोशी यांनी सोमवारी पक्षाच्या काही मंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सुरेश शेट्टी, नसीम खान, वर्षा गायकवाड, जनार्दन चांदूरकर, कृपाशंकर सिंह, संजय दत्त आदी यावेळी उपस्थित होते. जुलै २०१२ मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत राज्य विधानसभेच्या सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून गेले होते. २७ जुलै २०१८ पर्यंत त्यांची मुदत होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राऊत रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. परिणामी येत्या २१ ऑगस्टला या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. सोमवारी यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. राज्य विधानसभेत कॉंग्रेसचे ८०, राष्ट्रवादीचे ६२, भारतीय जनता पार्टीचे ४४ तर शिवसेनेचे ४३ सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या कोट्यातील जागा जिंकण्यात शिवसेनेला यश मिळाले असले तरी पोटनिवडणुकीत फक्त एकाच जागेसाठी मतदान होणार असल्याने आणि आघाडी म्हणून विरोधी युती वा महायुतीची ताकद अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने शिवसेनेने या पोटनिवडणुकीतून माघारच घेतली. शिवसेनेने वा भाजपाने आपला उमेदवार दाखल केला नाही. त्यामुळे आघाडीचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झाले. कॉंग्रेसची सदस्यसंख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याने कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल, अशी चर्चा असताना सोमवारी राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत उडी घेतली. मोहन जोशी यांच्या अर्जावरील शाई सुकते न सुकते तोच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नवाब मलिक, जीतेंद्र आव्हाड आदी नेते त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यादृष्टीने कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेत विधान परिषदेची ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडवून घेतल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत तटकरे यांना आपल्या मतदारसंघात गुरफटून राहवे लागू नये, हा यामागचा मुख्य हेतू असावा. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तटकरे, आपल्या चिरंजीवाला, पुतण्याला की कन्येला आपल्या विधानसभा मतदारसंघातून उभे करणार हे प्रश्‍नचिन्ह आहे. अनेकांच्या मते तटकरेंचा कल हा त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांना आपल्या माणगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आग्रह धरतील, असे दिसतेे. शरद पवारांनी सोनिया गांधीशी झालेल्या चर्चेत ़विधानपरिषदेची ही जागा पदरात पाडून घेतली असण्याचा अंदाज बांधला जात आहे. परंतु सध्या सत्ताधारी आघाडीत प्रत्येक बाबीवरुन तणाव निर्माण केला जात आहे, कुणासही हे परस्परांचे शत्रू वाटावेत इतपत हा तणाव निर्माण केला जातो. अगदी लोकसभा निवडणुका आटोपल्यावरच विधानसभेचे वारे सुरु झाल्यावर सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीतर्फे यावेळी जादा जागा न दिल्यास आघाडी तोडून टाकून स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा करण्यात आली होती. अशा प्रकारे कॉँग्रेसला सतत दबावाखाली ठेवण्याचे काम राष्ट्रवादी करीत आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेहमीच कॉँग्रेसची साथ कधी सोडून आपल्याला अन्य दुसर्‍या पक्षाशी कशा प्रकारे सत्तेची गणिते जुळवता येतील याची आखणी करीत असतात. कारण राष्ट्रवादीला एक नक्की माहित आहे की, आपल्या भोवती जे नेते व कार्यकर्ते आहेत ते सत्तेमुळे चिकटून आहेत. ही सत्ता जर हातातून गेली तर पक्षातील नेत्यांपासून ते कार्यकर्ते पक्षाला रामराम करतील. त्यामुळे त्यांना टिकविण्यासाठी राष्ट्रवादीला सत्तेचा गुळ राखला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी सत्तेचे राजकारण करीत असताना कॉँग्रेसवर सतत दबाव ठेवून आपल्याला सत्तेत जास्तीत जास्त कसा वाटा मिळेल यासाठी सतत धडपडत असते. सध्याची विधानपरिषदेची जागा ताब्यात घेण्यामागचा त्यांचा हेतूही हाच आहे. सुरुवातीला विधानसभेच्या जाागंसाठी दबावतंत्र वापरुन कॉँग्रसेकडून काही जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने करुन पाहिला. त्यात ते किती यशस्वी होतात हे लवकरच समजेल. मात्र कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सध्यातरी आघाडी होणार हे नक्की झाले आहे. अर्थात तसे होणे दोघांच्या दृष्टीने आवश्यकच होते. कारण लोकसभा निवडणुकीत ज्या लाटेने भाजपा सत्तेत आली ते पाहता कॉँग्रसे-राष्ट्रवादीची छाती दडपून जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी सध्या एकमेकांची साथ सोडणे किंवा स्वतंत्रपणे लढणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोडा मारुन घेण्याचा प्रकार होता. याची कल्पना असूनही कॉँग्रेसवर सतत दबाव ठेवून त्यांच्याबरोबर आम्ही आहोत म्हणजे फार मोठे उपकार करीत आहोत असे राष्ट्रवादी नेहमीच भासवित आले आहे. सत्तेची या दोन्ही पक्षांना गरज असून लोकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणूकीचे त्यांना काही देणेेघेणे नाही. यातूनच त्यांना यावेळी सत्ता गमवावी लागणार आहे.
------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel