
कॉँग्रेसमधील खांदेपालट
09 फेब्रुवारी २०२१ अग्रलेख
कॉंग्रेसचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रश्न अधांतरी असला तरीही राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करुन हा प्रश्न तरी निदान सोडविला आहे. अनेकदा कॉँग्रेसमध्ये प्रश्न प्रदीर्घ काळ भिजवत ठेवण्याची प्रथा आहे. परंतु आता राज्यातील पक्षाच्या दुर्देशेकडे नेतृत्वाचे लक्ष गेले हे महत्वाचे ठरावे. नानांच्या रुपाने आता एक आक्रमक नेता कॉँग्रेसला राज्याच्या नेतृत्वपदी लाभला आहे. केंद्रात नेतृत्वहीन कॉँग्रेस दिसत असली तरीही राहूल गांधींना ज्यांची वर्णी लावायची असते त्याची ते बरोबर लावत असतात, हे पटोले यांच्या नियुक्तीने स्पष्ट दिसले आहे. आता राहूल गांधींनी अशा प्रकारे मागच्या दरवाज्याने चाली न खेळता पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व स्वीकारणे योग्य ठरेल. त्यातून पक्षाला सध्या जी नेतृत्वहीनतेची झळाळी लागली आहे ती तरी दूर होऊ शकेल. राज्यात नेतृत्वपदी बाळासाहेब थोरात होते व त्यांच्याच नेतृत्वाखाली मागच्या विधानसभा लढवल्या गेल्या. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेसचे सरकार स्थापण्यात त्यांचीही मोलाची भूमिका ठरली होती. परंतु मंत्रीपदी आरुढ झाल्यावर त्यांनी हे पद सोडणे स्वाभावीकच होते. थोरात यांच्या काळात कॉँग्रेसचे आघाडी सरकार आले हे खरे असले तरीही त्यात थोरातांचे कतृर्त्व तसे कमीच होते. बाळासाहेब थोरात माणूस म्हणून कितीही चांगले असले किंवा त्यांची प्रतिमा भ्रष्ट नेत्याची नसली तरीही सध्याच्या काळात कॉँग्रेसला आक्रमक चेहऱ्याची आवश्यकता होती. ती गरज काही थोरात पूर्ण करु शकत नव्हते. कारण त्यांची ती मानसिकता नाही. त्यामुळे त्यांच्या जागी राज्यातील नेतृत्व शोधताना कॉँग्रेसच्या सध्याच्या कठीण काळात पक्षाचा विस्तार करणारा नेता पाहिजे होता. सध्याच्या काळात कॉँग्रेसकडे अशा प्रकारचे आक्रमक चेहरे फारच कमी शिल्लक राहिले आहेत. त्यातून पटोले हे राहूल यांच्या पक्के विश्वासातील असल्याने तसेच त्यांनी मोदींच्या विरोधात आवाज उठवून भाजपातून खासदारकी सोडून पुन्हा कॉँग्रेसकडे आल्याने त्यांची, दिल्ली दरबारी एक वेगळी प्रतिमा आहे. त्याचीही त्यांना या नियुक्तीसाठी मोठी मदत झाली. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष व विरोधी पक्ष असलेला भाजपा आक्रमकपणे आपली वाटचाल करीत आहे. जे पक्षात पुन्हा येऊ इच्छीतात त्यांना दाखल करण्याचा सध्या सपाटा लावला आहे. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा आघाडीवर आहे. त्यात कॉँग्रेस पक्ष मात्र पिछाडीवर होता. मुंबई कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी कॉँग्रेसने भाई जगताप यांना आणून राज्यातील महत्वाच्या पदांच्या बदलास सुरुवात केली होती. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता वर्षावर येऊन ठेपली आहे. अशा काळात मुंबईत भाई जगताप व जिल्ह्यात नाना पाटोले काय बदल करुन पक्षाचा घोडा किती जोरात पळवतात ते पहावे लागेल. पटोलेंच्या जोडीला पक्षाने सहा उपाध्यक्षांची नवी टीम दिली आहे. ही टीम त्यांना मदतकारक ठरणार आहे की अडथळ्याची शर्यत हे देखील लवकरच स्पष्ट होईल. कारण कॉँग्रेसचे राजकारण हे वरकणी पाहता फार सोपे नसते. त्या राजकारणास अनेक पदर असतात. कॉँग्रेसने प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगल्याने त्यांचे राजकारण हे अजूनही सत्तेभोवती फिरत असते. गेल्या पाच वर्षात राज्यात सत्ता नव्हती त्यावेळी पक्षाचा एक झेडा किंवा बँनरही दृष्टीस पडत नसे. आता शरद पवारांच्या कृपेने सत्तेत वाटा मिळाल्यावर कॉँग्रेसचे झेंडे, बँनर ठिकठिकाणी दिसू तरी लागले आहेत. आता कॉँग्रेसला गतवैभव नाही तरी सध्याची पडक्या वाड्याची झालेली दुर्दैवी अवस्था बदलावी लागणार आहे. सध्याच्या कठीण काळात नानांकडे नेतृत्व आल्यावर त्यांना अनेक जिल्ह्यात शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. काही ठिकाणी जिह्यात नेतृत्वच नाही. काही ठिकाणी तर पक्षाचे कार्यालयही दयनीय अवस्थेत आहे. अजूनही कॉँग्रेसचा जनाधार अनेक भागात शाबूत आहे, हीच एक पटोलेंसाठी मोठी जमेची बाजू ठरणार आहे. मात्र जिकडे जनाधार मृतावस्थेत गेला आहे तिकडे त्यांना तो जागृत करावा लागणार आहे. तसेच पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा संघटीत करावे लागेल. अनेक जिल्ह्यात बंडखोरीची मोठी लागण लागली होती. पक्ष केवळ नावापुरताच शिल्लक राहिला आहे. कॉँग्रेसची पंजाल्या मिळणारी मते अन्य कुठे जात नाहीत, तेवढीच मते शिल्लक राहिली आहेत, अशी अनेक ठिकाणी स्थिती झाली आहे. अर्थात यातून मार्ग काढणे काही सोपे नाही हे खरे असले तरीही पटोलेंनी ठरविले तर अवघडही नाही. त्यासाठी त्यांना जिल्हानिहाय दौरे करुन बैठका घेऊन पुन्हा संघटना बांधावी लागेल. तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना तरुणाईचे कार्यक्रम द्यावे लागतील. त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे पक्षातील ज्येष्टांची फळी सांभाळत नवीन पिढीला नेतृत्व द्यावे लागेल. सध्या कॉँग्रेस आघाडीतील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असला तरीही सत्ता असल्याने पक्षाकडे पुन्हा लोक खेचणे सहज सोपे जाणार आहे. फक्त पटोले ते कशा आक्रमकतेने करतात ते पहावे लागेल. त्यासाठी त्यांना भाजपातील काही नेते फोडण्यात यश येते का ते पहावे लागेल. पक्ष सोडून भाजपात गेलेले अनेक जण परतण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा होत आहे. परंतु त्यांना खेचण्याचे सामर्थ्य पटोले कसे दाखवितात त्यात त्याचे कौशल्य ठरणार आहे. अर्थात कॉँग्रेस पक्षासाठी ही शेवटची संधी ठरेल. एकतर सत्ता यावेळी नशिबाने आली आहे, आता मात्र त्याचा वापर करुन पक्षसंघटन मजबूत करण्यात पटोले काय करतात ते पहावे लागेल.
0 Response to "कॉँग्रेसमधील खांदेपालट"
टिप्पणी पोस्ट करा