-->
कोकण पर्यटन विभाग करा

कोकण पर्यटन विभाग करा

संपादकीय पान सोमवार दि. १२ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकण पर्यटन विभाग करा
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा जाहीर होऊन आता दोन तपे लोटतील परंतु येथे पर्यटनाच्या विकासासाठी शासकीय पातळीवर विशेष प्रयत्न झाले नाहीत आता रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करावा अशी मागणी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी केली आहे. ही मागणी स्वागतार्ह जरुर आहे. मात्र केवळ रत्नागिरी व सिंधुदुर्गच नव्हे तर रायगड व ठाणे जिल्ह्यातही पर्यटन मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने त्यांच्या विकासासाठी हे जिल्हेही त्यात समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टाच पर्यटन विभाग जाहीर करण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी जिल्हा हा विपूल सृष्टी सौंदर्याने नटलेला असून त्यास सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला जवळ जवळ सुमारे १६७ कि.मी.चा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. दरवर्षी या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनास भेट देत असतात. या जिल्ह्यामध्ये अनेक प्राचिन ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणे तसेच समुद्र किनार्‍याजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये मांडवी, आरेवारे, भाट्ये, मुरुड, हर्णे, कर्डे, लाडघरण, गवणेश्वर असे प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत. ऐतिहासिक थिबा पॅलेसही याच जिल्ह्यात आहे. कवी केशव सुत, टिळक यांची जन्मभुमी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे गाव याच जिल्ह्यात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ हे पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून ९१५ मीटर उंचीवर वसलेले आहे. येथील वातावरण थंड व आल्हाददायक असल्यामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक येथे आकर्षित होतात. या पर्यटनस्थळाला अधिक चालना मिळण्यासाठी माचाळ थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित करण्याची गरज  आहे. तसेच याच जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्राचीन व अतिमहत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ असून या ठिकाणास शासनाने सध्या ब वर्ग पर्यटन स्थळामध्ये समाविष्ट केले आहे. यंदा पर्यटनस्थळाला दरवर्षी २५ लाखांपेक्षा जास्त देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाला अधिक चालना मिळण्यासाठी अ वर्ग पर्यटन स्थळ करावे, परिणामी गणपतीमुळेला पर्यटनासाठी अधिक चालना मिळेल व शासनाच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. हा जिल्हा मासे, आंबा,काजु ह्या बाबाींसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांसाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करणे शक्य व्हावे व रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे अशी मागणी आहे. पर्यटन उद्योगावर अनेक देशांची अर्थव्यवस्था पोसली जाते. त्यादृष्टीने पाहता आपल्याकडे अनेक संधी असतानाही आपण कोकणात पर्यटनाचे व्दार म्हणावे तसे खुले केलेले नाही. यातील केवळ एखाद दुसरे पर्यटन जिल्हे जाहीर करण्यापेक्षा संपूर्ण कोकण विभागच पर्यटनासाठी जाहीर केल्यास या संपूर्ण पट्यास त्याची मदत होईल. कोकणात एतिहासिक, धार्मिक, निसर्गसौंदर्य, जल पर्यटनांच्या विपुल संधी आहेत. त्यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना  मिळेल. मात्र त्यासाठी शासकीय पातळीवर किमान पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "कोकण पर्यटन विभाग करा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel