-->
आव्हानात्मक वर्ष

आव्हानात्मक वर्ष

22 June 2020 अग्रलेख आघाडीचे उद्योजक रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवरुन दिलेल्या संदेशात जनतेला सध्याचे वर्ष आव्हानात्मक असून जनतेने संयम बाळगणे महत्वाचा आहे, असे म्हटले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविला जाणारा व्देश व दादागिरी थांबविली पाहिजे. सध्याच्या संकटाच्या काळात एकमेकांना पाठिंबा देत आदर बाळगला पाहिजे असा टाटा यांनी अत्यंत मोलाचा सल्ला जनतेला दिला आहे. रतन टाटा हे फार क्वचितच अशा प्रकारचा संदेश देत असतात. सोशल मिडियावरही ते फारसे सक्रिय नसतात. मात्र सध्याच्या कठीण काळात जे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे काही उद्दीग्न होऊन त्यांनी हा जनतेला संदेश दिला असावा. त्यामुळे त्यांच्या संदेशाला विशेष महत्व प्राप्त होते. खरोखरीच सध्याचा काळ हा कठीण आहे. असा काळ हा शतकातून एकदा येतो. मात्र अशा काळात एकमेकांना सांभाळून घेऊन वाटचाल करण्याची वेळ आहे. कोरोनाने संपूर्ण जग वेढले आहे. सुमारे 200 हून जास्त देशात कोरोना पोहोचला आहे. सुमारे 90 लाखांच्या घरात जगातील रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर सुमारे मृतांची संख्या पाच लाखावर गेली आहे. अमेरिकेत सध्या साथीचा कहर झाला असून मृतांची संख्या एक लाखावर गेली आहे. त्याखालोखाल ब्राझीलमध्ये रुग्ण असून तेथील मृतांची संख्या 50 हजारांवर गेली आहे. तर चौथ्या क्रमांकावर भारत आहे. भारतात अजूनही एकूण लोकसंख्येचा विचार करता रुग्णसंख्या व मृतांचे आकडे नियंत्रणात आहेत. मात्र यामुळ निर्धास्त राहून चालणार नाही. आता भारतात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी एकाच दिवशी पंधरा हजार रुग्ण आढळले. तर मृत्यू 300 च्या वर झाले. त्यामुळे कोरोनाचा कहर आत्ता आपल्याकडे सुरु झाला असे म्हणता येईल. मध्यंतरी काही देशात कोरोना उतरणीला लागल्याचे चित्र होते. त्यामुळे आता कोरोना हळूहळू संपत चालला आहे असे आशादायी चित्र निर्माण होत होते. परंतु ही आशा अल्प मुदतीचीच ठरली व पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. चीन, उत्तर कोरीया, जपान या देशात पुन्हा एकदा नव्याने रुग्ण दिसू लागले आहेत. न्यूझीलंडने मोठ्या विश्वासाने कोरोना हद्दपार करणारा पहिला देश असा सन्मान मिळविला खरा परंतु तेथे देखील नवीन रुग्ण दिसले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, आता 81 देशात पुन्हा एकदा कोरोनाची नव्याने लाट सुरु झाली असून ही दुसरी लाट ठरावी. कोरोना सुरु झाला त्यावेळी तो मर्यादीत राहावा यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न झाले. मात्र तो सर्वत्र पसरलाच. यात काही देशांनी या साथीच्या रोगाविषयी गांभीर्याने न घेतल्यामुळे हा रोग झपाट्याने पसरला होता. त्यात आपला भारतही होता. त्यावेळी जगात पुन्हा दुसरी लाट येऊ नये अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. कारण गेल्या वेळी म्हणजे 1920 साली ज्यावेळी जगात स्पॅनिश फ्लू ची साथ आली होती, त्यावेळी ही साथ बरी होत असतानाच दुसरी लाट आली व त्यात मोठ्या संख्येने लोक मरण पावले होते. आता त्याच धर्तीवर दुसरी लाट येत असल्यास त्याचे धोके जास्त आहेत. त्यामुळे आता पुन्हा खबरदारी घेण्याची सर्वात मोठी गरज आहे. आपल्यासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात धोके हे पावलोपावली आहेत. सद्या केवळ आपल्याला शहरात मोठ्या संख्येने लाट असल्याचे दिसत होते परंतु आता ग्रामीण भागातही ही साथ पसरल्याचे दिसू लागले आहे. मुंबई, पुणे, अहमादाबाद, दिल्ली, कोलकाता या महानगरांमध्ये ही साथ झपाट्याने पसरली आहे. लोकसंख्या जास्त असल्याने व दाटीवाटीची वस्ती असल्याने येथे साथ पसरण्याचे प्रमाणही जास्त असणे स्वाभाविक आहे. मुंबईतील मृतांच्या आकडेवारीत 50 वर्षावरील रुग्ण 77 टक्के आहेत. त्यामुळे आजही जास्त वय असणारे व ज्यांना विविध व्याधींनी ग्रासले आहे त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. गेल्या पंधरा दिवसात सरकारने नियमात शिथीलता आणल्याने लोक थोडे निर्धास्त झाले, गरज नसतानाही लोकांचे भटकणे वाढले. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत प्रामुख्याने रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत विभागवार नव्हे तर संपूर्ण लॉकडाऊन कडकपणे लादण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनावर अजूनही औषध उपलब्ध नाही. अजून तरी जनीकच्या काळात औषध किंवा लस निर्माण होण्याची शक्यता दूरच वाटते. सध्या जे देशात ग्लेनमार्क या औषध कंपनीने औषध बाजारात आणले आहे त्याचे रिझल्टस कुणालाच माहित नाहीत. त्यामुळे एका दृष्टीने पाहता या औषधाव्दारे जनतेवर प्रयोग केले जाणार आहेत. केवळ स्वच्छता व दोन व्यक्तींतील सुरक्षीत अंतर राखणे हेच त्यावरील उपाय आहेत. याची कडक अंमलबजावणी केवळ लॉकडाऊनमुळेच होऊ शकते. मुंबईतील काही भागात जिकडे रुग्ण आहेत त्या ठिकाणीच लोकांना क्वॉरंटाईन केले गेले आहे. हे उपाय पुरेसे नाहीत हे गेल्या पंधरा दिवसातील अनुभवातून पटले आहे. अशा स्थितीत रुग्ण वाढीच्या संख्येवर मर्यादा येण्यासाठी संपूर्ण मुंबईत कडक लॉकडाऊनची गरज आहे. तसेच आता ग्रामीण भागातही रुग्ण संख्या वाढू लागली आहे. ही गंभीर बाब आहे. मात्र जिल्हा प्रशासनाला अजूनही त्याचे गांभीर्य नाही. रायगडातही आता चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपाय योजण्याची गरज आहे.

Related Posts

0 Response to "आव्हानात्मक वर्ष"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel