
सर्व काही ठीकठाक!
22 June 2020
अग्रलेख
सर्व काही ठीकठाक!
राजा व बिरबलाच्या एका गोष्टीत जसे राजाला बिरबल राज्यात सर्व काही ठिकठाक आहे, असे खोटेच सांगून वेळ मारुन नेतो तसे आपल्या देशात सुरु आहे. चीनने आपल्या भूभागावर आक्रमण करुन आपल्या वीस जवानांना शहीद केले, तरी आपले पंतप्रधान मात्र सीमेवर सर्व काही ठीकठाक आहे, असाच दावा करीत आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यांनी हा दावा केल्यावर सर्व विरोधी पक्ष नेते अवाकच झाले व काय बोलायचे असा प्रश्न त्यांना पडला. राहूल गांधींनी ज्यावेळी सीमेवर काही तणाव नाही तर जवान कसे धारातीर्थी पडले असा सवाल करताच भाजपाची तणतणली. खरे तर या राष्ट्रद्रोही पप्पूच्या प्रश्नांना कशाला बरे उत्तरे देतात तेच आम्हाला काही कळत नाही. पंतप्रधानच असे धडधडीत खोटे बोलत आहेत तर पुढे काय बोलायचे असा प्रश्न त्यांना पडणे स्वाभाविकच आहे. मात्र पंतप्रधानांच्या या विधानावर सोशल मिडियापासून सर्वच प्रसार माध्यमे तुटून पडली. एरव्ही मोदींची प्रत्येक बाबतीत तळी उचलणाऱ्या मिडियाला तर आता कोणती भूमिका घ्यायची हा प्रश्न पडला. परंतु मोदी टीकेचे धनी मोठ्या प्रमाणावर होत आहेत हे लक्षात आल्यावर मात्र पंतप्रधानांच्या कार्यालयातून हास्यास्पद खुलासा करण्यात आला. मोदींच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, असा खुलासा करीत पी.एम.ओ. कार्यालयाने म्हटले की, जवानांनी दाखविलेल्या शौर्यामुळे चीनकडून कोणीही आपल्या भागात घुसू शकलेले नाहीत. मात्र भारतीय भागात कोणीही घुसखोरी केलेली नाही व लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत हे विधान मागे घेतलेले नाही. या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. परंतु आपले 20 जवान धारातीर्थी पडले याचाच अर्थ स्पष्ट आहे की, भारताच्या भागात चीनी सैन्य घुसले होते व त्यांना मागे रेटण्यासाठी झालेल्या चकमकीत हे जवान ठार झाले. चीनचे सैन्य जर आपल्या भूभागात घुसले नव्हते तर आपले सैनिक चीनच्या भागात घुसले होते का, असाही सवाल उपस्थित होतो. खोटे बोलावे पण रेटून बोलावे ही भाजपाची निती आता जनतेच्या लक्षात आली असून पंतप्रधानही आपली कातडी वाचविण्यासाठी खोटे बोलत आहेत हे स्पष्टच आहे. गेले तीन महिने चीनचे सैन्य भारतात घुसत होते. काही जणांच्या अंदाजानुसार चीनने आपला 60 कि.मी. भाग बळकावला आहे. परंतु आता मात्र एकही कि.मी. भूभाग बळकाविलेला नाही हे पंतप्रधानांनीच सांगितले हे बरे झाले. उगाचच भारत-चीन युध्दाची तयारी चॅनेल्स वरुन सुरु होती. आपले 20 जवान मारले गेल्यावर जणू काही आपले 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान आता युध्दच करतील व आपल्या 62 सालच्या पराभवाचे उट्टे काढतील असा अनेकांचा होरा होता. आता युध्द काही क्षणात सुरु होईल अशी वातावरण निर्मीतीही सुरु होती. ज्यांनी या चॅनेल्सच्या बातम्या किंवा चर्चा पाहिल्या त्यांना तर युध्द सुरुच झाले असा भास होईल अशी ती वातावरण निर्मीती होती. या भावी युध्दाचे विश्लेषण करण्यासाठी अनेक माजी लष्करी अधिकारी सज्ज झाले होते. परंतु पंतप्रधानांनी सर्व काही ठीकठाक सांगून या सर्वांची हवाच काढून घेतली. मोदी व चीनचे राष्ट्रप्रमुखांनी अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर बसून केलेल्या गप्पा कारणी आल्या हेच खरे. त्यामुळे आता युध्दही होणार नाही. त्यामुळे चीनच्या मालावर बहिष्कार घालण्याचीही आवश्यकता नाही. ज्यांचे देशप्रेम ओतू जाऊन घरातले चायनीज बनावटीचे टी.व्ही. फोडले त्यांना आता पुन्हा नवीन चायनीच टी.व्ही. घेण्यास काहीच हरकत नाही. मोदींचे लाडके उद्योगपती अदानी यांनी चीन सोबत केलेले करोडो रुपयांचे प्रकल्प आता रोखण्याचे काहीच कारण नाही. दिल्ली-मेरठ या रेल्वे लाईनचे काम करण्यासाठी भारतीय कंपन्यांना डावलून ज्या चीनी कंपनीला कंत्राट देण्यात आले, त्यांनाही आता काम सुरु करण्यास हरकत नाही. महाराष्ट्र सरकारनेही ज्या तीन कंपन्यांशी गुंतवणुकीचे सहकार्य करार केले आहेत त्यांनाही आपले प्रकल्प पुढे सुरु ठेवता येतील. एकूणच काय सर्व काही ठीकठाकच आहे. देशाची एकही इंच जमीन कुणी लाटलेली नाही, हे मोदींचे विधान आपण मान्य केले तरी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनने लाईन ऑफ कंट्रोलचा भंग केला असल्याचे विधान केले होते त्याचे काय? ती कदाचित प्रिंटींग मिस्टेक ठरविली जाईल. चीनने सध्या गलवान खोऱ्यावर ताबा मिळविला आहे, याला मोदींनी मूकसंमती दिल्यासारखीच आहे. अशा प्रकारे खुद्द पंतप्रधानांनी शहीद झालेल्या 20 जवानांचा अपमान केला आहे. आपण 1962 साली चीनसोबत युध्द हरलो. परंतु 1967 ला नथुला आपल्या ताब्यात घेऊन 62 च्या पराभवाचा बदला घेतला. त्यानंतर 1957 साली चीनचा विरोध डावलून सिक्कीम आपल्याशी जोडला. तसेच शेजारच्या असलेल्या नेपाळ, भूतान व बांगला देश यांना चीनच्या कह्यात जाऊ दिले नाही. पण आज या सगळ्यावर पाणी पडले आहे. बंदुकीची एकही गोळी न झाड़ता भारताने गलवान गमावले की काय असे वाटण्यासारखी स्थिती आहे. ही आपल्याला शरमेची बाब आहे. आपल्याकडचा मिडियाही यासंबंधी सरकारला जाब विचारायला पुढे येत नाही. विरोधी पक्षाचे नेत्यांनी विचारल्यास त्यांना एकटे पाडले जाते. आता जनतेनेच सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्या.
0 Response to "सर्व काही ठीकठाक! "
टिप्पणी पोस्ट करा