बदल करु या...
20 June 2020 अग्रलेख
बदल करु या...
सध्या कोरोनामुळे आपल्याला अनेक चुकांची दुरुस्ती करुन नवीन सुरुवात करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून आपण बोध घेत आता भविष्यात काही नवीन करु या. वाईटातून चांगले होते असे नेहमी म्हटले जाते. आता आपल्याला कोरोनातील काळात व कोरोनाच्या नंतरच्या काळातही आपल्या आजवर झालेल्या चुका सुधारत बदल करीत पुढील वाटचाल करावी लागणार आहे. यातील काही सुधारणांची आपल्याला अत्यंत आवश्यकता होतीच. परंतु त्या सुधारणा कशा व कुणी करावयाच्या यासंबंधी दुमत होते. आता मात्र कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीने आपल्यात सुधारणा करण्याची संधी चालून आली आहे. यातील सुधारणांचे पहिले पाऊल सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत टाकता येईल. आपल्याकडे सुमारे दीडशे वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला गती देण्यासाठी घरातील गणपती सार्वजनिक केला. या सार्वजनिक गणपती उत्सवाने लोकांना एकत्र आणले व ब्रिटिशांविरोधी लढण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले गेले. त्याकाळात गणपती उत्सवात स्वातंत्र्याच्या प्रेरणेसाठी विविध भाषणे, वादविवाद, परिसंवाद घडत. काळाच्या ओघात गणपती उत्सवांचे स्वरुप पालटले. गणपतींच्या मूर्त्यांची उंची वाढविण्याची स्पर्धाच लागली. गणपतींसमोर विभत्स नृत्य सुरु झाली. पत्याचे डाव टाकले जाऊ लागले. ज्या उद्देशाने गणपती उत्सव लोकमान्यांनी सुरु केला त्याला सुरुंगच गेल्या पन्नास वर्षात लावला गेला. हे वास्तव कुणीच नाकारु शकणार नाही. परंतु नवीन पिढी यात एवढी गुरफटून गेली की, यात सुधारणा करणे कठीण होऊन बसले. आता मात्र कोरोनाच्या संकटामुळे गणपती उत्सवात सुधारणा करावी लागणार आहे. नुकत्याच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्तांच्या झालेल्या बैठकीत यंदा उत्सव शांततेत, सोशल जिस्टसिंगचे नियम पाळत व साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घेतलेल्या निर्णयाचे सर्वात प्रथम स्वागत केले पाहिजे. अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा कऱण्याचे आम्ही नेहमीच या स्तंभातून मांडत आलो आहोत. परंतु कोणाचे धारिष्ट्य होत नव्हते. गेल्या काही वर्षात उत्सवाचे झालेले विभत्सिकरण थांबविण्याची अनेकांची इच्छा होती, परंतु कोणापासून सुरुवात करावयाची व लोकांना कसे पटवायचे हे समजत नव्हते. आता कोरोनाच्या संकटाने अशा सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. गणपतींच्या मूर्तींची उंची वाढविण्याची जी सध्या स्पर्धा सुरु होती, ती यंदा थांबणार आहे. कारण यंदा उंच मूर्ती तयार करणे शक्य नाही. यात अनेक मूर्तीकारांचे आर्थिक नुकसान होईल. त्यांच्या नुकसानभरपाईसाठी स्वतंत्रपणे विचार करता येईल. मूर्त्यांच्या उंची कमी झाल्याने अनेक प्रश्न सुटणार आहेत. भव्य दिव्य मंडपाचीही आवश्यकता भासणार नाही. यंदा मिरवणूका नसल्याने सर्व प्रकारची होणारी गर्दी टाळली जाईल. पंढरीची वारी ज्या प्रकारे केली जाणार आहे तोच आदर्श ठेवण्याची गरज आहे. मोजक्याच लोकांनी यंदा जाऊन मूर्तीची प्रतिष्ठापना करुन त्यानंतर गणपतीचे दर्शन ऑनलाईन ठेवावे. त्याचबरोबर ज्या भक्तांना आपले दान गणरायाच्या चरणी अर्पण करायचे असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. सर्व प्रकारच्या मोठ्या मूर्त्यांवर बंदी घालावी. घरगुती गणपतींच्या उंचीवरही काही फूटाची मर्यादा घालण्यात यावी. अशा प्रकारे गणपतींचे स्वागत अगदी साधेपणाने करताना विसर्जनही तशाच साधेपणाने करावे. त्यात गर्दी नसावी. ज्या बाबी ऑनलाईन करता येणे शक्य आहे त्या कराव्यात. यंदा मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ठेवाव्या लागतील. परंतु यंदाच सर्व मंडळांना व मूर्तीकारांना आगावू सूचना देऊन पुढील वर्षापासून केवळ मातीच्या मूर्ती करण्याचा आदेश काढावा. पुढील वर्षीपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर पूर्णपणे कायद्याने बंदी घालावी. त्याचे सर्व नियोजन यंदाच्या वर्षापासूनच करावे. गणेशोत्सवात एखाद्या मंडळास कार्यक्रम करण्याची इच्छा असेल तर ते कार्यक्रम ऑनलाईन पाहाण्याची सुविधा उपलब्ध करावी. गणपतीच्या अकरा दिवसातील पुजाआर्चा, आरत्या ऑनलाईन पाहण्याची सुविधा करणे आवश्यक ठरणार आहे. लोकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन गर्दी करण्यापेक्षा या सर्व सुविधा घरी बसून संगणकावर किंवा मोबाईलवर पाहाण्याची सवय झाल्यास त्याचे फायदे समजतील व लोक दरवर्षी अशाच प्रकारे उत्सव साजरा करा असा आग्रह धरतील. मंडळांकडे जे पैसे जमा होतील व जो खर्च वाचेल तो पैसा त्या त्या विभागातील सामाजिक कार्यासाठी खर्च करावा किंवा मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी देणगी द्यावी. मात्र पी.एम. केअर्स या निधीत देऊ नये. फक्त मुख्यमंत्री निधीतच द्यावा. याचे महत्वाचे कारण म्हणजे पी.एम. केअर्स फंडातील निधीचा जमा-खर्च कसा झाला त्याचा जाब विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही तो, अधिकार मात्र पी.एम. फंडात निधी दिल्यास आहे. कोरोनाच्या काळात आपण दरवर्षी प्रमाणे उत्सव गर्दी करुन करु शकत नाही, हे वास्तव मान्य केले पाहिजे. अशा प्रकारे आपण आपली गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवत उत्सव साजरा करणार आहोत. त्यामुळे एकीकडे जागतिक संकटाच्या काळातही आपण आपली परंपरा कायम ठेवत उत्सव साजरा करणार आहोत, तर दुसरीकडे आपल्याकडे जी या उत्सवांची अधोगती झाली होती त्यालाही चाप लावत आहोत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण काही चांगल्या गोष्टी करु या, त्यातील गणेशोत्सवातील सुधारणा मूलगामी ठरतील. एकीकडे आपली दीडशे वर्षाची परंपरा जपली तसेच दुसरीकडे आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचेही समाधान लाभेल. सार्वजनिक गणेशोत्सवातील हे एक नवे पर्व ठरावे.


0 Response to "बदल करु या..."
टिप्पणी पोस्ट करा