-->
मोदीजी, चीन्यांना चेचा!

मोदीजी, चीन्यांना चेचा!

19 June 2020 अग्रलेख मोदीजी, चीन्यांना चेचा! इंदिरा गांधी यांनी बांगला देशाला पाकिस्तानपासून स्वतंत्र्य केल्याच्या घटनेला पुढील वर्षी बरोबर 50 वर्षे होत आहेत. या एतिहासिक क्षणाची आठवण आजही भारतीय मोठ्या अभिमानाने आठवण काढतात. आता आपले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असेच एतिहासिक काम करण्याची संधी इतिहासाने उपलब्ध करुन दिली आहे. ही संधी म्हणजे आपल्या शेजारी असलेल्या चीनला कायमचा धडा शिकविण्याची. गेले काही दिवस हा आपल्याला त्याचे लाल डोळे दाखवत वटारत आहे. परंतु त्याचे हे लाल डोळे त्याच्याच खोबणीत घालण्याची वेळ आता आली आहे. मोदीजी, तुमच्यासारख्या धैर्यवान, 56 इंचाची छाती असलेला नेताच हे काम करु शकतो. या चिन्यांना जर कायमचा धडा शिकविलात तर देश तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकविला, त्यापेक्षाही सरस काम तुमच्या हातून घडेल. कदाचित हे एतिहासिक कार्य तुमच्या हातून व्हायचे आहे म्हणूनच जनतेने तुम्हाला 2019 साली मताधिक्याने पुन्हा सतेत आणले असावे. डॉ. मनमोहन सिंगसारख्या मवाळ माणसाचे हे काम नाही. डॉ. सिंग सत्तेत असताना ते सीमेवरील हल्ले शांततेने पाहत. आपले जवान एकीकडे मरतात आणि आपले पंतप्रधान कडक जबाब देण्याएवजी राष्ट्रप्रमुखांना प्रेममत्र लिहीतात, असे आपणच म्हणाला होतात. आता मनमोहन सिंगपेक्षा काही तरी वेगळे करुन दाखविण्याची तुहाला संधी चालून आली आहे. बालाकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची आपण मुस्कटदाबी केलीच आहे. त्यामुळे सध्या आपल्याकडे पाकमधून घुसखोरी होत नाही. अतिरेकी हल्ले कुठे थांबले ? असा केवळ कांगावा विरोधक करतात, त्याकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता नाही. नेपाळचा गोळीबार म्हणजे आपल्याकडे दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांशी तुलना करण्यासारखाच आहे. आज नेपाळ ज्याच्या जीवावर उड्या मारत आहे, त्या लाल चिन्यालाच जर मोदीजी आपण धडा शिकविलात तर मग अजून काय पाहिजे? अर्थात आपल्याला त्यासाठी पध्दतशीररित्या नियोजन करुन काम करावे लागेल. ज्याप्रकारे विरोधकांची राज्यातली सरकार पाडली जातात त्यापेक्षा थोडेफार अवघड हे काम ठरावे. तुम्ही व तुमचे चाणाक्ष गृहमंत्री हे काम चुटकीसरशी करु शकाल. त्यासाठी पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे, चीनच्या सर्व वस्तू आपल्याला अधिकृतरित्या बंद कराव्या लागतील. जनतेलाही चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल. मोदीजी, तुमच्या एका हाकेला जर लाखो दिवे लागतात, टाळ्या पिटल्या जातात तर तुम्ही जनतेला चीनी माल खरेदी करु नकात असे सांगितले की लोक ऐकणारच. एका पैशाचा माल चीनी माल देशात खपला नाही पाहिजे, असे आवाहन करताच चीनची आर्थिक नाकेबंदी होईल. स्वस्तात मिळतो म्हणून मोबाईल किंवा कोणतीही वस्तू वापरणार नाही व विकणारही नाही, अशी शपथ घेण्याचा जाहीर कार्यक्रम घ्यावा लागेल. नाही तरी राष्ट्रभक्ती आणखी ती काय? या कामी मोदीजी तुमचे मित्र ट्रम्पकाका देखील मदत करतील. त्यांनी देखील त्यांच्या देशात चीनविरोधी आघाडी उघडली आहेच. एकदा का चीनचा माल खपला नाही की, चीन नाक घासत तुमच्या पायाशी येईल. दुसरीकडे सीमेवर सैन्य तैनात करुन चीनला घाबरावावे लागेल. या चीन्यांना असे वाटते की, भारत हा 1962 साली होता तसाच आजही आहे. परंतु आपली प्रगती गेल्या सहा वर्षात एवढी जबरदस्त झाली आहे की, आपण चीनशी सहजरित्या मुकाबला करु शकतो. हे खरे आहे की, आपल्याशी झालेल्या करारानुसार दोन्ही देश परस्परांवर गोळीबार करु शकत नाहीत. मग त्यासाठी आपल्याकडे लाठ्याकाठ्या घेतलेल्यांची फौज आहेच, त्यांचा मोठा उपयोग होईल. एकीकडे चीनची आर्थिक नाकेबंदी दुसरीकडे सीमेवरील लढाई यानंतर चीन कसा शरण येतो ते बघाच. गेले तीन महिने सीमेवर चीन हालचाली करीत आहे, मात्र तुम्ही सज्जन गृहस्थाप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलेत. चीनची ही घुसखोरी एका रात्रीत झालेली नाही, हे देखील खरेच. परंतु आता आता तुमच्या सहनशक्तीचा अंत होणे आपण समजू शकतो. खरे तर तुम्ही त्या शुल्लक विरोधकांशीही चर्चा करण्यात काहीच अर्थच नाही. तरी देखील सर्वांना बरोबर घेऊन जायाचे असल्याचे दाखवायचे असल्यामुळे तुम्ही आता बैठक बोलाविली आहे. अर्थात देशाच्या रक्षणासाठी तुम्ही युद्द छेडल्यास त्याला विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुम्ही पहिला इशारा दिला आहेच. परंतु आता मात्र मागे येऊ नकात. चर्चा करणे व घोळ घालणे हे कॉँग्रेसचे आजवरचे धोरण होते, त्यामुळे हा देश गेली 60 वर्षे खड्यात गेला. आपली अर्थव्यवस्था घसरणीला होती, त्यातच कोरोनामुळे तर विकासाचा वेग शून्यावर आला आहे. अशा स्थितीतच युध्द करणे सोपे आहे. कारण सध्या लगेचच काही विकासाचा वेग गाठला जाऊ शकत नाही. अशा स्थितीत विकासचा वेग पुढील सहा महिन्यात गती घेण्याच्या अगोदर या चिन्यांना चेचून काढा. एकदा का त्यांचा काटा काढलात की, पुढे आशिया खंडातील महासत्ता आपणच ठरणार आहोत. अनेक कंपन्या चीन सोडत आहेत, त्यामुळे तेथे बेकारीही वाढेल. चीनमधून बाहेर पडलेल्या या कंपन्या थेट आपल्याकडे येतील, मोदीजी 155 देशांना दौरे काढून जागतिक प्रतिमा जी उंचावली आहे, त्याचा फायदा होईलच. परंतु आता मात्र माघार घ्याची नाही, या चिन्यांना धडा शिकवायचाच.

Related Posts

0 Response to "मोदीजी, चीन्यांना चेचा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel