-->
संपादकीय पान सोमवार दि. २१ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
अतिरेक्यांचे आव्हान
--------------------------------------
ऍमस्टरडॅम मार्गे क्वालालंपूरला जात असलेले मलेशियाचे एमएच-१७ हे विमान शुक्रवारी पहाटे अतिरेक्यांनीच पाडले. हे अतिरेकी नेमके कोण होते, रशियन समर्थक अतिरेकी होते की युक्रेनच्या हवाई दलाने पाडले याबाबत अद्याप संभ्रम आहे. मलेशियाच्या हवाई वाहतूक सूत्रांनी हे विमान रशियाच्या हवाई हद्दीत नव्हते आणि ते बक या क्षेपणास्त्राद्वारे पाडले असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अपघातावरून ऑस्ट्रेलियाने रशियावर तोफ डागली असून, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय चौकशीची गरज व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मलेशियाचे पंतप्रधान व युक्रेनचे अध्यक्ष यांना दूरध्वनी करून विमान अपघातावर चर्चा केली. या अपघाताची विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची गरज अमेरिकेने तसेच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी व्यक्त केली आहे.
हे विमान रशियासमर्थक बंडखोरांनीच पाडल्याचा दावा युक्रेन करीत आहे. दोन बंडखोरांमध्ये विमान पाडण्याबाबत जे संभाषण झाले ते काही युक्रेनी लोकांनी टेप केले आहे, असेही सांगण्यात आले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र म्हटले आहे की, हे विमान कोसळले त्यावेळी युक्रेन नियंत्रित विमानविरोधी बक क्षेपणास्त्र प्रणालीचा मार्ग रडारवर आम्ही टिपला आहे. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्या सांगण्यानुसार विमान पाडणार्‍यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे. विमान अपघातात नेदरलँड्च्या १७३ प्रवासी व भारतीय वंशाच्या दोघांसह मलेशिया (४४), इंडोनेशिया (१२), इंग्लंड (९), बेल्जियम (४), फिलिपिन्स (३) या देशांचे प्रवासीही होते. हा विमान अपघात नसून विमान पाडल्याचा गंभीर गुन्हा आहे. विमान कोसळताच त्याचे खापर युक्रेनवर फोडण्याची रशियाची कृतीही बेजबाबदार आहे, अशी टीका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी केली. हे विमान पाडले गेले आणि युक्रेनमधील रशियासमर्थक बंडखोरांच्याच प्रांतात ते पडले आहे आणि त्यांनीच ते पाडले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. रशियन अतिरेक्यांनी मलेशियाचे विमान पाडले, त्यावेळी या विमानापासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर एअर इंडियाचे एक विमान होते. मात्र ही दुर्घटना झाल्यानंतर या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. आजवर जगभरात पाच वेळा प्रवासी विमानांना लक्ष्य करून पाडण्यात आले. ४ ऑक्टोबर २००१ रोजी सायबेरियन एअरलाईन्सचे एक विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून रशियाच्या नोवोसिबिर्स्कसाठी रवाना झाले होते. या विमानाला खाली पाडण्यात आले होते. विमान काळ्या समुद्रात कोसळून झालेल्या अपघातात ७८ जण मारले गेले होते. सुरुवातीला युक्रेनच्या सैन्याने या घातपातामागे आपला हात नसल्याची भूमिका घेतली होती; मात्र नंतर युक्रेनने मान्य केले की, सैन्य अभ्यासा दरम्यान चुकून विमानाला लक्ष्य करण्यात आले. ३ जुलै १९८८ रोजी इराण एअरलाईन्सचे दुबईला जाणारे एअरबस ए ३०० विमान सौदीच्या हवाई हद्दीत एफ-१४ नामक युद्धविमान समजून पाडण्यात आले होते. १९७९ च्या इराण क्रांतीपूर्वी हे युद्धविमान इराणला विकण्यात आले होते. अमेरिकी युद्धजहाजाने इराणच्या या विमानावर दोन क्षेपणास्त्रे डागल्याने त्यातील सर्व २९० प्रवासी मारले गेले. १ सप्टेंबर १९८३ रोजी न्यूयॉर्कहून सोलकडे जाणारे कोरियन एअरलाईन्सचे प्रवासी विमान तत्कालीन सोव्हिएत संघाने एका युद्धविमानाद्वारे पाडले होते. यातील सर्व २६९ प्रवासी मृत्युमुखी पडले. हे विमान आपला मार्ग बदलून ते सोव्हिएत हद्दीत घुसले होते. सुरुवातील सोव्हिएत संघाने या घटनेमागे आपला हात नसल्याचा दावा केला होता; मात्र नंतर हे विमान हेरगिरी करीत असल्याचा दावा करीत यामागे आपला हात असल्याचे मान्य केले होते. २१ फेब्रुवारी १९७३ रोजी इस्रायलच्या युद्धविमानांनी लिबियन एअरलाईन्सचे बोइंग ७२७-२०० विमान इजिप्तच्या सिनाई भागात पाडले होते. खराब हवामान आणि दिशादर्शकात बिघाड झाल्याने पायलटचा मार्ग चुकून हे विमान इस्रायलच्या हवाई हद्दीत भरकटले होते. यात १३ जण दगावले होतेे. २३ जुलै १९५४ रोजी कॅथे पॅसिफिक एअरवेजचे सी-५४ स्काईमास्टर विमान बँकॉकहून हॉंगकॉंगला रवाना झाले होते. हैनान बंदराच्या किनारी भागात चिनी युद्धविमानांनी यास लक्ष्य केले होते. लष्करी कारवाईविरोधात आलेले सैन्य विमान समजून हा हल्ला केल्याचा चीनने दावा केला होता. युक्रेनमधील ही विमान पाडण्याची घटना म्हणजे जगाला हादरा देणारी मोठी घटना आहे. कारण अशा प्रकारे जर अतिरेकी विमान पाडू लागले तर हवाई मार्गाचा संपूर्ण जगाला फेरविचार करावा लागणार आहे. रशियातील युक्रेनमध्ये जी अस्वस्थता आहे त्याबाबत गेल्या सहा महिन्यात सर्वत्र चिंता व्यक्त होत होती. अनेकदा युक्रेनचा हा संघर्ष कोणते वळण घेईल याबाबत शंका व्यक्त होती. कारण या अतिरेक्यांच्या हातात पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील अत्याधुनिक शस्त्रे लागली आहेत. त्याचा गैरवापर होण्याची शंका व्यक्त होतच होती. अखेर ती खरी झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे विमान पाडण्यासाठीच ही व्यूहरचना आखण्यात आली होती. परंतु पुतिन यांनी मार्ग बदलला आणि त्यापाठोपाठ असलेले विमान बळी ठरले. आगामी काळात अतिरेक्यांचे आव्हान हे जगापुढील एक मोठे संकट असेल. अतिरेकी हे कुठलेही असोत, कुठल्याही खंडातील वा प्रदेशातील असोत त्यांची जी ध्येयधोरणे आहेत ती मानवजातीला संहारक आहेत. त्यामुळे यापासून धडा घेऊन अतिरेकी प्रवृत्ती संपविल्या पाहिजेत. अतिरेके हे त्यांच्यावर हल्ला करुन संपणार नाही तर त्यांचा विचार संपविला पाहिजे. अतिरेक्यांनी केलेल्या या हल्यातून जगाने आता धडा घेण्याची वेळ आली आहे.
---------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel