-->
संपादकीय पान शनिवार दि. १९ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
नारायणास्त्र सुटले
------------------------------------
शिवसेना सोडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या घटनेला आता आठ वर्षे लोटली आहेत. असे असले तरी नारायण राणे हे कॉँग्रेसच्या संस्कृतीत काही फिट बसू शकलेले नाहीत हे सध्या चाललेल्या घडामोडींवरुन स्पष्ट दिसते. आपण सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत असे जाहीर करुन नारायणरावांनी आपण भविष्यात काय करणार आहोत ते अद्याप उघड केलेले नाही. सध्याच्या स्थितीत राणेंकडे तीनच पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे कॉँग्रेसमध्येच राहून कॉँग्रेसमध्ये सत्तेत जास्तीत जास्त वाटा कसा मिळेल हे पाहणे व भविष्यात मुख्यमंत्री कसे बनता येईल त्याची व्यहरचना करणे. दुसरा पर्याय म्हणजे राणे भाजपामध्ये जाण्याची जी अफवा होती ती वास्तवात उतरविणे. परंतु भाजपात जाण्यामुळे राणेंचे अनेक तोटेच आहेत. भाजपात मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून देव पाण्यात घालून बसलेले नेते राणेंना मुख्यमंत्री काही होऊ देणार नाहीत. केवळ सत्तेसाठीच राणे कॉँग्रेसमधून भाजपात गेले अशी प्रतिमा तयार झाल्यास ती त्यांना मारक ठरु शकते. तिसरा पर्याय म्हणजे स्वतंत्र पक्ष स्थापन करुन त्याचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे. त्याव्दारे सत्तेच्या अधिक जवळ जाता येऊ शकते. राणेंचा कॉंग्रेसमध्ये अपमान होत असल्याबद्दल भाजपने खंत व्यक्त केली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंसाठी महायुतीचे दरवाजे जवळपास बंद करून टाकले आहेत. राणे नक्की काय करणार, बंडाच्या नव्या प्रयत्नात समर्थक आमदार किती साथ देणार, असे प्रश्‍न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताना त्यांच्या बंडामुळे खळबळ माजविणार्‍या राणेंमध्ये राजकीय भूकंप करण्याची शक्ती आहे काय, याबद्दल आता प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. राणेंनी शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांच्यामागे जी शक्ती होती ती अर्थातच आता क्षीण झाली आहे. त्यांच्याबरोबर किती आमदार आपल्या आमदारकीवर पाणी सोडतील हे आत्ता सांगणे कठीण आहे. राजीनामा देण्याचा हा पवित्रा लोकसभा निवडणुकीतील मुलाच्या पराभवानंतर आलेल्या वैफल्याचा भाग आहे, की मुख्यमंत्र्यांवर व कॉँग्रेस पक्षावर दबाव टाकण्याचे राजकारण आहे, याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देणार्‍यांना भाजप स्थान देणार नाही, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली असल्याने राणेंचे पुढे काय होणार, याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. राणे यांनी समर्थक आमदारांशी यासंदर्भात चर्चा केली असल्याचेही सांगण्यात येते आहे. एका ज्येष्ठ पाठीराख्याच्या माहितीनुसार राणे यांना शांत करण्याचे प्रयत्न अपयशी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुत्र नीलेशचा पराभव राणेंच्या जिव्हारी लागला आहे. आपण सातत्याने कोकणच्या विकासासाठी झटलो; पण जनतेने आपल्याला नाकारल्याने धक्का बसला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांची कार्यशैली पराभवामागचे कारण असल्याचे पत्रही त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले होते. या पत्राला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणताच निर्णय न झाल्याने अस्वस्थ झालेल्या राणेंनी आता राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील आप सरकारने घेतलेल्या निर्णयापूर्वी वीजदरमाफीचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता; पण तो प्रत्यक्षात आला नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेच घेतला होता; पण त्याचे श्रेयही योग्य प्रकारे मिळाले नाही, याची राणेंना सल लागल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्रिपदाचे आश्‍वासन दिल्याने राणेंनी शिवसेनेत बंड करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, असे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून हे पद नाकारले गेल्यानंतर अस्वस्थता निर्माण झाली होती. नाराय़ण राणे हे एक कोकणचे डॅशिंग नेते म्हणून त्यांची शिवसेनेत असल्यापासूनच प्रतिमा आहे. शिवसेनेत त्यांच्या या प्रतिमेला भरपूर वावही होता. मात्र शिवसेना सोडल्यावर कॉँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी त्या पक्षातील शिस्तीनुसार किंवा तेथील कॉँग्रेस संस्कृतिला साजेसे वर्तन करणे अपेक्षित होते. राणेंना कॉँग्रेसने मुख्यमंत्री बनविण्याचे जरुर आश्‍वासन दिले होते. परंतु राणेंना ते पद मिळविण्याची ऐवढी घाई होती की, त्यात त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वेळी बंड केले होते. कॉँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार टीकाही केली होती. अशा प्रकारची टीका सहसा कॉँग्रेसमध्ये सहन केली जात नाही. मात्र त्यांचे हे अपराध पोटात घालून कॉँग्रेसने त्यांनी तीन महिन्याच्या आता पुन्हा मंत्रिमंडळात दुसरे स्थान दिले व महसूल मंत्री केले होते. नारायण राणेंना श्रध्दा व सबुरीचा सल्ला विलासरावांनी नेहमीच दिला होता. परंतु तो सल्ला मानण्याची मानसिकता काही राणे यांची नाही. आपल्या मुलाचा पराभव राणेंच्या जिव्हारी लागणे आपण समजू शकतो. परंतु त्यामागची कारणे राणे यांनी शोधली पाहिजेत. केवळ राष्ट्रवादीच्या माथी या पराभवाचे खापर फोडणे चुकीचे ठरेल. राणेंच्या हाती जिल्ह्यातली एक हाती सत्ता असताना त्यांच्या विरोधात लाट येण्याचे कारण काय याचे कारण शोधले पाहिजे. त्यामुळे या पराभवामागे राणेंनी आत्मपरिक्षणही करण्याची आवश्यकता आहे. कॉँग्रेस पक्ष आता अडचणीत आला असताना व राज्यातही पराभव दिसत असताना राणेंनी पक्ष सोडून जाणे हे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे राणेंनी केवळ सत्तेसाठीच पक्षांतराचा घाट घातला अशी त्यांच्यावर टीका होणार आहे. त्यामुळे राणेंनी आता कॉँग्रेस पक्ष न सोडता सत्ता राहो अथवा पराभव होवो कॉँग्रेसमध्येच राहून लढा दिला पाहिजे. अन्य्था हे नारायणास्त्र भरकटण्याची शक्यता जास्त आहे.
------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel