-->
वर्षाची अखेर होताना...

वर्षाची अखेर होताना...

मंगळवार दि. 31 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
वर्षाची अखेर होताना...
यंदाचे 2019 साल संपत असताना देशात अस्वस्थता नांदत आहे. केंद्रात पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने नागरिकत्वाच्या प्रश्‍नावर विधेयक मंजूर करुन घेऊन देशातील नागरिकांच्या मनात अस्वस्थततेचे बीज रोवले आहे. त्याअगोदर अयोध्येच्या प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन समतोल साधण्याचा परय्तन केला असला तरी त्या फैसल्याचे मुस्लिमांकडून काही शंभर टक्के समाधान झालेले नाही. त्याचबरोबर आता अयोध्यनंतर काशी-मथुरा हे देखील प्रश्‍न हातात घेण्याचे सुतोवाच झाल्यावर आता देशात अशांततेचे युग सुरु होणार यात काही शंका नाही. अयोध्येच्या फैसल्यानंतर आता राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असला तरी आता यासंदर्भात शांतता निर्माण होईल अशी काही चिन्हे नाहीत. त्यापूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरातील 370 कलम एका रात्रीत रद्द करुन तेथील वातावरण अशांत करुन ठेवले आहे. आजही चार महिन्यानंतर तेथे अशांतता व अस्वस्थता आहे. बंदुकीच्या जोरावर सरकार तेथे कितीकाळ कायदा सुव्यवस्था राखणार आहे, असा सवाल आहे. एकीकडे सरकारने राजकीय पातळीवर असे निर्णय घेऊन देशात अस्वस्थता निर्माण केली असताना आर्थिक पातळीवरही सरकारचे अपयश पुढे आले आहे. सरकारचा विकास दर गेल्या तीन दशकांचा निचांक म्हणजे 4.5 टक्क्यांवर आला आहे. एकीकडे वाढती बेरोजगारी, नव्याने होत नसलेली गुंतवणूक त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होण्याच्या संधी संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे देशातील तरुण अस्वस्थ आहे. सरकार या महत्वांच्या प्रश्‍नांकडे कधी लक्ष देणार असा सवाल आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले ही या वर्षातीलच नव्हे तर स्वातंत्र्यानंतरची एक महत्वाची घटना ठरली आहे. याचे कारण म्हणजे दोन भिन्न विचारांच्या पक्षांची आपल्या देशात सरकार स्थापन करण्याची ही देशातील ही पहिलीच वेळ. त्यादृष्टीने पाहता ही महत्वाची घटना ठरली आहे. शेवटपर्यंत भाजपाने आपल्याकडे बहुमत नसताना सत्ता टिकवून धरण्याची किव आणणारी कसरत केली. सत्तेच्या जोरावर आपण सर्व काही करु शकतो हा भाजपा नेत्यांचा असलेला माज संविधान दिनाच्या दिवशीच उतरववावा हा एक विलक्षण योगायोग आणि संविधानाचा मोठा विजय म्हटला पाहिजे. राज्यातील जनतेने युतीला कौल दिला होता हे खरे असले तरीही युतीत जर बेबनाव असेल व युतीतील मोठा भाऊ भाजपा जर धाकट्या भावाला शिवसेनेला कबूल केलेला सत्तेतील वाटा जर द्यायला तर तयार नसेल तर शिवसेनेने त्याविरोधात उठाव करणे काहीच चुकीचे नाही. शिवसेना नेतृत्व गेल्या पाच वर्षात सत्तेसाठी कच खात आल्याने यावेळी एक-दोन जादा मंञीपदे किंवा उपमुख्यमंञीपदाचे तुकडे फेकून शिवसेनेला गप्प करु असा भाजपाचा होरा होता. परंतु यावेळी शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम होती. तरी देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपाने विविध मार्गाने शिवसेनेला चुचकारण्याचा, दमात घेण्याचा प्रयत्न करुन पाहिला. माञ यावेळी मुख्यमंञीपद नाही तर युती नको अशी उध्दव ठाकरे यांची ठाम भूमिका वाखाणण्याजोगी होती. भाजाने सत्तेचा सर्व वापर करीत केंद्रातील गृहमंञालयापासून व्हाया राज्यपालभवन अशी सर्व प्रकारची फिल्डिंग लावली होती. पण भाजपाच्या सर्व चाणाक्यांचे अंदाज, स्ट्रॅटिजी, धोरण सर्वच फेल गेले. राज्यपालांनी तर यावेळी शंभर टक्के पक्षपाती काम केले. त्यांच्या पदाला अशोभनिय असेच त्यांचे काम होते. महाविकास आघाडी ही सत्तेत येण्यामागे उध्दवव ठाकरे जसे ठाम राहिले तसेच शरद पवारांची भूमिकाही मोलाची ठरली. मुख्य म्हणजे दोन भिन्न विचारसारणींच्या पक्षांनी एकञ येऊन सरकार स्थापणे ही अशक्यप्राय गोष्टच होती. भाजपाचा देखील हाच अंदाज होता की हे तीन पक्ष एकञ येऊ शकत नाहीत. परंतु शरद पवारांंनी हा जोड शक्य करुन दाखविला. त्याचबरोबर काँग्रेसने देखील आपला मुख्य शञू कोण आहे हे नेमके हेरुन आपल्या तत्वांना मुरड घालत सत्ता स्थापनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तो दूरगामी ठरणार आहे. काँग्रेस नेतृत्वाचे याबाबत मन वळविण्याची महत्वपूर्ण कामगिरी शरद पवारांनी केली. शेवटपर्यंत शिवसेने सोबत जाण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह होते. न जाऊ इच्छिणारे जोरात होते. परंतु काँग्रेस ही नेहमीच आपल्या विचारधारेशी पक्की राहात फ्लेक्सीबल राहिली आहे. परंतु एका हिंदुत्ववादी पक्षासोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेणे हे तर एक टोकाचे पाऊल होते. परंतु भाजपाच्या वाढत्या आक्रस्थळपणाला आवर घालण्यासाठी असे करणे गरजेचे होते. यासंबंधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेणे याबदद्ल त्यांचे कौतुकच झाले पाहिजे. राष्ट्वादी हा पक्ष जरी सेक्युलर असला तरी सत्तेसाठी अगदी सहजरित्या तडजोडी करणारा आहे. 2014 साली त्यांनी याच फडणवीस सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी शिवसेनेबरोबर जाणे हा काही मोठा निर्णय नव्हता. माञ राष्ट्वादी व शरद पवार हे दोघेही नसते तर ही आघाडी जन्मालाही आली नसती हे देखील तेवढेच खरे. निवडणुकांत ज्या प्रकारे शरद पवारांनी झंझावात केला व प्रचार केला ते पाहता त्यांचे नेतृत्व आता पुन्हा एकदा झाकोळून पुढे आले आहे. राष्ट्वादीचे एवढे आमदार पक्ष सोडून गेले होते की यावेळी बहुदा त्यांना जेमतेम 20-25 जागा मिळतील असा होरा होता. परंतु पवारांनी जनतेच्या मनातील भाजपाच्या विरोधी असलेला रोष बरोबर ओळखला होता. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी व भाकरी परतविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बरोबर ओळखले होते. त्यांच्या या घणाघाती प्रचाराचा मरगळीस आलेल्या व लढईआधीच मैदान सोडून पळालेल्या काँग्रेसला फायदा झाला. अनेक मिडियावीर ज्यांना भाजपाने खरेदी केले होते त्यांना खोटे ठरविण्याचे मोठे काम पवारांनी केले. मिडिया खरेदी केला तसेच इतर पक्षातून आमदार आयात केले की निवडणुका चुटकीसरशी जिंकता येतील हा भाजपाचा विचारही त्यांनी खोटा ठरविला. शेवटपर्यंत लढण्याची तयारी पाहिजे, तुमची वैचारिक बैठक पक्की पाहिजे तर तुम्हाला विजयश्री खेचता येते हे पवारांनी दाखवून दिले आहे. पवारांच्या या जिद्दीचा तरुण पिढीने आदर्श ठेवला पाहिजे. शरद पवारांनी पवारांच्या घरात फूट पाडून अजितदादांना आपल्याकडे खेचले परंतु त्यानंतर शरदराव हेही आव्हान पेलण्यास सज्ज झाले. महाराष्टासारखे एक मोठे राज्य आता भाजपाने गमावले आहे. येथूनच त्यांच्या घसरणीचा आलेख सुरु होणार आहे. त्यांनी ज्य् प्रकारे ईडी, गुप्तचर यंञणांचा पक्षासाठी वापर केला त्यांचे हे कृत्य लोकशाहीच्या चौकटीत बसणारे नव्हते. सत्ता गेल्यावर लगेचच भाजपातील गेल्या पाच वर्षात दबले गेलेले फडणवीस विरोधक आता डोके वर काढण्यास सज्ज झाले आहेत. त्यातील खडसेंनी आपली बंडाची तुतारी फुंकली आहेच. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आता पार पडला आहे. त्यातून त्यांनी मित्रपक्षांना स्थान दिले नसले तरी त्यांना भविष्यात या मित्रपक्षांना सोबत घ्यावेच लागेल. महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंञी असले तरी त्यांचे मुख्य सल्लागार हे शरदरावच आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला माणूस मुख्यमंञी झाला आहे. ही या वर्षातील एक महत्वाची घटना. आजवर बाळासाहेबांनी रिमोट कंट्ोल म्हणून काम करणे पसंत केले होते. परंतु त्यांच्या दुसर्‍याच पिढीने सत्तेत जाऊन जनतेची थेट सेवा करण्याचा निर्णय घेतला. हे करीत असताना त्यांनी सेक्युलर पक्षांची साथ घेतली आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य. आज भाजपाला संपवायला काँग्रेसच्या मदतीला शिवसेना आली आहे. आजच्या काळाची हीच गरज आहे असे म्हणावे लागेल. सत्तेची ही महाविकास आघाडीची गणिते काहीशी अनाकलनीय वाटत असली तरीही सध्याच्या काळानुसार योग्यच आहेत. गेल्या वर्षातील ही सर्वात महत्वाची घटना ठरली आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "वर्षाची अखेर होताना..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel