-->
अमृतसर दुर्घटना

अमृतसर दुर्घटना

सोमवार दि. 22 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अमृतसर दुर्घटना
पंजाबच्या अमृतसरमध्ये रावणदहनादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. अमृतसरमध्ये शुक्रवारी रात्री दसर्‍याला स्टेशनपासून दोन किमी अंतरावर जोडा फाटकाजवळ रुळांवर उभे राहून रावणदहन पाहणार्‍या लोकांना पठाणकोट-अमृतसर रेल्वेने, तर दुसर्‍या ट्रॅकवर आलेल्या हावडा एक्स्प्रेसने चिरडले. यात 63 जण मरण पावले व 150 हून जास्त जखमी झाले आहेत. लोक घरातून दसरा पर्व पाहण्यासाठी बाहेर पडले होते. रावणदहनानंतर मिठाई, जिलेबीचा आस्वादही घेता येईल, असे त्यांना वाटले. पण दोन रेल्वेगाड्या वादळासारख्या आल्या आणि लोकांना चिरडत निघून गेल्या. या घटनेत प्रशासन, स्थानिक नेते, रेल्वे व रामलीला आयोजक हे सर्व आरोपीच्या पिंजर्‍यात उभे दिसतात. घटनास्थळी लोकांच्या तोंडून हे तर कत्ले आम असे उद्गार निघाले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, येथे दरवर्षी असाच मेळा आयोजित केला जातो. रेल्वे क्रॉसिंगजवळ अलार्मची व्यवस्था प्रशासनाने करायला हवी होती. रेेल्वेला थांबवणे किंवा गती कमी करण्याची व्यवस्था व्हायला हवी. मी आमच्या छतावरून रामलीला पाहत होतो. पहिल्यांदा तर गर्दी जमवण्यासाठी गीत-संगीताचा कार्यक्रम झाला. आत जागा कमी होती म्हणून लोक बाहेर रेल्वे रुळावर गर्दी करून होते, असे प्रत्यक्षदर्शी मनप्रीत यांनी सांगितले. मेळ्याला नवज्योतकौर सिद्धू यांची उपस्थिती होती. त्यांचे येथे भाषण झाले. त्या नंतर सायंकाळी 6.50 च्या सुमारास रावणदहन सुरू झाले. आतषबाजी सुरू झाली. त्या आवाजात रेल्वेचा आवाज, हॉर्नदेखील ऐकू येत नव्हता. रुळावर उभे असलेल्या काहींनी रेल्वे बघून पाय मागे घेतले. पण दुसर्‍या बाजूने अमृतसरहून येणार्‍या गाडीने त्यांना चिरडले. सायंकाळी लोक रावणदहनाची प्रतीक्षा करीत होती. दरवर्षी सायंकाळी पाच पूर्वीच रावणदहन होत होते. कारण, 6.45 नंतर येथून दोन रेल्वे जातात. यंदा मात्र याकडे कुणीच लक्ष दिले नाही. गर्दी प्रचंड होती. दसरा मैदान आणि रेल्वे रुळांदरम्यान सुमारे 10 फूट उंच भिंत आहे. मैदानात जागा कमी पडल्यामुळे अनेक लोक भिंतीवर, रुळांवर उभे होते. मंत्री नवज्योत सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर प्रमुख पाहुण्या होत्या. मात्र, त्या खूप उशिरा आल्या. यात रेल्वेची वेळ झाली हे लोकांच्या लक्षात आले नाही. 6.50 वाजता रावणाच्या पुतळ्याला आग लावण्यात आली. पुतळा पेटला आणि इकडे दोन्ही रेल्वे आल्या. आतषबाजीच्या आवाजात दोन्ही रेल्वेंचा आवाजच आला नाही. आतषबाजी सुरूच होती. थोड्या वेळाने किंचाळ्या ऐकू आल्या. रुळाजवळ दूर अंतरापर्यंत शरीराचे अवयव विखुरले होते. तोवर नवज्योत कौर तेथून निघाल्या होत्या. यानंतर लोक आपल्या आप्तेष्टांना शोधू लागले. आतषबाजीचा गोंगाट 5 मिनिटांनंतर थांबला तेव्हा रेल्वेने लोकांना चिरडल्याचे लक्षात आले. रुळावर सर्वत्र मृतदेह विखुरले होते. लोक रुळावर स्वकीयांना शोधत होते. मदत पथक पोहोचेपर्यंत अर्ध्याअधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले होते. एकूणच दसर्‍याच्या दिवशी विदारक दृष्य पाहाण्याची वेळ आली. रावण दहनाची हा कार्यक्रम पाहता यात अनेक दोषी आहेत. खूपच छोट्या मैदानात रावणदहनाचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी हजारो लोक आले होते. काँग्रेस नेत्यांनी प्रशासनाची परवानगी न घेताच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दसरा आयोजकांसाठी स्थानिक प्रशासनाने काही नियम केलेले आहेत. बसण्याची व्यवस्था, पार्किंगसह फायर ब्रिगेड व रुग्णवाहिका आवश्यक आहे. परंतु प्रचंड गर्दी असूनही प्रशासनाने काहीच केले नाही. आयोजनस्थळी सुरक्षेचे उपाय पाहिल्यानंतर पोलिस परवानगी देतात, असा आजवरचा इतिहास आहे. मात्र येथे पोलिसांनी नियम-सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष केले.
नवजोत कौरने पीएला गर्दी पाहण्यासाठी पाठवले. नंतर 6 वाजता त्या आल्या. 6.40 पर्यंत त्यांनी भाषण केले. त्यानंतर रावणाचा पुतळा जाळला. इतक्यात रेल्वे आल्या. नंतर लोकच जबाबदार असल्याचे कौर म्हणत राहिल्या. घटनेनंतर त्या तेथून निघून गेल्या. अडीच तासांनी रात्रौ 9:20 वाजता रुग्णालयात गेल्या. त्या म्हणाल्या, तेथे खुर्च्या रिकाम्या होत्या. उंचावरून व्हिडिओ काढण्यासाठी लोक रुळावर गेल्याचे कारण दिले. रेल्वे रुळाजवळ आयोजनाची मंजुरी नव्हती, असे सांगून पोलिस आयुक्तांनी प्रश्‍नांना बगल दिली. काही लोकांच्या सांगण्यानुसार, आयोजकांनी रुळाच्या जवळ एक एलईडी स्क्रीन लावलेला होता. त्यामुळे गर्दी वाढली होती. आयोजनाची परवानगी कशी दिली, या प्रश्‍नावर पोलिस आयुक्त एस.एस. श्रीवास्तव यांनी काहीही बोलणे टाळले.या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी इस्रायलचा दौरा रद्द केला. शनिवारी सकाळी दिल्लीहून अमृतसरला जातील. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा व रेल्वे मंडळाच्या अध्यक्षा अश्‍विनी लोहानी विशेष विमानाने अमृतसरला रवाना झाल्या. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिका दौरा मधेच रद्द करून ते मायदेशी रवाना झालेे आहेत. ही दुर्घटना पाहता आपल्याकडे प्रशासन किती ढिलाईने काम करते व एखादी घटना झाल्यावर त्यांच्याकडे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याचे धैर्यच नसते असे जाणवते. एक तर जिल्हा प्रशासनाने रेल्वे रुळ शेजारी असताना अशा प्रकारच्या खुल्या मैदानात या कार्यक्रमात परवानगी देता कामा नये होती. तसेच रेल्वेलाही याची कल्पना नसावी याचे आश्‍चर्य वाटते. तसेच या अपघातानंतर रेल्वेकडे तातडीने जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची काही व्यवस्था नव्हती. किंवा त्यांना आता नेमके काय करायचे ते सुचले नाही. एकूणच प्रशासनाच्या ढिलाईमुळे 60 लोकांना आपले नाहक जीव गमवावे लागले आहेत. आपल्याकडे मनुष्याच्या जीवाला काही किंमत नाही हेच खरे.
-------------------------------------------------------------

0 Response to "अमृतसर दुर्घटना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel