-->
ऑक्टोबर हिटचा मारा

ऑक्टोबर हिटचा मारा

गुरुवार दि. 25 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
ऑक्टोबर हिटचा मारा
अवकाळी पावसानंतर मुंबईसह महाराष्ट्राचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत ऑक्टोबर महिन्यात नोंदवण्यात आलेल्या तापमानात आजचे तापमान सर्वाधिक तिसर्‍या क्रमांकाचे ठरले. वाढत्या उन्ह्याळ्यामुळे वातावरणात एकदम बदल झाला असून नुकताच पाऊस संपताच हा हिटचा मारा सुरु झाल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळाले आहे. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये तापमानाचे दोन नवे उच्चांक झाले आहेत. याआधी 7 ऑक्टोबर रोजी 37.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ते ऑक्टोबर महिन्यातील दुसरे सर्वांत जास्त कमाल तापमान होते. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून तापमानाचा भडका सुरू होता. पाऊस कमी झाल्याने यंदा ऑक्टोबर हीट सुरुवातीपासूनच जाणवू लागली होती. परिणामी, ऑक्टोबरमधील पहिल्या आठवड्यात कमाल तापमान सातत्याने 36 आणि 37 अंशांदरम्यान नोंदवले गेले. दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यातही पार्‍याचा भडका सुरू होता. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या पावसाने पारा चार अंशांपर्यंत खाली आला होता. कमाल पारा 33 अंशांवर आल्याने ऑक्टोबर हीटपासूनही मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. परंतु या पडलेल्या पावसानंतर पुन्हा अचानक हिटचा मारा सुरु झाल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळाले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटापासून पारा पुन्हा वाढू लागला. शनिवारी कमाल पारा 35.1 अंश सेल्सिअसवर आल्याने उकाडा पुन्हा जाणवू लागला. रविवारी कमाल पारा दोन अंशांनी खाली येत 33.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सोमवारी पारा पुन्हा 35.7 अंशांवर आला. आता 37.6 अंशांवर आला. सरासरीहून मंगळवारी नोंदवलेले कमाल तापमान चार अंशांनी जास्त होते. बुधवारी कमाल पारा 36 अंश सेल्सिअसवर होता. ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी तब्बल 24 हजार 962 मेगावॅट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात 21 हजार 580 मेगावॅट तर मुंबईमध्ये 3 हजार 382 मेगावॅट विजेची मागणी होती. सध्या ऑक्टोबर हिटच्या झळांनी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही ऑक्टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. राज्यात गेल्या दि. 16 ऑक्टोबरला 24 हजार 922 मेगावॅट तर महावितरणकडे 21 हजार 542 मेगावॅट, दि. 17 ऑक्टोबरला 24 हजार 687 मेगावॅट तर महावितरणकडे 21 हजार 223 मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबरला ही मागणी 24 हजार 962 मेगावॅटवर गेली. आजवरची ही उच्चांकी मागणी आहे. याच दिवशी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात 21 हजार 580 मेगावॅट विजेची मागणी होती. एकदम विजेची मागणी वाढल्यामुळे योग्य नियोजनाद्वारे महावितरणकडून 20 हजार 630 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला. राज्यात ज्या वाहिन्यांवर सर्वाधिक वीजहानी आहे, वीजदेयकांची वसुली अत्यंत कमी आहे, अशा जी-1 ते जी-3 गटातील वाहिन्यांवर 950 मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले. राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20 हजार 630 मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24 हजार 12 मेगावॅट वीज पारेषित केली. एकीकडे वीज टंचाई तर दुसरीकडे वीजेचे दर भरमसाठ वाढवून ठेवल्याने उद्योजकात मोठी नाराजी आहे. औद्योगिक वीज दरवाढ व पॉवर फॅक्टर दंड आकारणीच्या मुद्द्यावरून बारामतीतील उद्योजक आक्रमक झाले होते. बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महावितरणच्या अधिकार्‍यांना भेटून उद्योजकांनी निवेदन दिले. वीजबिलात तीस ते चाळीस टक्के वाढ झाल्याने औद्योगिक क्षेत्र हवालदिल झाल्याचे या वेळी उद्योजकांनी सांगितले. नुकत्याच आलेल्या वीजबिलांमध्ये महावितरणने तीस ते चाळीस टक्के इतकी प्रचंड दरवाढ करत उद्योजकांना दिवाळीची भेट दिल्याचा आरोप उद्योजकांनी केला. सुमारे दहा ते बारा टक्क्यांची वीज दरवाढ होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र वीजबिल चाळीस टक्क्यांपर्यंत वाढवून आले आहे. एकीकडे वीज दरवाढीचा शॉक महावितरणने दिला असून दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने पॉवर फॅक्टरची आकारणी करत हजारो रुपयांचा दंड उद्योजकांना लावण्यात आला आहे. यामुळे बारामतीचे औद्योगिक क्षेत्र अडचणीत आलेे. या नवीन वीजदरवाढीमुळे उद्योजकांना इतर राज्यातील उद्योगांशी स्पर्धा करणे अशक्य होऊन अनेक उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे बाजारात मंदी असताना आता वीज दरवाढीच्या संकटाने बारामतीतील उद्योजक हवालदिल झाले आहेत. महावितरणने या दरवाढीत सवलत द्यावी व चुकीचा पॉवर फॅक्टर दुरुस्त करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली.  नवीन पॉवर फॅक्टरचे सूत्र अमलात आणण्यापूर्वी उद्योजकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सध्याच्या यंत्रणेत दुरुस्तीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी देणे गरजेचे आहे, अशी चेंबरच्या वतीने केलेली मागणी रास्तच आहे. एकूणच एकीकडे हिटचा तडाखा, त्यातच दुष्काळी वातावरण व वीजेचा तुटवडा आणि महागडी वीज या सर्व फेर्‍यात जनत अडकली आहे. हा फेरा सरकारने सोडवायचा आहे, परंतु ते काहीच करीत नाही हे मोठे दुर्दैव आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "ऑक्टोबर हिटचा मारा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel