-->
दुर्घटनेचे गालबोट

दुर्घटनेचे गालबोट

शुक्रवार दि. 26 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
दुर्घटनेचे गालबोट
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाताना स्पीड बोटीला अपघात होऊन शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या समारंभाला दुर्घटनेचे गालबोट लागले. बोटीतील 24 जणांना वाचवण्यात यश आले. बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजता नरिमन पॉइंट येथून साडेतीन किमी अंतरावर समुद्रात हा थरार घडला. पायाभरणीसाठी दोन स्पीड व दोन पॅसेंजर अशा चार बोटी गेटवेवरून निघाल्या. एक बोट किनार्‍यापासून तीन कि.मी. समुद्रात खडकावर आपटून बुडू लागली. बोटीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ओ.एस.डी. श्रीनिवास जाधव, शिवस्मारक प्रकल्पाचे अभियंता श्याम मिसाळ व शिवसंग्रामचे 20 कार्यकर्ते होते. जाधवांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांना फोन केला. त्यानंतर प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आमदार जयंत पाटील यांनी तत्काळ मदतीसाठी पी.एन.पी.च्या दोन प्रवासी बोटी पाठवल्या. तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर्स आली. सर्व पीएनपीच्या बोटीत चढले. तोवर एक जण समुद्रात बुडाला. पी.एन.पी.च्या या बोटी त्वरीत पाठविल्याने त्या देवदुतासारख्या उभ्या राहिल्या व त्यात किमान 22 जणांचे जीव वाचले. एकूणच या घडलेल्या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सांताक्रुझ येथील शिवसंग्रामचा बुडालेला कार्यकर्ता सिद्धेश पवार याचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मूळचा कोकणातील खेडचा तो रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बुडालेल्या बोटीत सापडला. विक्रांत आमर, अशोक लोधा हे दोघे बुडालेल्या स्पीड बोटीत होते. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते गंभीर होते. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त बोटीत असलेले श्रीनिवास जाधव यांनी सुखरुप बाहेर आल्यावर म्हणाले, केवळ नशीब बलवत्तर, मित्र-नातेवाइकांच्या सदिच्छा व आमदार जयंत पाटील यांनी पाठवलेल्या मदतीमुळेच जीव वाचले. अन्यथा आम्हा 22 जणांचे काही खरे नव्हते. जाधव यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया फार बोलकी आहे. शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभास समुद्रात जाताना जी खबरदारी घेतली पाहिजे होती ती अजिबात घेण्यात आली नाही, हा शासकीय पातळीवरील मोठा निष्काळजीपणा आहे. एक तर खोल समुद्रात जाताना फायबरची स्पीड बोट नेणे चुकीचे आहे. कारण ही बोट कुठे खडकावर आदळली तर फुटून कोणताही अपघात होण्याची भीती असते. नेमके यावेळी असेच झाले. खओल समुद्रात स्मारकाच्या ठिकाणी फायबरची बोट नेण्याची ही योजना कोणाची? त्यात असणार्‍या धोक्याची कुणालाच कल्पना नव्हती का? हे प्रश्‍न उपस्थित होतात. त्याचबरोबर या स्पीट बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबण्यात आले. त्यामुळे त्यात लाईफ जॅकेटही मर्यादीतच होती. परिणामी बोट बुडू लागली त्यावेळी लाईफ जॅकेट घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली. शासनाचा एवढा मोठा समुद्रात कार्यक्रम होतो आणि तेथे सागरी सुरक्षितता काहीच नव्हती. हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बोट बुडू लागल्यावर आमदार जयंतभाईंना फोन केल्यावर त्यांनी पाठविलेली मदत तातडीने मिळते परंतु नौदल, तटरक्षक दल हे होते कुठे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अर्ध्या तासानंतर तटरक्षक दलाची हेलीकॉप्टर घिरट्या घालू लागली. शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभासाठी शासनाने तीन बोटींचे नियोजन केले होते. मात्र ऐनवेळी चौथी स्पीड बोट कुठून आणली, कोणी मागवली आणि त्यात क्षमतेपेक्षा अधिक अधिकारी-कार्यकर्ते कोणी बसवले, असा प्रश्‍न आहे. कार्यक्रमासाठी तीनच बोटींचे नियोजन होते. एक बोट व्हीआयपीसाठींची स्पीड बोट होती. त्यात राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि प्रकल्पाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे होते. इतर मोठ्या दोन बोटी प्रवासी बोटी होत्या. त्यातील एका बोटीत 40 पत्रकार तर दुसर्‍या बोटीत 25 पत्रकार आणि शिवसंग्रामचे काही कार्यकर्ते होते. जी चौथी बोट अचानक आली तीच नेमकी बुडाली. ती बोट कुठून, कोणी मागवली, तसेच बोटीची क्षमता आठ प्रवाशांची असताना 25 कार्यकर्ते-अधिकारी कसे काय बसले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. तसेच यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची आवश्यकता आहे. शिवस्मारकाची जागा चुकीची निवडली आहे. त्या परिसरात सर्वत्र खडक आहे. मच्छीमारही तिकडे जात नाहीत. निवडणुकाच्या पार्श्‍वभूमीवर कोणतीही तयारी नसताना प्रकल्प अध्यक्ष विनायक मेटे यांनी हा कार्यक्रम घाईने घडवून आणला, असा आरोप मुंबईतील मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी केला आहे. यात तथ्य असल्याचे बोलले जाते. नेमकी यातील वस्तुस्थिती शोधण्याची गरज आहे. या दुर्घटनेनंतर आता शिवस्मारकाच्या या स्थळाविषयी फेरविचार केला जाणे गरजेचे आहे. हे स्मारक जर समुद्रातच उभारवयाचे असेल तर ते घारापुरी बेटावर किंवा अलिबाग जवळच्या कुलाबा किल्यात का नको, असाही सवाल आहे. त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे, शिवस्मारक उभारले जावे, याबाबत संपूर्ण महाराष्ट्राचे दुमत नसेल. परंतु ते केवळ पुतळ्याच्या स्वरुपातच उभारावे का, असाही सवाल येतो. कारण रायगड जरी सुस्थितीत पुन्हा उभारला तरही ते एक मोठे स्मारक ठरु शकते. शिवाजी महाराजांची ती राजधानी होती व या वास्तूने अनेक एतिहासिक संदर्भ पाहिले आहेत. अशा स्थितीतील ही वास्तू सध्या वाईट अवस्थेत आहे. खरेतर शिवाजी महाराजांचे तेथेही एक चांगले स्मारक या किल्याच्या फेरउभारणीतून उभे राहू शकते. सरकारने याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "दुर्घटनेचे गालबोट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel