-->
फानीचा यशस्वी मुकाबला

फानीचा यशस्वी मुकाबला

मंगळवार दि. 07 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
फानीचा यशस्वी मुकाबला
नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सरकार यंत्रनेणे दाखविलेली तत्परता, हवामानखात्याचा अचूक अंदाज या सर्व बाबींमुळे ओडिसातील फानी वादळाचा आपण यशस्वी मुकाबला करु शकलो. याचे सर्व श्रेय राज्य् सरकारच्या पदरात पडेल, यात काही शंका नाही. कारण त्यांची सर्व यंत्रणा तेवढ्याच ताकदीने वापरुन नवीन तंत्रज्ञानातचा खरा फायदा जनतेला करुन दिला. यातून आपण एक बोध घेतला पाहिजे तो म्हणजे, गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्यानंतर आपण नवे तंत्रज्ञान अवगत तर केलेच व त्याच उपयोग जनतेला करुन देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. गेल्या 70 वर्षात काय केले असा प्रश्‍न विचारण्यांना लावलेली ही चपराकच आहे. एकीकडे मागास म्हणून हिणविलेल्या ओडिसा या राज्याने ही भरीव कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. एखाद्या विकसीत जगातील देशाप्रमाणे येथे सर्व यंत्रणा हलली व जनतेला या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यात आले. ओडिसा सरकारने तब्बल 15 लाख लोकांचे स्थलांतर केले होते. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतर करणे ही काही सोपी बाब नाही. पूर्व किनारपट्टीला वादळाचा तडाखा हा वर्षातून एखाद दिवस बसतोच. यावेळी 200 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे हे फानी वादळ म्हणजे भीषणच होते. यातून मोठ्या प्रमाणात जिवीत व मालमत्ता हानी होण्याची शक्यता जास्त असते. ओडिसा हे एक गरीब राज्य असल्यामुळे त्यांच्यासाठी होणारी हानी ही त्यांना फारच आर्थिक फटका पडणारी असते. परंतु या भयानक वादळात ओडिसा ताठ उभा राहिला आहे. ओडिसा राज्याची लोकसंख्या साडेचार कोटी इतकी आणि दरडोई उत्पन्न दिवसाला तीनशे रुपये वा त्याहूनही कमी आहे. युरोपातील जशा एखाद्या लहान देशाप्रमाणे या राज्याचे अस्तित्व आहे. अगदी भौगोलिक विचार करता स्पेनच्या आकारमानाएवढे या राज्याचे आकारमान भरते. येथील सर्व अर्थकारण शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकर्‍यांचे या वादळात नुकसान मोठे होण्याची शक्यता. अगदी 90च्या दशकापर्यंत या पूर्वेकडील राज्यात वर्षातून एकदा पूर किंवा वादळ हे ठरलेलेच असायचे. दर वेळी यात हजारो लोक मरायचे. 1999 साली 10 हजारांहून अधिकांचे प्राण घेतले होते आणि कलहंडीसारख्या भूकबळींच्या घटना याच राज्यात घडल्या होत्या. म्हणजे या राज्यात एकतर दुशष्काळ किंवा पूर तरी अशी टोकाची परिस्थिती ओढावलेली असतेच. अशा स्थितीत येथील जनता आपले आयुष्य कंठीत असते. गेल्या काही विध्वंसक चक्रीवादळांच्या तुलनेत या वेळी ओडिसाच्याबळींची संख्या पन्नासच्या आत झाली आहे. एवढे मोठे आलेले राज्यावरील संकट पाहता झालेले नुकसान हे नगण्यच म्हणावे लागेल. राज्याला तब्बल तीन दिवस अगोदर हवामान खात्याने या वादळाची चाहून दिली. तेव्हापासून येथील सर्व यंत्रणा कामी लागली. तब्बल 2 कोटी 60 लाखांहून अधिक एसएमएस संदेश पाठविण्यात आले. 43 हजार स्वयंसेवक यासाठी कामाला लागले. हजारांहून अधिक वैद्यक आणि आणीबाणीच्या सेवेत उपयोगी कार्यकर्ते तैनात ठेवण्यात आले. साधारण 10 हजार मदत छावण्या आणि तेथे नेण्यासाठी असंख्य वाहने ठेवण्यात आली. आत खोल समुद्रात तैनात नौदल नौका आणि मदतकार्यास सज्ज विमानतळ असे हे सर्व चक्रीवादळाच्या सामन्यासाठी तैनात करण्यात आले होता. या सगळ्या यंत्रणांत साधला गेलेला ताळमेळ ही निश्‍चितच आश्‍चर्याची बाब. संकटे माणसास काय शिकवू शकतात याचे हे मूर्तिमंत उदाहरण ठरते. उत्तर खरगपूरच्या आयआयटीच्या संशोधकांनी यापूर्वीच्या वादळांचा अभ्यास करून खरगपूर आयआयटीने या वादळांना तोंड देऊ शकेल अशा पद्धतीच्या इमारती उभ्या करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान आणि इमारत आराखडे संपूर्ण देशी बनावटीचे आहेत. 1999 सालच्या वादळात जेथील इमारती उद्ध्वस्त झाल्या, तेथेच या नव्या तंत्रज्ञानाने उभ्या राहिलेल्या इमारतींनी ताज्या चक्रीवादळाचा सामना करीत ताठपणाने उभ्या राहिल्या. हे सर्व तंत्रज्ञान देशात विकसीत झालेले आहे, ही आणकी एक अभिमानाची बाब आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवावहरलाल नेहरु यांनी स्थापन केलेल्या आयआयटीसारख्या संस्थांचे महत्त्व आणि त्यांचे द्रष्टेपणदेखील या निमित्ताने देशासमोर आले. गेल्या सात दशकात काँग्रेसने काय केले असा सवाल विचारणार्‍या विद्यमान पंतप्रधानांना या तंत्रज्ञानाने चांगलीच चपराक लगावली आहे.
देशाच्या हवामानखात्याने देखील केलेली ओजस्वी कामगिरी लक्षात घ्यावी लागेल. नवीन तंत्रज्ञानााने आपण आता सज्ज झालो आहेत हेच यातून सांगितले गेले. आपल्याकडे हवामान खात्याची नेहमीच टिंगल टवाळी केली जाते, परंतु आता हेच हवामानखाते आता आधुनिक झाले असून त्यांनी हजारो जणांचे प्राण वाचविले आहेत. सीमेवरील 15 लाख लोकांचे स्थलांतर करणे ही देखील काही सोपी बाब नाही. जवळपास 24 तास या संपूर्ण परिसरात रेल्वे आणि विमानतळ बंद केले गेले. वादळी वातावरणात त्यामुळे उगाचच कोणावर अडकून पडण्याची आणि जीवनावश्यक सेवांवर या अडकलेल्यांच्या सुटकेसाठी धावपळ करण्याची वेळ आली नाही. ओडिसाने केलेली ही कामगिरी खरोखीच कौतुकास्पद आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "फानीचा यशस्वी मुकाबला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel